Wednesday, November 19, 2025

Health care : गती पाविजेती...

Health care : गती पाविजेती...

आरोग्य, तंत्रज्ञान, विज्ञान या प्रत्येक क्षेत्रात वेगाने प्रगती होत आहे. (Health care) या सर्वाचा मेळ साधण्यासाठी त्यांची गती, वेग याचाही अंदाज यायला हवा. मागील एका लेखात आधुनिक काळात, विशेष करून तंत्रज्ञानाच्या प्रगतीच्या काळात, आरोग्यासाठी तंत्रज्ञानाचा मेळ कसा साधायचा, याविषयी मी सूत उवाच केले होते.

सुखासाठी विकास हा व्हायलाच हवा, यात काही शंका नाही. माणूस सुखासाठीच धडपडत असतो. एकीकडे माणसाचे आयुष्मान वाढते आहे. पण त्याचबरोबर आयुष्य निरोगी पण राहणार का किंवा ते सदृढ आरोग्य राहायला हवे, यासाठी वरील सगळ्याच क्षेत्राचा मेळ योग्य गतीने साधला जातो आहे का?, हे देखील पाहिले पाहिजे. यासाठी हा विषय थोडा अधिक विस्ताराने समजून घ्यायचा प्रयत्न आजच्या लेखात करूयात.

