Friday, June 20, 2025

Refinery Project : कोकणचा चेहरामोहरा बदलणाऱ्या रिफायनरीचे स्वागतच!

Refinery Project : कोकणचा चेहरामोहरा बदलणाऱ्या रिफायनरीचे स्वागतच!

रत्नागिरी : रिफायनरीसाठी कोयनेचे पाणी वापरायचा निर्णय स्वागतार्हच आहे. (Refinery Project) परंतु रिफायनरीची १.५५ टीएमसी गरज भागल्यावर उर्वरित पाणी किमान वाटेतील कोकणातील गावांना पिण्याकरिता व सिंचनाकरिता उपलब्ध करून दिल्यास कोकणातील महिलांच्या डोक्यावरील हंडा खाली उतरू शकतो, असे मत अॅड.विलास पाटणे यांनी व्यक्त केले आहे.


कोयना धरण सातारा जिल्ह्यात असून लांबी ८०७ मीटर तर उंची १०३ मीटर आहे. कोयना धरणाची साठवण क्षमता १०५.२५ टीएमसी एवढी आहे. याबाबत २००५ साली महाराष्ट्र शासनाने नेमलेल्या पेंडसे कमिटीने सकारात्मक अहवाल दिला होता. तसेच जलसंपदा विभागले २०१८ साली या प्रकल्पाचा अभ्यास करण्याकरीता निविदा काढली होती. परंतु सरतेशेवटी वर्कऑर्डर न काढल्याने गाडी पुढे सरकली नाही.


समुद्राचे पाणी निक्षरीकरण करण्याचा पर्याय खर्चिक तर आहेच शिवाय पर्यावरणावर परिणाम करणारा आहे. अर्जुना नदीचा पर्याय समोर आहे परंतु अर्जुनाचे पाणी प्रामुख्याने सिंचनाकरिता वापरायचे असा निर्णय होता. नाहीतर शेतकऱ्यांचे पाणी पळविले अशी ओरड सुरू होईल. सरतेशेवटी कोयनेचे वाशिष्ठी नदीत वाहून जाणारे पाणी रिफायनरीसाठी आणि कोकणच्या जनतेला पाणी पिण्यासाठी व सिंचनासाठी वापरणे जास्त व्यवहार्य होईल. परंतु हे पाणी मुंबई किंवा तळकोकणात नेणे व्यवहार्य होणार नाही, असे मत अॅड.पाटणे यांनी व्यक्त केले आहे.



Insurance : गॅस कनेक्शनशी संबंधित अधिकारांबद्दल हे माहिती आहे का?


या पाण्यामुळे कोकणात आंब्याप्रमाणे तसेच इतरही विविध फळबागा विकसित करणे उचित होईल. मत्स्य संवर्धन यासाठी या पाण्याचा उपयोग करता येईल. पाणी ज्या प्रदेशातून वाहते तेथील जनतेचा पाण्यावरचा समान हक्क ‘रिपरिअन राइट’ प्राधान्याने मान्य केला पाहिजे. कोकणातील महिलांच्या डोक्यावरचा हंडा खाली उतरविण्यासाठी महाराष्ट्र शासन न्यायाची भूमिका घेईल यात शंका नाही. मात्र असे झाले नाहीतर ‘अतिवृष्टीमुळे पावसाळ्यात नाकातोंडात पाणी आणि उन्हाळ्यात तीव्र पाणी टंचाईने डोळ्यात पाणी’ हे कोकणातील दुष्टचक्र असेच सुरू राहिल. यासाठी शासनाने सकारात्मक दृष्टीने विचार करून कोकणचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी सक्रिय प्रयत्न केले पाहिजेत.

Comments
Add Comment