Thursday, June 12, 2025

MahaAwas Yojana : ठाणे जिल्हा परिषदेचा एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गौरव

MahaAwas Yojana : ठाणे जिल्हा परिषदेचा एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गौरव

ठाणे (प्रतिनिधी) : केंद्र आणि राज्य शासनाच्या महाआवास अभियानातंर्गत (MahaAwas Yojana) उत्कृष्ट कामगिरी करून राज्यात तिसरा क्रमांक मिळाल्याबद्दल ठाणे जिल्हा परिषदेचा मुंबईत झालेल्या राज्यस्तरीय कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.


केंद्र आणि राज्य पुरस्कृत घरकुल योजनांना गतिमान करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून २० नोव्हेंबर २०२० ते ५ जून २०२१ कालावधीत महा आवास अभियान राबविण्यात आले. या अभियानाची ठाणे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास यंत्रणेने ग्रामीण भागात प्रभावी अंमलबजावणी केल्याबद्दल प्रधानमंत्री आवास योजनेच्या ‘सर्वोत्कृष्ट जिल्हा’ या पुरस्कार गटात जिल्हा परिषदेला तिसरा तर राज्य पुरस्कृत योजनेंतर्गत ‘सर्वोत्कृष्ट बहुमजली इमारत’ या पुरस्कार गटात भिवंडी तालुक्यातील चिंचवली ग्रामपंचायतीला प्रथम पुरस्काराने गौरविण्यात आले.


नव्याने सुरू होत असलेल्या अमृत महाआवास अभियान कालावधीत सन २०२१-२२ करिता प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण करीता ठाणे जिल्ह्याला २८१८ घरकुलांचे उद्दिष्ट मिळाले आहे. यापैकी २३३० लाभार्थ्यांना मंजुरी देण्यात आलेली असून उर्वरीत ४८८ मंजुरीची कार्यवाही सुरू आहे. तसेच आदिम, रमाई, शबरी या राज्य पुरस्कृत योजनांकरिता ८९७ चे उद्दिष्ट प्राप्त असून त्यापैकी ६४२ मंजुरी देण्यात आलेली आहे.


२५५ मंजुरीची कार्यवाही सुरू आहे. ही सर्व मंजूर घरकुले १०० दिवसांत पूर्ण करून राज्यामध्ये अव्वल कामगिरी बजावत अमृत महाआवास अभियानाअंतर्गत प्रथम क्रमांक पटकावण्याकरिता प्रयत्नशील असल्याचे ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांनी यावेळी सांगितले.

Comments
Add Comment