Saturday, July 13, 2024
Homeसाप्ताहिककोलाजculture : अभिमानाचं लेणं ऱ्हासाच्या वाटेवर...

culture : अभिमानाचं लेणं ऱ्हासाच्या वाटेवर…

विष्णुधर्मोत्तर पुराणातल्या चित्रसूत्र अध्यायामध्ये सर्व कलांमध्ये चित्रकला इतकी सर्वश्रेष्ठ मानली गेली आहे की, त्या कलेद्वारे धर्म, अर्थ, काम आणि मोक्षाची प्राप्ती होते, अशी फलश्रुती दिलेली आहे. (culture) एवढंच नाही तर ज्या घरांमध्ये चित्रांचा आदर, सन्मान राखला जातो, तिथे मांगल्य नांदतं, असंही म्हटलेलं आहे.

माणसाला जेव्हा लिखित भाषा अवगत नव्हती त्यावेळी त्याच्या अभिव्यक्तीचे पहिले माध्यम चित्रकला हेच होते. चित्रभाषेचा जन्म यातूनच झाला.

भित्तिचित्रांपासून लिपीच्या दिशेने प्रवास झालेला दिसून येतो. या अभिव्यक्तीच्या प्रवासामध्ये रामायण महाभारतादी संस्कृत काव्यांतील कथांनी लोकांच्या मनावर गारूड केले होते. त्यातूनच चित्रांच्या भाषेतून लोकभाषेमध्ये यांतील कथा सांगण्यास प्रारंभ झाला असावा.

गावोगावी भटकंती करून समाज साधारणपणे एकत्र येऊ शकेल, अशा ठिकाणी म्हणजे मंदिरे, धर्मशाळा वगैरे ठिकाणी या कलांचे सादरीकरण व्हायला सुरुवात झाली. अशा चित्ररूपी ग्रंथांचा वाचन करणारा चित्रकथी समाज अस्तित्वात आला. चित्रकथी लोककलेच्या राजस्थानी, पैठण आणि पिंगुळी या शैली प्रसिद्ध आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथे पिंगुळी गावात चित्रकथी लोककलेचे अस्तित्व आढळते. कोकणातील दशावतार, खेळे हे जसे लोकप्रिय आहेत त्याचप्रमाणे पिंगुळीची चित्रकथी ही दृक्श्राव्य कलादेखील सुपरिचित आहे. ही पुरातन लोककला कोकणातील ठाकर जमात जतन करत आहे. ही जमात मुळची भटकी असली तरीही पोटापाण्यासाठी स्थलांतर करीत ती कोकणात येऊन वसली. हे ठाकर आदिवासी पूर्वी गावोगावी फिरून आपल्या लोककला सादर करीत असत. या लोकपरंपरेत चित्रकथी, कळसूत्री बाहुल्या, छाया बाहुल्या यांचा खेळ ठाकर आदिवासी करत असत. सावंतवाडी संस्थानाच्या १८८० सालच्या गॅझेटिअरमध्ये या जमातीच्या इतिहासाचा तपशील आढळतो. मात्र त्या जमातीचे मूळ अजूनही गुलदस्त्यातच आहे. या जमातीने जोपासलेल्या लोककलेला सावंतवाडीच्या राजघराण्याने आश्रय दिला आणि त्यांना उपजीविकेसाठी काही गावे वतन म्हणून देण्यात आली. त्यानुसार ठाकर समाज पिंगुळी गावी वस्ती करून राहिल्याचे समजते. १९१६ साली ब्रिटिशांच्या वतीने प्रकाशित झालेल्या आर. व्ही. रसेल यांच्या “द ट्रायबल्स अँड कास्ट्स ऑफ द सेंट्रल प्रोव्हिन्सेस ऑफ इंडिया” पुस्तकातील उल्लेखानुसार छत्रपती शिवाजी महाराजांनी ठाकर समाजाच्या लोककलेची दखल घेतल्याचे कळते. महाराजांनी जंगलातून वस्ती करणाऱ्या या जमातीला दसऱ्याच्या दिवशी देवळांच्या बाहेर आपली कला सादर करण्याचे लेखी फर्मान जारी केले.

चित्रांच्या माध्यमातून कथाकथनासाठी गावोगाव भटकणाऱ्या या समाजातील लोकांवर हेरगिरीचे काम सोपवून त्यासाठी काही जमिनी इनाम देऊन त्यांच्या रोजी-रोटीचा प्रश्नही महाराजांनी सोडविला. या समाजातील ठाकरांना कुडाळ येथील केळबाई, साळगाव येथील वेताळ, झारापमधील भावई मंदिर अशी बरीच मंदिरे आपली कला सादर करण्यासाठी दिली गेली. त्या बदल्यात गावातील प्रत्येक घराने ग्रामदेवतेसमोर केलेल्या या खेळासाठी एक शेर भात तसेच भातकापणीनंतर मानकऱ्याने शेतातील भाताचे एक ‘कणीस’ ठाकराच्या डोक्यावर त्याला जमेल तेवढे मोठे चढवायचे, असा दंडक घालून दिला. या परंपरेला ‘लाकी’ असे म्हटले जाते. तेव्हापासून पिंगुळीचे ठाकर आदिवासी तुलसी विवाहानंतर म्हणजेच कार्तिक शुद्ध द्वादशीनंतर लोककलेचे खेळे करण्यासाठी गावाबाहेर पडतात. त्यापूर्वी कोकणातील रवळनाथ, सातेरी, लक्ष्मी या देवस्थानाच्या विश्वस्तांच्या घरासमोर जाऊन खेळ करण्याची परंपरा आहे. वेंगुर्ला, सावंतवाडी, कणकवली, मालवण इत्यादी पट्ट्यातील किमान ५० ते ६० गावांत ठाकर जमातीचे लोक वास्तव्यास आहेत. पिंगुळीमधील ठाकर चित्रकथींबरोबरच कळसूत्री, पिंगळी, फुगडी, पांगुळबैल, राधानृत्य, पोवाडे, चामड्याच्या बाहुल्यांचा खेळ करतात. सोमेश्वराच्या मानसोल्लास या ग्रंथामध्ये “वर्णकैः सहयोवक्ति स चित्रकथको वरः गायका यत्र गायन्ति वीणातालैः मनोहरम्” अशी चित्रकथीची व्याख्या दिलेली आहे.

