
मुंबई (प्रतिनिधी) : गोवरच्या (measles) वाढत्या रुग्णसंख्येमुळे पालिकेच्या चिंतेत भर घातली आहे. बुधवारी मुंबईत गोवरच्या १३ नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे मुंबईतील गोवर रुग्णांची संख्या २३३वर गेली आहे. दिवसभरात एका मृत्यूची नोंद झाली. भिवंडी येथील ८ महिन्यांच्या मुलाचा पालिकेच्या रुग्णालयात मृत्यू झाला आहे. बुधवारपर्यंत १२ जणांचा गोवरने मृत्यू झाला आहे.
गेल्या महिनाभरापासून गोवरने मुंबईला विळखा घातला आहे. दिवसेंदिवस वाढत असलेल्या रुग्णसंख्येमुळे पालिकेची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे पालिकाही अलर्ट मोडवर गेली असून विविध उपाययोजना करत आहे. रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी पालिकेने लसीकरणावर भर दिला आहे. आतापर्यंत पालिकेने ३५,७३,९७६ घरांचे सर्वेक्षण केले असून यात ३५३४ गोवर संशयित ताप आणि पुरळचे रुग्ण आढळले आहेत. पालिकेने आतापर्यंत ९९७१ लसीकरण केले आहे. सध्या ३० रुग्ण रुग्णालयात दाखल असून २२ जणांना उपचारानंतर सोडण्यात आले आहे.
दुसरीकडे मुंबईत गोवरचा २२ ठिकाणी उद्रेक झाला आहे. हे हॉटस्पॉट नियंत्रणात आणण्यासाठी पालिकेतर्फे लसीकरणाला वेग आला आहे. घरांच्या सर्वेक्षणाची मोहीमही जोरदार सुरू आहे. पालिकेकडून लोकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. कोणतीही लक्षणे आढळल्यास दुर्लक्ष न करण्याचे सांगण्यात आले आहे. गोवरची कोणतीही लक्षणे दिसल्यास तत्काळ उपचार घेण्याचे तसेच लहान मुलांचे लसीकरण पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.