Friday, July 11, 2025

Dengue fever : खारघरला बसतोय डेंग्यूचा विळखा

Dengue fever : खारघरला बसतोय डेंग्यूचा विळखा

नवी मुंबई (बातमीदार) : खारघरमध्ये साथीच्या आजाराने पुन्हा थैमान घातले आहे. दरम्यान आठवीतील विद्यार्थ्याचा डेंग्यूने (Dengue fever) मृत्यू झाल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.


ताप, हिवताप आणि डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. पनवेल महापालिकेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात ऑक्टोबर महिन्यात खारघरमधील डेंग्यूचे नऊ रुग्ण आढळल्याची नोंद आहे; मात्र खासगी रुग्णालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार शहरात डेंग्यूचे रुग्ण अधिक असल्याचे सांगितले जाते.


खारघरमधील अपिजय शाळेत आठवीत शिकणाऱ्या वेदांत शर्मा या विद्यार्थ्याचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला आहे. सिडकोने वसवलेल्या अद्ययावत शहरांमध्ये खारघरचा आवर्जून उल्लेख केला जातो. मोठे रस्ते, पदपथ, शिल्प चौक, तीन मंकी चौक, अनेक ठिकाणी हायमास्टच्या झगमगाटामुळे शहर सुंदर दिसत असले, तरी अनेक भागांत कचऱ्याचे ढीग, मलनिस्सारण वाहिन्या तुंबल्याने दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर वाहताना दिसते. त्यामुळे डासांची उत्पत्ती वाढल्याने ताप, हिवतापाच्या रुग्णांत वाढ झाली आहे.


ऑक्टोबर महिन्यात खारघरमध्ये डेंग्यूचे नऊ रुग्ण आढळून आले होते. शहरात डासांची उत्पत्ती होऊ नये यासाठी धुरीकरण आणि फवारणी केली जात आहे. - रेहाना मुजावर, आरोग्य अधिकारी, पनवेल महापालिका

Comments
Add Comment