Sunday, August 31, 2025

Rainfall : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक तालुक्यात पावसाची हजेरी

Rainfall : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक तालुक्यात पावसाची हजेरी

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : कणकवलीसह जिल्ह्यातील अन्य तालुक्यांत काही ठिकाणी सोमवारी सायंकाळच्या सुमारास ऐन हिवाळ्यात जोरदार अवकाळी पाऊस (Rainfall) कोसळला. अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची एकच तारांबळ उडाली. या पावसामुळे आंबा, काजू बागायतदार चिंतेत आहेत. पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

गेले दोन दिवस थंडी गायब झाली होती, तसेच वातावरणातील उष्णतेचे प्रमाण देखील वाढले होते. सोमवारी सायंकाळी ५.३०च्या सुमारास कणकवलीत अचानक वाऱ्यासह पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते.

फोंडाघाट येथे सोमवारी आठवडा बाजार असतो. अचानक आलेल्या पावसामुळे बाजारातील विक्रेत्यांची तारांबळ उडाली. ग्राहकांनाही पावसापासून बचाव करण्यासाठी दुकानांचा आसरा घ्यावा लागला. महामार्गाच्या उड्डाणपुलावरून सर्व्हिस रस्त्यावर धबधब्यासारख्या पाण्याच्या धारा कोसळत होत्या, तर काही ठिकाणी सर्व्हिस रस्त्यावर पाणी साचले होते. अन्य तालुक्यांतही अवकाळी पाऊस झाला, त्यामुळे आंबा व काजू बागायतदारांचे नुकसान झाले आहे. प्रशासनाने या नुकसानीची पाहणी करून तत्काळ नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

Comments
Add Comment