Konkan Railway : कोकण रेल्वे: स्वप्न नव्हे सत्य!

कोकणात रेल्वे धावणे हे खरं तर स्वप्नच होतं. आमच्या लहानपणी कोकण रेल्वेची (Konkan Railway) चर्चा व्हायची; परंतु कोकणातील दऱ्या-खोऱ्यांतून, डोंगरकपारीतून शेत तुडवत कोकणात रेल्वे येईल असं त्यावेळी कोणालाच वाटलं नव्हतं. त्यामुळे पहिला टप्पा रोहापर्यंत होता.


पुढे खेड आणि मग सावंतवाडी आणि मग पुढे गोवा, कर्नाटक, केरळ या राज्यांतून कोकणकन्या धावू लागली. कोकणात रेल्वे सुरू होण्यासाठी कै. प्रा. मधू दंडवते, जॉर्ज फर्नांडिस या दोघांचाही पुढाकार होता. कोकण रेल्वे महामंडळाचे कार्यकारी अध्यक्ष ई. श्रीधरन यांचे अपार कष्ट, मेहनत आणि वेळेचे योग्य नियोजन यातून कोकण रेल्वेचा हा मार्ग पूर्ण होऊ शकला.


आजही कोकण रेल्वेतून प्रवास करणाऱ्यांना डोंगरदऱ्यातून प्रवास करताना हे सहज जाणवत असेल. प्रा. मधू दंडवते यांच्या एका लोकसभा निवडणुकीत डब्यांवर कोकण रेल्वे असं लिहून डब्यांची वरातही काढली गेली. या अशा जिव्हारी लागणाऱ्या टीकेनेही प्रा. मधू दंडवते अजिबात विचलित झाले नाहीत. पुढच्याच दोन वर्षांत कोकण रेल्वेच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवातही झाली होती. तरीही आपला इरसाल कोकणी माणूस विश्वास ठेवेल, तर तो कोकणातील कसा? मग गाडी वळवणार कशी? नदीतून जाणार कशी? डोंगराचं काय करणार? असे एक ना अनेक प्रश्न त्यांच्या मनात होते. या प्रश्नांची चर्चा अवघ्या कोकणात तेव्हा चहाच्या टपरीवर गरमागरम चहा आणि भजीचा आस्वाद घेताना सुरू असायची, ऐकायला मिळायची; परंतु १९६६ साली दिवा-पनवेल १९८६ साली रोहापर्यंत धावली. १९९० साली रेल्वेमंत्री जॉर्ज फर्नांडिस आणि अर्थमंत्री प्रा. मधू दंडवते असताना स्वतंत्र कोकण रेल्वे महामंडळाची स्थापना करण्यात आली. ई. श्रीधरन यांची या महामंडळाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. पुढच्या आठ वर्षांत मुंबई ते कोकण रेल्वे धावू लागली. २६ जानेवारी १९९८ साली या कोकण रेल्वे मार्गावर कोकण रेल्वे खऱ्या अर्थाने धावू लागली. आज २४ वर्षं कोकण रेल्वेला पूर्ण झाली आहेत.


या काळात कोकण रेल्वेमध्ये अनेक सुधारणा घडत गेल्या. आता तर कोकण रेल्वे इलेक्ट्रिकवर धावतात, या कोकण रेल्वेचा विषय आज घेण्याचा आणि येण्याचं कारण एवढंच आहे. महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी कोकणातील रेल्वे स्थानकांकडे जाणाऱ्या रस्ते व रत्नागिरी, कणकवली रेल्वे स्टेशनच्या सुशोभीकरणाच्या संबंधी अधिकाऱ्यांची एक बैठक मंत्रालयात घेतली. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी एका महत्त्वाच्या विषयाकडे लक्ष वेधले आहे. पर्यटन विभाग असलेल्या कोकणातील रेल्वेस्थानकं विशेष वैशिष्ट्यपूर्ण असायला हवी होती; परंतु तशी ती नाहीत. रत्नागिरी, कुडाळ, कणकवली, सावंतवाडी, राजापूर, चिपळूण आदी रेल्वे स्टेशनच वैशिष्ट्य पूर्णतेने असली पाहिजेत. कोकणातील पर्यटन स्थळांची माहिती सर्वच रेल्वे स्टेशनवर असायला हवी.