  • सुखार्थाः सर्वभूतानां मताः सर्वा प्रवृत्तयः। सुखं च न विना धर्मात्तस्माद् धर्मपरो भवेत्।। सर्व भूतमात्रांची वाटचाल ही आरोग्य किंवा स्वास्थ्यपूर्ण जीवन जगण्यासाठीच होत असते. यापैकी आरोग्य म्हणजे नेमके काय, हे अनेक लेखातून पाहण्याचा प्रयत्न केला. गेले जवळपास वर्षभर आपण आरोग्यं धन संपदा याविषयी विविध अंगाचा विचार समजावून घेण्याचा प्रयत्न केला. यात आपले स्वत:चे आरोग्य आपल्या हाती, हेही एव्हाना सर्वांना पटायला लागले असेल.
  •  माझे खरे सुख म्हणजे माझे आरोग्य आहे. आरोग्यासाठी माझी गुंतवणूकही स्वास्थ्य वर्धक आणि ते टिकवणारे साधनात करण्याची मानसिकता यातून तयार झाली पाहिजे. दीर्घकाळ सातत्यपूर्ण स्वास्थ्य ज्यामुळे टिकते, अशा शाश्वत तत्त्वांना आचरणात आणण्याचा प्रयत्न त्यासाठी करायला हवा.
  • तंत्रज्ञान हा विषय आरोग्य क्षेत्राशी थेट संबंधित नसला तरी नैदानिक परीक्षणे, इत्यादी अनेक मार्गाने त्याचा संबंध येतो. त्यातूनच रोज प्रसार माध्यमांतून येणारे संदेश, जे काही थोड्या काळात अनुभवलेले निष्कर्ष असतात, त्यांना पुढेही संशोधनाची नितांत गरज असते. अशा संदेशांना शास्त्रशुद्ध निकष नसतील, तर उगीच त्यात सांगितलेल्या गोष्टी करू नयेत. आरोग्यपूर्ण जीवन आणि माझे दैनंदिन जीवन याचा चरितार्थ चालू राहण्यासाठी, अर्थार्जनासाठी मी करत असलेले काम, ते करत असताना आरोग्य, तंत्रज्ञानाचा वापर, विज्ञान यातील समतोल सांभाळता आला पाहिजे. हे साधण्यासाठी पुढील गोष्टी करून पाहता येतील.
  • सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वेळेचे नियोजन.
  • आपल्या कामाचे दिवस, सामाजिक कार्यक्रम, मौजमजा विरंगुळा, स्वतःच्या स्वास्थ्यासाठी करायच्या गोष्टी जसे की, व्यायाम इत्यादी या सर्व गोष्टींचा मेळ साधला पाहिजे. त्याचे नियोजन केले पाहिजे.
  • पैसा मिळवण्यासाठी काम करतो आहोत. तरी रोज काम करण्याची वेळ ठरवली पाहिजे.
  • दिवसातील उरलेला वेळ स्वत:च्या फिटनेससाठी नक्कीच राखून ठेवला पाहिजे.
  • वेळापत्रक आखण्याचा यासाठी सराव करून पाहावा.
  • विशिष्ट गोष्टीसाठी विशिष्ट वेळ ठेवण्याचा त्यासाठी प्रयत्न करावा.
  • आपला मेंदू कसे काम करतो, याकडे लक्ष ठेवावे.
  • कामाचा आराखडा तयार केला, कोणते काम आधी करायचे, कोणते नंतर हेही ठरवले आणि त्यानुसार काम केले, तर ते काम अधिक उत्तम होऊ शकते. कामात सातत्यही राहते.
  • काम कधी संपवायचे हेही पाहावे. काम संपवण्याची रोजची एकच वेळ ठरवावी.
  • तंत्रज्ञानाचा उपयोग योग्य पद्धतीने करायला शिकले पाहिजे.
  • प्रत्येक मिनिटाचे वेळापत्रक आखायचे असे नाही. काही वेळ कोणतीच कृती न करता निवांत घालवावा.
  • हे असे करण्याचे प्रयोजन काय? तर जेव्हा आपण जाणीवपूर्वक वेळेचे महत्त्व समजून कृतिशील होण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपले काम आणि रोजचा दिनक्रम याचा समतोल राखणे सोपे होते. अर्थातच आरोग्यपूर्ण आयुष्य जगत हे साधता येते.
  • कृती कुशलता हा विषयदेखील आरोग्याशी संबंधित आहे. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर नियोजनपूर्वक त्यासाठी प्लॅनिंग केले, तर अनारोग्य सारखे येणार नाही. आल्यास बरे होण्यास कष्ट कमी लागू शकतील. स्वास्थ्यही लवकर मिळू शकेल.
  • आपला देश आपण ज्या वातावरणात, भौगोलिक परिस्थितीत राहतो त्याला अनुसरून आपले खाणे-पिणे, विहारातील विषय स्वीकारावेत. त्यातही सारखे बदल करू नयेत.
  • वैयक्तिक त्याचबरोबर कौटुंबिक, सामाजिक स्वास्थ्य हे एकमेकाशी जोडलेले असते. तंत्रज्ञानाचा योग्य उपयोग या प्रत्येक स्तरावर झाला, तर कमी कष्टात चांगला आरोग्यपूर्ण भारत जगासमोर आदर्श बनेल.
  • आरोग्य विमा कंपनी यांचाही केवळ अनारोग्य दुरुस्त करण्यापेक्षा आरोग्यासाठी दृष्टिकोन बदलेल. तो त्यांच्याही फायद्याचा ठरेल.
  • जसे गाव आणि शहरे यातील अंतर कमी झाले की, विकासाचा वेग वाढतो. गावखेड्यातील किरकोळ दूध दुभत्यांचे दूध उत्पादन केंद्रात रूपांतर होते. हे श्रेय असते आधुनिक दळणवळणाच्या साधनांचे. त्याचबरोबर ही सुविधा पुरल्यानंतर रोज त्या मार्गावरील वाहतूक वाढली. रस्त्यांवर खड्डे वाढले, अपघात वाढले. त्यांचा मेंटेनन्स, अडचणी हा चिंतेचा विषय बनला आहे. हे दिरंगाईचे घात टाळायचा प्रयत्न वेळेवर झाला, तर समृद्धी गवसेल. तसेच स्वास्थ्य मिळवण्यासाठी, तंत्रज्ञान, विज्ञान यातील प्रगतीचा वेग कार्यकारणभाव समजून, गतिमान ठेवला, तर आरोग्यरूपी धन संपदा साधणे शक्य होईल. यथोचित गतीने स्वास्थ्यपूर्ण जीवन सुखाने जगता येईल.

-डॉ. लीना राजवाडे

Comments
Add Comment