
बैतुल : मध्य प्रदेशातील बैतुल येथील १७ वर्षांची आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल खेळाडू प्रार्थना साळवे (Prarthana Salve) हिने धरणात उडी घेत आत्महत्या केली. तिच्या निधनाने क्रीडा विश्वात शोककळा पसरली आहे.
काही दिवसांपूर्वी तिच्या भावाचा मृत्यू झाला होता. त्यामुळे ती अत्यंत व्यथित झाली होती. हे दु:ख ती सहन करु शकली नाही. त्यातच काही दिवसांपूर्वी तिचं लिगामेंट तुटलं होतं, त्यामुळे देखील ती अत्यंत निराशेत होती. त्यामुळे तिने आत्महत्येसारखं टोकाचे पाऊल घेतले.
प्रार्थना साळवे भारतासाठी आंतराष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धा खेळलेली आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच एसडीआरएफच्या पथकाने घटनास्थळ गाठून गुरुवारी तिचा मृतदेह बाहेर काढला आणि पोलिसांच्या ताब्यात दिला. त्याचबरोबर पोलिसांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.
आगीत जळून भावाचा मृत्यू झाला, त्यानंतर तिचं लिगामेंट तुटलं, त्यामुळे तिला तिच्या करिअरची चिंता सतावत होती. एकामागून एक घडलेल्या या दोन घटनांमुळे प्रार्थना पूर्णपणे निराश झाली होती. ती इतकी नैराश्यात गेली होती की तिने घरच्यांशी बोलणंही बंद केलं होतं.
बुधवारी रात्री ती घरातून स्कूटी घेऊन निघाली आणि थेट धरणावर पोहोचली. धरणाच्या काठावर उभी राहून तिने तिच्या कुटुंबीयांना व्हॉईस मेसेज पाठवला, की ती जात आहे. कुटुंबीयांना काही कळेल त्यापूर्वीच तिने धरणात उडी घेतली. त्यानंतर कुटुंबीयांनी तात्काळ याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी एसडीआरएफच्या मदतीने शोध मोहीम सुरू केली आणि दुसऱ्यादिवशी गुरुवारी तिचा मृतदेह धरणातून बाहेर काढण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील कलापठा परिसरात राहणाऱ्या प्रार्थना साळवेने व्हॉट्सअॅपवर तिच्या कुटुंबीयांना पाठवलेला व्हॉईस मेसेज सुसाईड नोटसारखा आहे. यामध्ये तिने भावाच्या निधनाचे दु:ख झाल्याचे म्हटले आहे. हा धक्का तिला सहन होत नाहीये आणि उरली सुरली हिम्मत ही लिगामेंट तुटल्याने खचली आहे. आता जगून उपयोग नाही. तिचा हा मेसेज ऐकून कुटुंबीयांच्या पायाखालची जमीनच सरकली.