सध्या रेल्वे स्टेशनचा असलेला ‘लूक’ बदलला पाहिजे. या सर्वांना पर्यटनाशी जोडलं जाणं आवश्यक आहे. सध्याची स्थिती कोकणातील बहुतांश रेल्वे स्टेशनवर पिण्याच्या पिण्याची व्यवस्था नाही. पाणीपुरवठा करणारे कुलर बंद आहेत. को.रे.चे कुलरद्वारे पुरविणारे पाणी शुद्ध होते; परंतु कोरोना काळात बंद झालेले कुलर पुन्हा कोणी सुरू केलेच नाहीत. ज्या मूलभूत सुविधा आणि त्या अानुषंगाने दिल्या जाणाऱ्या सुविधांचा विचार व्हायलाच हवा. कोकणवासीय फक्त रेल्वेत बसून मुंबईला जायला-यायला मिळतं एवढ्यावरच समाधानी आहेत. त्यामुळे यातल्या कुठल्याच बाबतीत कुणाचेच लक्ष नाही, अशी स्थिती आहे. कोकण रेल्वे महामंडळानेही या गैरसुविधांकडे लक्ष दिले पाहिजे. कोकण रेल्वे स्थानकांकडे जाणाऱ्या रस्त्यांच्या बाबतीत धोरणात्मक निर्णय घेतला जावा. जेणेकरून या बाबतीत सुधारणा घडू शकेल. हे सर्व एकाचवेळी घडेल अशी अपेक्षाही कोणी करणार नाही; परंतु महाराष्ट्र सरकारनेही कोकणाकडे, कोकणातील पर्यटन स्थळांकडे वेगळा दृष्टिकोन ठेवून पाहिलं पाहिजे. पर्यटन स्थळ विकसित करण्यात आली पाहिजेत. या नजीकच्या काळात हे घडेल, अशी अपेक्षा आहे.


-संतोष वायंगणकर

Comments
Add Comment

पाकव्याप्त काश्मीरमधील होरपळ

पाकव्याप्त काश्मीरमध्ये निदर्शक आणि सुरक्षा दलांमध्ये अलीकडेच झालेल्या हिंसक चकमकीत तीन पोलीस अधिकाऱ्यांसह

याला जबाबदार कोण?

सध्याच्या परिस्थितीत बेस्ट उपक्रम हा व्हेंटिलेटरवर आहे. या बेस्ट उपक्रमात कार्यरत आणि सेवानिवृत्त मराठी सेवक

नोबेलचाही राहिला सन्मान

नोबेल शांतता पुरस्कार जाहीर झाला आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे स्वप्न ‘चकनाचूर’ झाले. नोबेल

हुमनॉइड व्योममित्र: एक क्रांतिकारी पाऊल

भारताने मानव उड्डाणक्षेत्रात पाऊल ठेवण्याचा निर्धार केला असून त्याचा एक महत्त्वाचा भाग म्हणून ‘व्योममित्र’

शारीरिक आरोग्याइतकेच मानसिक समुपदेशन महत्त्वाचे

आजच्या वेगवान आणि तणावपूर्ण जीवनात, आपण अनेकदा आपल्या शारीरिक आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य देतो. नियमित

भारताची मोदीप्रणीत हनुमान उडी

संपूर्ण भारतात दीपावलीचे दिवे प्रज्वलीत केले जात असताना, वर्तमानाशी सुसंगत रामायणातील एक कालातीत दृश्य आपल्या