Thursday, July 10, 2025

Maritime Security : सागरी सुरक्षासाठी आता अ‍ॅपची होणार मदत

Maritime Security : सागरी सुरक्षासाठी आता अ‍ॅपची होणार मदत

अलिबाग (प्रतिनिधी) : रायगडच्या सागरी सुरक्षेसाठी (Maritime Security) आता पोलिसांकडून ‘इगल आय’ अॅपची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे सागरी सुरक्षेवर रायगड पोलिसांकडून विशेष लक्ष दिले जाणार आहे.


तसेच किनाऱ्यासह समुद्रातील प्रत्येक संशयित हालचालीवर नजर ठेवण्यासाठी हे अॅप उपयुक्त ठरणार आहे. बोटींना देण्यात आलेल्या बारकोडमार्फत बोटींवरील खलाशी, इतर कामगारांची माहिती एका क्लिकवर सहज उपलब्ध होणार आहे.


रायगड जिल्ह्याला २४० किलो मीटरचा विस्तीर्ण समुद्र किनारा लाभला आहे. सागरी मार्गाने दहशतवादी हल्ले झाल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहे. किनारे बळकट करण्यासाठी समुद्र मार्गे गस्त वाढविण्यात आली. मासेमारीसाठी जाणाऱ्या बोटी, खलाशी, तांडेल यांची माहिती नोंदवण्यासाठी रायगड पोलिसांमार्फत २०१८ पासून ‘इगल आय अॅप’ सुरू करण्यात आले.


पोलीस अधीक्षक कार्यालयातील सागरी सुरक्षा विभाग व मत्स्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम हाती घेण्यात आला. आतापर्यंत जिल्ह्यातील तीन हजार बोटींची नोंदणी अॅपद्वारे केली आहे. प्रत्येक बोटीला बारकोड बसवला असून तो स्कॅन करून बोटीतील सर्व माहिती एका क्लिकवर मिळण्यास मदत होते. त्यामुळे सागरी सुरक्षेवर आता गरूड वॉच राहणार आहे.


इगल आय अॅपच्या माध्यमातून सागरी मार्गावरील बोटींची माहिती ऑनलाईन मिळते. ती माहिती नियंत्रण कक्षामार्फत नियमितपणे घेण्याचे काम केले जात आहे. गस्त घालणे, बोटीवर किती माणसे आहेत, याची अचूक माहिती पोलिसांना मिळते. बारकोट स्कॅन केल्यावर बोटीतील मालकांसह सर्व माहिती उपलब्ध होते. अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करीत सागरी सुरक्षा अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. - अतुल झेंडे, अपर पोलीस अधीक्षक, रायगड

Comments
Add Comment