Thursday, July 3, 2025

uday samant : मिऱ्या-नागपूर महामार्गाचे काम करताना स्थानिकांना विश्वासात घ्या

uday samant : मिऱ्या-नागपूर महामार्गाचे काम करताना स्थानिकांना विश्वासात घ्या

रत्नागिरी (प्रतिनिधी) : मिऱ्या नागपूर महामार्गाचे काम करताना स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊन काम करावे अशा सूचना राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी व रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत (uday samant) यांनी संबंधित विभागांना दिल्या. आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते.


बैठकीला जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पुजार, जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत गायकवाड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता ओटवणेकर, जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळे आदी उपस्थित होते. मिऱ्या नागपूर महामार्गाचे काम करत असताना कुवारबाव बाजारपेठेला अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. बाजारपेठेतील दुकाने सद्यस्थितीप्रमाणेच राहतील. बाजारपेठेच्या ठिकाणी उड्डाणपुलाच्या खालून जाणारा अंतर्गत रस्ता तयार करण्यात यावा, अशा सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी दिल्या.


ज्या नागरिकांच्या जमिनी महामार्गाकरिता संपादित केल्या जाणार आहेत, त्यांना त्याचा मोबदला लवकरात लवकर देण्यात यावा, असेही यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना ना. सामंत यांनी सांगितले. यावेळी कुवारबाव बाजारपेठेतील नागरिक उपस्थित होते.


राष्ट्रीय जलजीवन मिशन


पालकमंत्री उदय सामंत यांनी राष्ट्रीय जलजीवन मिशन योजनेंतर्गत कामाचा आढावा घेण्यात आला. या योजनेअंतर्गत मंजूर नळपाणी योजनेची कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत, अशा सूचना त्यांनी संबंधितांना दिल्या.


विविध विकासकामांचा आढावा


आज पालकमंत्री उदय सामंत यांनी विविध विकासकामांचा आढावा घेतला. यामध्ये मुख्यमंत्री सडक योजना, जनसुविधा, नागरी सुविधा, टंचाई आराखडा आदी विषयांचा आढावा घेतला. रस्ता दुरुस्ती व डांबरीकरणाची कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत. येत्या पंधरा दिवसांत टंचाईग्रस्त गावांचा आराखडा तयार करावा. रत्नागिरी नगर परिषद हद्दीतील सुशोभीकरणाची कामे पूर्ण करावीत, अशा सूचना ना. सामंत यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.


जिल्ह्यात बचत गट विक्री केंद्र जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून उभारण्यात येणार असल्याची माहिती यावेळी पालकमंत्र्यांनी दिली.

Comments
Add Comment