Wednesday, October 9, 2024
Homeक्रीडाkho-kho tournament : महाराष्ट्राच्या महिला संघाचे विजेतेपद कायम

kho-kho tournament : महाराष्ट्राच्या महिला संघाचे विजेतेपद कायम

राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा

उस्मानाबाद (वार्ताहर) : यजमान महाराष्ट्राच्या महिला खो-खो (kho-kho tournament) संघाने ५५ व्या राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेचे विजेतेपद कायम राखले. महाराष्ट्राच्या महिलांचे हे २४ वे अजिंक्यपद ठरले आहे.

भारतीय खो-खो महासंघ व महाराष्ट्र खो-खो असोसिएशन यांच्या मान्यतेने उस्मानाबाद जिल्हा खो-खो असोसिएशनने ही स्पर्धा आयोजित केली होती. येथील तुळजाभवानी जिल्हा क्रीडा संकुलात झालेल्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राच्या महिला संघाने भारतीय विमान प्राधिकरण संघावर ११-९ असा डावाने शानदार विजय मिळविला.

महाराष्ट्राच्या पहिल्या तुकडीनेच संरक्षणाची भक्कम बाजू सांभाळली. प्रियांका इंगळे (३.३० मिनिटे व २ गुण), अपेक्षा सुतार ( २.२० व १.१० मिनिटे व १ गुण) यांनी अष्टपैलू खेळी केली. पूजा फरगडेने ४ गडी बाद करीत आक्रमणाची बाजू सांभाळली. दुसऱ्या डावात रेश्मा राठोड २.२० व दिपाली राठोडने २.३० मिनिटे संरक्षण केले. भारतीय विमान प्राधिकरण संघाकडून वीणा (१.१० मिनिटे नाबाद), ऋतुजा खरेने (१.२० मिनिटे), जान्हवी पेठेने (१.०० मिनिटे व १ गुण) संरक्षण करीत एकाकी लढत दिली.

पुरुष गटात रेल्वे सुसाटच

पुरुषांच्या गटात भारतीय रेल्वेने यजमान महाराष्ट्रावर १४-१२ असा ४५ सेकंद राखून विजय मिळवित हॅटट्रिक केली. रेल्वेचे हे ११वे विजेतेपद आहे. नाणेफेक जिंकून रेल्वेने संरक्षण स्वीकारले.

महाराष्ट्राने पहिल्या आक्रमणात ६ गडी बाद केले. रेल्वेने ७ गडी बाद करीत मध्यंतरास एका गुणाची निसटती आघाडी घेतली. महाराष्ट्राने दुसऱ्या डावातही ६ गडी टिपले. विजयासाठी रेल्वेला ६ गुण मिळवायाचे होते. त्यांनी ७ गुण मिळवित हॅटट्रिक केली.

रेल्वेकडून अक्षय गणपुले (२.०० व १.३० मिनिटे), महेश शिंदे (१.५० व १.४० मिनिटे व २ गुण), अमित पाटील (१.३० मिनिटे व १गुण), विजय हजारे (१.१० मिनिटे), मिलिंद चौरेकर ३ गुण यांनी शानदार खेळी केली. महाराष्ट्रकडून रामजी कश्यप (१.४० व १.३० मिनिटे व १ गुण), प्रतिक वाईकर ( १.५० मिनिटे), अक्षय भांगरे (१.१० मिनिटे व ४ गुण) यांनी लढत दिली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -