राष्ट्रसेविका समितीच्या सेविकांनी उभारलेल्या संघटना अनेक शहरांमध्ये दिसून येतात. (Rani Kittur) महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवर असलेल्या सोलापूर शहरातही चार ठिकाणी समितीच्या शाखा भरत असत.
समितीचे कार्य करण्यासाठी मनोरमा पटवर्धन, काशिताई कुळकर्णी, सुनंदा पेंडसे, कृपावती देशमुख, लीला गौतम, शांताबाई गोवईकर, माई अब्दुल पुरकर, विमलाबाई माणकेश्वर यांच्यासारख्या महिला एकत्र येत असत. समितीचे नियमित उत्सव त्याशिवाय लहान मुलांसाठी संस्कार वर्ग अशी कामे वेगवेगळ्या ठिकाणच्या जागा घेऊन, मैदानात केली जात असत. १९८८ साली त्यांना असे जाणवू लागलं की सामाजिक कार्य, समितीची शाखा, अभ्यास वर्ग, सर्व उत्सव तसेच समाजातले प्रश्न पाहून इतरही काही काम करायचे असेल, तर स्वतःची जागा असायला हवी आणि त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायला हवेत. सर्व सेविकांनी थोडेफार योगदान देण्याचे निश्चित केले. लीलाताई गौतम या ज्येष्ठ सेविका सेवासदन शाळेमध्ये शिक्षिका होत्या. त्या स्वतःहून म्हणाल्या की, मी काही योगदान द्यायला तयार आहे. मग जागेचा शोध सुरू झाला. सोलापूर हे महाराष्ट्र आणि कर्नाटक दोन्ही राज्यांच्या सीमारेषेवर येते. इथे कर्नाटकचाही थोडा पगडा आहे. त्याशिवाय लिंगायत समाजही मोठ्या प्रमाणावर आहे.
ज्याप्रमाणे उत्तरेकडे राणी लक्ष्मीबाई यांचे महत्त्व आहे, त्याचप्रमाणे दक्षिणेकडे शूर राणी कित्तूर चन्नम्मा यांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि त्यामुळे आपण राणी कित्तूर चन्नम्मा या अतिशय पराक्रमी राणीचे नाव या कार्याला द्यावे असे ठरले आणि जागेचा शोध सुरू झाला. सोलापुरातील सुप्रसिद्ध सरदार घराणे यांच्या मातोश्री यांनी मी सुद्धा आपल्याला मदत करेन असं सांगितल्यामुळे उत्साह दुणावला. सरदार घराण्यांतील त्यांचे सासरे आप्पासाहेब सरदार हे कित्तूर चन्नम्मा यांच्याकडे कारभारी म्हणून काम करायचे. त्यामुळे सोलापूरमधील तेव्हाच्या काही सेविका स्वतः कित्तूरला गेल्या. त्यानी तिथे राणीचे सर्व कार्य पाहिले. त्याशिवाय समितीच्या प्रातःस्मरणामध्ये कित्तूर चेन्नम्मा यांचं नावही आहे. त्यामुळे राणी कित्तूर चन्नम्मा स्मृतिभवन असं नाव ठेवायचं ठरलं आणि मग रक्कम जमा करण्यासाठी सभासद बनवणे, मनोरंजनाचे कार्यक्रम घेऊन पैसा गोळा करण्यास सुरुवात झाली. चारुशीला बेलसरे या सुप्रसिद्ध गायिकेचा गाण्याचा कार्यक्रम ठरवला. त्यातून काही निधी गोळा केला. त्या कार्यक्रमाला स्वतः पंचवार सरदारबाई उपस्थित होत्या. त्या कार्यक्रमात त्याने संपूर्ण सहकार्य देण्यास आश्वासन दिले. जुनी मिल कंपाऊंड त्यावेळेस बंद पडली होती आणि मिल कंपाऊंडमधील जागा प्लॉट पाडून विक्रीला आणली गेली होती. तिथे सेविकांनी एक प्लॉट घ्यायचं ठरवलं आणि पहिली रक्कम वीस हजार अशी दिली. आता जागेवर बांधकाम करण्याचा प्रश्न होता. १९८८ साली आजच्यासारखे बक्कळ पगार नव्हते. पैशाला किंमत होती. त्यामुळे सर्व सेविकांना पैसे देणं खरंतर जड होतं; परंतु केवळ राष्ट्रसेविका समितीच्या कार्यावर नितांत प्रेम आणि समाजासाठी