Saturday, July 5, 2025

Ratnagiri : जेएनपीटी बंदरातून लवकरच रत्नागिरीपर्यंत होणार मालवाहतूक

Ratnagiri : जेएनपीटी बंदरातून लवकरच रत्नागिरीपर्यंत होणार मालवाहतूक

रत्नागिरी (प्रतिनिधी) : मुंबईतील जेएनपीटी बंदरापासून रत्नागिरीपर्यंत (Ratnagiri) मालवाहतूक करण्यासाठी कोकण रेल्वे प्रशासनाकडून कंटेनर ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सुरक्षित प्रवास आणि वेळेची बचत असा दृष्टिकोन रेल्वेने ठेवला असून पहिली कंटेनर ट्रेन ३० नोव्हेंबर रोजी रत्नागिरी स्थानकातून सोडण्यात येणार आहे.


कोकणात उत्पादित उत्पादने मुंबईतील जेएनपीटी बंदरातून जगाच्या विविध भागात निर्यात केली जातात. येथील उत्पादनेही त्यांच्या गुणांसाठी ओळखले जातात. त्यामुळेच जगभरात प्रचंड मागणी असते. जेएनपीटी आणि उत्पादन युनिट्समधील रस्ता खराब आहे. त्यावरुन वाहतूक करताना दमछाक होते आणि वेळही अधिक लागतो. रस्ते अपघाताची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे जेएनपीटी आणि रत्नागिरी दरम्यानचा हा प्रवास सुरळीत करण्यासाठी कोकण रेल्वेच्या रत्नागिरी विभागाने कंटेनर ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या ट्रेनमध्ये चाळीस फूट आणि वीस फूट लांबीचे कंटेनर मालाच्या वाहतुकीसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहेत.


निर्यातीसाठी वातानुकूलीत आणि कोरडे कंटेनरही यामध्ये वापरले जाणार आहेत. मालाची वाहतूक सुलभ आणि गतिमान होण्यासाठी कोकण रेल्वेची ही सेवा उपयुक्त ठरणार आहे. कोकणातून होणाऱ्या व्यापाराला मोठ्या प्रमाणात चालना मिळेल. पहिली कंटेनर ट्रेन २९ नोव्हेंबरला रवाना करण्यात येणार आहे. या सुविधेचा व्यापाऱ्यांकडून लाभ घ्यावा, असे आवाहन कोकण रेल्वे प्रशासनाकडून केले गेले आहे.

Comments
Add Comment