Thursday, June 19, 2025

Roha canal : कालव्याच्या दुरुस्तीला मुहूर्त सापडेना 

Roha canal : कालव्याच्या दुरुस्तीला मुहूर्त सापडेना 

रोहा (वार्ताहर) : आंबेवाडी, किल्ला ते निवी कालव्यासाठी येथील शेतकऱ्यांनी सुरू केलेले आंदोलन, (Roha canal) उपोषण पाटबंधारे प्रशासनाकडून डिसेंबर, जानेवारी दरम्यान पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन मिळाल्याने थांबले होते.


मात्र डिसेंबर अखेर पाणी सोडण्याच्या दृष्टीने अद्याप कालव्याची साफसफाई, दुरुस्तीला सुरुवात केली गेली नसल्याने विभागातील ग्रामस्थ, समन्वय समितीने याबाबत स्पष्ट नाराजी व्यक्त केली आहे. तर कालव्याला पाणी आणणारच असा शेतकऱ्यांचा निर्धार असून पाण्यासंदर्भात लवकरच प्रशासकीय बैठक घेणार असल्याचे समितीने स्पष्ट केले आहे.


कालव्याचे पाणी पाटबंधारे विभागाने दुरुस्तीच्या नावाखाली बंद केले. नको तिथे मोऱ्या, काँक्रिटीकरण कामावर करोडो रुपये शासकीय निधीची उधळपट्टी केली. कामे अर्धवट, निकृष्ट करून करोडोंचा गैरव्यवहार झालेला आहे. त्यासंबधी तक्रारी व चौकशीची मागणी कायम आहे. कालवा दुरुस्तीसाठी पाणी तुम्ही बंद केलेत, आता पाणी तुम्हीच सोडा, अशी आग्रही मागणी अनेक वर्षापासून ग्रामस्थांची आहे. अखेर यावर्षी आम्ही कालव्याला पाणी घेतल्याशिवाय राहणार नाही, असा आक्रमक पवित्रा विभागातील ग्रामस्थांनी घेतला. त्या भूमिकेला आंबेवाडी, संभे, पाले, किल्ला ग्रामस्थांनीही मोठे पाठबळ दिले.


पाण्यासाठी अल्टिमेटम देत ग्रामस्थ आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम राहिले. त्यातच सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र जाधव यांनी डिसेंबरला पाणी सोडण्यासाठी आमरण उपोषणाचा इशारा दिला. त्यानंतर पाटबंधारे प्रशासन नरमले. रोहा तहसील कार्यालयात महत्वाची बैठक झाली. बैठकीला रायगड पाटबंधारेच्या कार्य. अभियंता दीपेश्री राजभोज, तहसीलदार कविता जाधव, समन्वय समितीचे विठ्ठल मोरे, राजेंद्र जाधव, तुकाराम भगत, राकेश बामगुडे, संदेश मोरे, किशोर कळंबे, मारुती फाटक, ज्ञानेश्वर दळवी व ग्रामस्थउपस्थित होते.


बैठकीत उपोषण मागे घ्यावे, डिसेंबर अखेर कालव्याला पाणी सोडले जाईल असे लेखी आश्वासन प्रशासनाच्या वतीने मुख्य कार्यकरी अभियंता दीपेश्री राजभोज यांनी दिले. त्यानंतर आमरण उपोषण तूर्तास स्थगित करण्यात आले. कालवा प्रचंड नादुरुस्त आहे. दुरुस्तीची कामे लवकर हाती घेणे गरजेचे आहे, मात्र आजमितीस कालव्याचे कोणतेच काम सुरू नाही, साफसफाई दुरुस्तीला मुहूर्त कधी सापडणार ? असा सवाल उपस्थित झाला आहे.


पाटबंधारे विभागाकडून दुरुस्तीच्या कामात दिरंगाई होत असल्याचे चित्र दिसत असताना कालवा साफसफाई व दुरुस्तीसाठी तांत्रिक विभाग ॲक्शन मोडवर आहे, अशी मोघम उत्तरे संबधीत पाटबंधारे अधिकाऱ्यांनी दिल्याने कालव्याच्या पाण्यासाठी आंदोलनाच्या भूमिकेत सज्ज रहा, असे आवाहन कालवा समन्वय समितीने पुन्हा केले आहे.

Comments
Add Comment