अर्थात – “वर्णकांच्या म्हणजेच चित्रांच्या साह्याने जो कथा कथन करतो, तो चित्रकथक होय”. या कथाकथनाच्या कार्यक्रमात तालाविना मनोहर गायन केले जाते. ‘तालाविना’ असे म्हटलेले असले तरीदेखील चित्रकथीची पोथी सांगणारे मंजिरी, वीणा, मृदंग या वाद्यांचा वापर करताना दिसतात. चित्रकथी या प्रयोगात्मक कलेचा उगम नेमका कधी झाला, याची लिखित नोंद कुठेही आढळत नाही. चामड्यावर रंगविलेल्या बाहुल्या, कळसूत्री तसेच लाकडी बाहुल्या आणि पट्टावर काढलेली रंगीत चित्रे अशा साधारणपणे तीन स्वरूपात चित्रकथी पाहायला मिळते.

महाराष्ट्रातील हरदास, गोंधळी, कीर्तनकार हे जशी पूर्वरंग उत्तररंग स्वरूपात कथा सादर करतात आणि रात्र जागवतात त्याचप्रमाणे पिंगुळीचा चित्रकथाकार रामायण, महाभारत, पुराणांतील कथा चित्रांच्या साह्याने सांगतात. यालाच “पोथी सोडणे” असे म्हटले जाते. या पोथ्या म्हणजे एकमेकांच्या पाठीला चिकटवलेल्या चित्रांचा संच असतो. एका संचामध्ये साधारणपणे ३० ते ५० पाने असतात. दोन्ही बाजूंचे चित्रे – प्रसंग पाहता एक संच हा कमाल १०० चित्रांचा असतो. पोथ्यांची शीर्षकेही त्यानुसार असतात. लाकडी पट्ट्यांवरील किंवा छापील चित्रांच्या साह्याने हा समाज पूर्वी भविष्यकथनही करीत असे. ही कला सादर करण्यासाठी साधारणपणे तीन कलावंतांची आवश्यकता असते. यापैकी मधोमध बसलेल्या कलाकाराच्या हातात वीणा त्याच्या शेजारी बसलेल्यांच्या हाती प्रत्येकी डमरूसारखे भासणारे दुडूक नावाचे वाद्य असते, तर तिसरा कलावंत गायनाला साथ देण्यासाठी असतो. मौखिक परंपरेने चित्रकथीमधील कथानके ही एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित झालेली पाहायला मिळतात. माणूस मोठा गोष्टीवेल्हाळ असतो. गोष्टींना चित्रांची जोड मिळाली, तर अशा गोष्टी मानवी मनावर कायमस्वरूपी कोरल्या जातात, असं मानसशास्त्रं सांगतं. याचाच आधार घेऊन मुळाक्षरं, बाराखडींना चित्राची जोड मिळाल्यानंतर नवसाक्षर, लहान मुलांच्या आकलनात मोठी भर पडल्याचंही नोंदवलं गेलं आहे. थोडक्यात काय, तर चित्रभाषा समजून घेण्यासाठी कथनाची साथ मिळाल्यास त्या दृक् श्राव्य कलेचा परिणाम – प्रभाव हा दीर्घकाळ राहतो.

मनोरंजनाची तुटपुंजी साधनं अस्तित्वात असणाऱ्या काळामध्ये चित्रकथीसारख्या लोककलांनी समाजाची मानसिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक भूक भागवली. लोकरंजनासाठी असलेल्या कलांनी प्रबोधन, जागर, शिक्षण यासाठी हातभार लावला. विशिष्ट परंपरांशी या लोककलांची सांगड घालत समाजाच्या सांस्कृतिक संरचनेचं संतुलन साधलं गेलं. गोष्ट सांगणं, कथाकथनातून नाट्य निर्माण करणं हे तर मौखिक संस्कृतीचं वैशिष्ट्य म्हणता येईल. अशा वैशिष्ट्यांनी युक्त चित्रकथी ही पिंगुळीची लोककला सिंधुदुर्गाचं आणखी एक अभिमानास्पद लेणं आहे.

गणपत मसगे आणि परशुराम गंगावणे या लोककलावंतांनी चित्रकथीची परंपरा अत्यंत बिकट अवस्थेतही जपलेली, वाढवलेली आहे. मात्र पिंगुळीमधील ठाकर समाज वगळता अन्यत्र चित्रकथी लोककलेचा मागमूसही दिसत नाही, ही मोठी खेदाची बाब आहे. एखादी लोककला, कला हळूहळू लुप्त व्हायला लागते, त्यावेळेस तो फक्त कलेचा ऱ्हास नसतो, तर ती समाजाची सांस्कृतिक हानी असते. समाजाच्या जडणघडणीमध्ये संस्कृतीचा वाटा निःसंशय मोठा असतो. त्यामुळे संगीत कला अकादमी पुरस्काराने, पद्मश्री किताबाने या लोककलावंतांना सन्मानित करून भागणार नाही, तर त्या त्या कलांच्या संवर्धनासाठी राजाश्रय, लोकाश्रय आणि योग्य ती धोरण अंमलबजावणी होण्याची नितांत आवश्यकता आहे.

-अनुराधा परब

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -