देशाचे सर्वाधिक लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांमध्ये कमालीचा द्वेष भिनलेला आहे. विशेषत: निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेसच्या नेत्यांचा तोल सुटतो आणि ते देशाच्या पंतप्रधानांवर बेलगाम टीका करतात, असे वेळोवेळी घडते. मोदींचा द्वेष एवढा कशासाठी? सरकारच्या एखाद्या निर्णयाला विरोध असू शकतो, सरकारच्या न आवडणाऱ्या भूमिकेबद्दल जाब विचारता येतो, पण नरेंद्र मोदी या व्यक्तीविषयी असभ्य भाषेत काँग्रेसचे नेते टीकाटिप्पणी का करतात?
केंद्रात आणि देशातील डझनभर राज्यातील काँग्रेसची सत्ता मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपने हिसकावून घेतली याचा राग काँग्रेसला असू शकतो. पण त्यांना मौतका सौदगार म्हणून हिणवणे किंवा मतमोजणी झाल्यावर तुमची औकात दिसेल, अशा धमक्या देणे, हे लोकशाहीत आणि भारतीय संस्कृतीत कितपत योग्य आहे?
साऱ्या देशाचे लक्ष गुजरात विधानसभेच्या निवडणुकीकडे लागले आहे. एकशे ब्याऐंशी जागांसाठी ही निवडणूक दोन टप्प्यांत होत आहे. येत्या १ डिसेंबर रोजी ८९ आणि ५ डिसेंबर रोजी ९३ जागांसाठी मतदान होणार आहे. मतमोजणी ८ डिसेंबर रोजी होईल आणि गांधी नगरमधील सत्ता सिंहासनावर कोणी बसायचे, हे स्पष्ट होईल. आता सलग सातव्यांदा गुजरातची सत्ता भाजप काबीज करणार का? याकडे सर्व देशाचे लक्ष लागले आहे.
गुजरातमध्ये निवडणूक ब्रँड मोदी या मुद्द्यावर लढवली जात आहे. राज्याचा मुख्यमंत्री कोण आहे किंवा काँग्रसचा प्रदेशाध्यक्ष कोण आहे, यापेक्षा मोदी या व्यक्तीभोवतीच ही निवडणूक फिरत आहे. गेली अनेक वर्षे गुजरातमध्ये काँग्रेस आणि भाजप हे दोनच पक्ष एकमेकांच्या विरोधात जिद्दीने लढत आहेत. पण यंदाच्या २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष (आप) मैदानात उतरल्याने निवडणूक चुरशीची बनली आहे. नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी विरुद्ध अरविंद केजरीवाल असे निवडणुकीला स्वरूप प्राप्त झाले आहे. इतकी वर्षे विधानसभा असो की लोकसभा, नेहमी दुरंगी लढत होत असे, यंदा मात्र तिरंगी लढत बघायला मिळत आहे. सन १९८९ पूर्वी केंद्रात व देशातील बहुसंख्य राज्यांत काँग्रेसची सत्ता होती. त्या काळात काँग्रेसला आव्हान देणारे नरेंद्र मोदी हे तेव्हा दिग्गज नेते नव्हते. १९८० मध्ये स्थापन झालेल्या भारतीय जनता पक्षाचे अटलबिहारी वाजपेयी व लालकृष्ण अडवाणी हे सर्वाधिकार असलेले उत्तुंग नेते होते. निवडणुकीच्या राजकारणात भाजप नवीन होता. काँग्रेस हाच प्रमुख राजकीय शत्रू असल्याने इतरांशी जमवून घेणे किंवा इतरांशी सलोख्याचे संबंध ठेवून निवडणुकीत जागा वाटप करणे हे भाजपला नाईलाजाने करावे लागत असे. १९८९ मध्ये गुजरातमधील चिमणभाई पटेल यांच्या जनता दलाशी भाजपने जागा वाटपाची बोलणी सुरू केली होती. तेव्हा पक्षात युवा नेते असलेले व भाजपच्या अहमदाबाद युनिटचे सचिव असणारे नरेंद्रभाई मोदी यांनी चिमणभाईंच्या पक्षाशी जागा वाटप करू नये, भाजपने स्वतंत्रपणे निवडणूक लढवावी, अशी आग्रही भूमिका घेतली होती. पण अडवाणींनी मोदींच्या मागणीकडे दुर्लक्ष केले. प्रत्यक्ष निवडणुकीत भाजपला सर्वाधिक यश मिळाले व भाजप नंबर १ चा पक्ष म्हणून निवडून आला. तेव्हापासून भाजपने गुजरातमध्ये कधी मागे वळून बघितले नाही.
गेल्या तीस वर्षांत गुजरातमध्ये भाजप एकाही निवडणुकीत पराभूत झाली नाही. गेल्या तीन दशकांत गुजरात हा भाजपचा भक्कम गड बनला आहे. या राज्यावर भाजपने आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. १९९८ मध्ये सोनिया गांधी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष झाल्या, त्यानंतर काँग्रेसने मित्रपक्षांची यूपीए नावाची आघाडी बनवून पुन्हा केंद्रातील सत्ता प्राप्त केली, पण केंद्रात यूपीए सत्तेवर असतानाही काँग्रेसला कधी गुजरात जिंकता आलेले नाही.
सोनिया गांधींनी केंद्रात सत्ता मिळवली आणि मोदींचा राष्ट्रीय पातळीवर उदय झाल्यानंतर सत्ता गमावली. पण सोनियांना एकदाही गुजरात जिंकता आलेले नाही. काँग्रेसने भाजपशी या राज्यात सातत्याने चुरशीने टक्कर दिली. काँग्रेसला पारंपरिक जनाधार या राज्यात आहे. मोदी गुजरातमध्ये मुख्यमंत्री असतानाही काँग्रेसने ३८ ते ४१ टक्के मते मिळवली आहेत. सन २०१७ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला ४९.१ टक्के मते मिळाली होती व काँग्रेसला ४१.४ टक्के मते पडली होती.
केजरीवालांच्या ‘आप’मुळे निवडणुकीतील रंगत वाढली आहे. पण काँग्रेस व ‘आप’ यांच्यात असलेली स्पर्धा दोन नंबरसाठी आहे, असे दिसते. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेतून ते काँग्रेसला संजीवनी देण्याचा प्रयत्न करीत आहेत. भारत जोडोचा गुजरातच्या निवडणुकीत काँग्रेसला किती उपयोग होईल हे सांगणे कठीण आहे. दिल्ली आणि पंजाब जिंकून त्या राज्यात काँग्रेस आणि भाजपचा पराभव करणाऱ्या ‘आप’ने गुजरातमध्ये आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. गुजरातमध्ये आपची हवा निर्माण करण्यासाठी केजरीवाल व त्यांच्या सहकारी नेत्यांनी कंबर कसली आहे. पण मोदींच्या झंझावातापुढे आपल्याला किती यश मिळणार?
निवडणूक पूर्व केलेल्या एका पाहणीत यंदा आप विधानसभेत आपले खाते उघडू शकेल, पण पुढील निवडणुकीत आप हाच भाजपचा प्रमुख विरोधक राहील, असे अनुमान काढले जात आहे. निवडणूक प्रचारात मोदींची औकात काढून काँग्रेसने स्वत:चा पराभव निश्चित केला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मधुसूदन मिस्त्री म्हणाले, मोदींची काय औकात आहे, हे त्यांना दाखवून देऊ.… त्यावर मोदींनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. मोदी म्हणतात, औकात काढणे हा काँग्रेसचा अहंकार आहे. ते राजघराण्यातून आले आहेत, यापूर्वी मला त्यांनी काय काय संबोधले आहे? मला काँग्रेसने नीच म्हटले, घाणेरड्या नाल्यातील किडा म्हणून संबोधले, मौत का सौदागरही ठरवले. आता म्हणतात, माझी औकात नाही…. अरे विकासाच्या मुद्द्यावर बोला ना…, एक काळ असा होता, गुजरातमध्ये सायकल बनत नव्हती, आता विमानांची निर्मिती सुरू होत आहे. गावात वीज, पाणी, रस्ते पोहोचले या विषयांवर काँग्रेस का बोलत नाही?
भाजपने सत्तेवर असताना कामगिरीचा उच्चांक गाठला आहे. माझी औकात दाखविण्याची काहीही गरज नाही. मी तर जनतेचा सेवक आहे, गरीब घराण्यात जन्मलेलो आहे. सेवादाराला औकात नसते. …निवडणूक प्रचारात मेधा पाटकर या राहुल गांधींच्या बरोबर फिरताना दिसतात. मोदींनी त्यांचे नाव न घेता म्हटले, नर्मदा प्रकल्पाने गुजरातचे जीवन बदलले. नर्मदा प्रकल्प ज्या महिलेने तीन दशके विरोध करून ठप्प केला होता, त्या आज काँग्रेस नेत्यांबरोबर निवडणुकीत फिरत आहेत…. गेल्या वर्षभरात गुजरातला दोन लाख कोटींचे प्रकल्प मिळाले आहेत. गेली २७ वर्षे भाजप गुजरातमध्ये सत्तेवर आहे, आता पुढील पाच वर्षे निश्चित असणार, असा विश्वास मोदी – शहा – नड्डांसह भाजपचे सर्व नेते बोलून दाखवत आहेत.
जानेवारी २००१ मध्ये कच्छमध्ये मोठा भूकंप झाला. १३०० जणांचा मृत्यू झाला, त्या भागात स्मृती वन स्मारक भाजप सरकारने उभारले आहे. २००२ मध्ये मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपने विधानसभा लढवली व १२७ आमदार निवडून आले, २०१२ मध्ये मोदी मुख्यमंत्री होते, तेव्हा मै मोदी का कार्यकर्ता हूँ, अशी मोहीम भाजपने राबवली होती. २०१७ च्या निवडणुकीत हून चू विकास, हून चू गुजरात (मै विकास हूँ, मै गुजरात हूँ) ही भाजपची घोषणा होती. गेल्या तीन दशकांत प्रत्येक निवडणुकीत भाजपने काँग्रेसवर मात केली. भाजपचे भूपेंद्र पटेल तर ‘आप’चे इसदून गढवी हे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार आहेत. काँग्रेसने मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर केलेला नाही. सरदार वल्लभभाई पटेल यांचा भव्य व उत्तुंग पुतळा हा गुजरातच्या अस्मितेचे व देशभक्तीचे प्रतीक आहे. भाजपचे लक्ष्य १५० आहे.
-डॉ. सुकृत खांडेकर
माझे कोकण: संतोष वायंगणकर गरिबी आहे, घरची परिस्थिती नाही यामुळे पुढे शिक्षण घेता येत नाही…
वैशाली शिरोडकर: पहलगाम निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेला काश्मीरचा भाग दहशतीच्या सावटाखालीही फुलतो आहे. गेल्या चार-पाच…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण वरुथिनि एकादशी, शके १९४७. शततारका नक्षत्र. योग ब्रम्हा. चंद्र राशी…
भारताचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी दहशवाद्यांनी निष्पाप पर्यटकांवर हल्ला करून २८ जणांची…
हैदराबाद: इंडियन प्रीमियर लीग २०२५मधील ४१व्या सामन्यात आज २३ एप्रिलला मुंबई इंडियन्स संघाने सनरायजर्स हैदराबादला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली…