Friday, July 11, 2025

Pandharpur : पंढरपूरमधील स्थानिकांचा कर्नाटकात जाण्याचा इशारा

Pandharpur : पंढरपूरमधील स्थानिकांचा कर्नाटकात जाण्याचा इशारा

आषाढीच्या महापूजेला बोम्मईंना बोलावणार


पंढरपूर : एकीकडे सीमावर्ती भागातल्या चाळीस गावांवर कर्नाटकने दावा केला आहे. तर दुसरीकडे पंढरपूरच्या (Pandharpur) नागरिकांनी चक्क कर्नाटकात जाण्याचा इशारा दिला आहे. चंद्रभागेच्या तीरावर होणाऱ्या कॉरिडॉरला विरोध म्हणून नागरिक आक्रमक झाले आहेत. आमच्या मागण्यांचा विचार केला नाही, तर येणाऱ्या आषाढीच्या महापूजेला कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मईंना बोलावू, असा इशाराही त्यांनी दिला आहे.


पंढरपूर कॉरिडॉरला विरोध करत नागरिकांनी आज विठ्ठल-रुक्मिणी मंदिरासमोर आंदोलन केले. येणाऱ्या काळात यावरून वाद पेटण्याची शक्यता आहे.


वाराणसी आणि उज्जैनच्या धरतीवर पंढरपूर येथे कॉरिडॉर करण्याची घोषणा सरकारने केली आहे. या कामासाठी मंदिर परिसरातील तीनशे घरे आणि दोनशे दुकाने पाडण्यात येणार असल्याचे समजते. त्यामुळे येथील नागरिक आणि व्यापारी धास्तावले आहेत. त्यांनी या कॉरिडॉरला विरोध सुरू केला आहे. प्रशासनाने याबाबत हरकती, सूचना मागवल्या. विकास आराखडा तयार केला. मात्र, या साऱ्या कामात आम्हाला विश्वासात घेतला नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पंढरपूर बचाव समितीने याविरोधात आंदोलन छेडले आहे.


पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी नुकतीच पंढरपूर कॉरिडॉरची घोषणा केली. त्यासाठी तीनशे कोटींचा निधी राखून ठेवल्याचे ते म्हणाले. यासाठी केंद्र आणि राज्य सरकार दोघेही खर्च करणार आहेत. उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात झालेल्या कामांच्या धर्तीवर येथे काम होणार आहे. पंढरपुरातल्या गल्ल्या, रस्ते, घाट, मठ, मंदिरे, पालखी मार्ग, चंद्रभागा तीराचा विकास करण्याचा सरकारचा मानस आहे.


पंढरपूर कॉरिडॉरसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने १५०० कोटींच्या ऑनलाइन निविदा मागविल्या आहेत. त्यासाठी उद्या २६ डिसेंबर पर्यंत निविदा भरता येणार आहेत. या निविदा २९ डिसेंबर रोजी उडण्यात येतील. टाटासह तब्बल १५ कंपन्यांनी या कामात उत्सुकता दाखवली आहे. त्यामुळे विरोधी तीव्र होताना दिसत आहे. यापू्र्वी नागरिकांनी मोर्चा काढत विरोध केला. आताही नागरिकांनी आपली दुकाने, घरांवर काळे फलक लावत निषेध सुरू केला आहे.

Comments
Add Comment