काहीतरी करण्याची इच्छा असल्यामुळे समितीच्या सेविकांनी जमेल तशी रक्कम दिली. त्यांनी उभारलेल्या पैशातून या संघटनेची उभारणी झाली आहे. त्यासाठी समितीच्या सभासदांची संख्या वाढवण्यात आली. पूर्वी अडीचशे रुपये सदस्य फी घेतली जायची ती पाचशे रुपये करण्यात आली आणि एक बऱ्यापैकी रक्कम हातात आली. जसजसे पैसे हाती येतील तसतसे बांधकाम पुढे जात होते. मात्र मधल्या काही काळात खूप मोठी गॅप गेली आणि जवळजवळ २००८ साली बांधकाम पूर्ण होऊन स्वतःची इमारत उभी राहिली आणि समितीचे काम स्वतःच्या इमारतीत सुरू झाले. इतकी गॅप जाण्याचे कारण म्हणजे पुढाकार घेऊन किंवा स्वतःहून सामाजिक कार्यासाठी मोठी देणगी मिळू शकली नाही. काही कार्यक्रम हाती घ्यायचे त्यातून उत्पन्न मिळवायचं. संघटन, उद्योग मंदिर चालवणे, मुलांवर संस्कार, पाळणाघर, वसतिगृह, वाचनालय, भजन वर्ग, पौरोहित्य वर्ग चालवणे ही पहिल्यापासूनच प्रतिष्ठानची उद्दिष्ट ठरवली गेली. १९८८ च्या आधीही सोलापूर जनता सहकारी बँकेने त्यांची गच्ची वापरायला दिली होती. त्या ठिकाणी संस्कार वर्ग किंवा इतरही वर्ग चालत असत.
इमारत तयार झाल्यावर त्याची पूजा करण्यासाठीही महिलांना आमंत्रित केले गेले. नाशिकच्या समितीच्या दोन पौरोहित्य करणाऱ्या कार्यकर्त्या पूजा सांगायला आल्या होत्या आणि अशा रीतीने २०१० ला इमारतीचं औपचारिक उद्घाटन झाले. त्यावेळी समितीच्या नागपूरमधल्या पदाधिकारी तसेच नाशिकच्या काही सेविकाही उपस्थित राहिल्या होत्या. कष्टाने इमारत उभी केली म्हणून सोलापूरच्या सेविकांचे सर्वांनी मनापासून कौतुक केले. १९९४ पर्यंत मनोरमाताई पटवर्धन, त्यानंतर विमलताई माणकेश्वर अध्यक्ष होत्या. माणकेश्वर यांचं २०१२ साली निधन झाल्यानंतर माधवी पटवर्धन अध्यक्ष झाल्या. २०१२ पासून अगदी आतापर्यंत पटवर्धन आणि उपाध्यक्ष कृपावती देशमुख यांनी जोमाने काम केले आणि संस्थेचे कार्य खूप वाढवले. समितीकडे असलेल्या उर्वरित निधीवर येणाऱ्या व्याजातून आणखी एक मजला बांधला गेला. सध्या उपाध्यक्ष असलेल्या अनुजा जोशी यांचे पती बिल्डर असल्यामुळे त्यांनी बांधकाम करून द्यायचं कबूल केलं आणि ते पूर्णत्वाला आलं. आता खालच्या आणि वरच्या मजल्यावर योगाभ्यास वर्ग, संस्कार वर्ग, उद्योग मंदिर, समितीची शाखा, समितीचे उत्सव, समितीचे अभ्यास वर्ग असे उपक्रम राबवले जातात. पूर्वीपासूनच उद्योग मंदिर, संस्कार वर्ग, योगासनाचे वर्ग, भजनी मंडळ, वाचनालय, खेळ असे उपक्रम सुरू आहेत. सुरुवातीला जागा नसल्यामुळे ह. दे. प्रशालेच्या मैदानाची जागा संस्थेला मिळाली होती. यामध्ये स्नेहल पेंडसे यांनी क्रीडा प्रशिक्षण वर्ग घेतले आणि दहा वर्षांत जवळजवळ दोन लाख रुपये संस्थेला मिळवून दिले होते. या मुलांना शिकवण्यासाठी त्यांनी सेविकांना प्रशिक्षण दिलं होतं आणि नंतर त्यांना नाममात्र मानधनही देण्यात येत असे. सर्व खर्च वगळता यामुळे संस्थेला एक ते दोन लाखांची कमाई झाली होती. ते वर्गही आता स्वतःच्या जागेत चालतात.उद्योग मंदिरामध्ये हळद, तिखट, शिकेकई यांची विक्री केली जाते. अतिशय शुद्ध दर्जाची हळद, तिखट विक्रीला ठेवली जाते. यासाठी मिरच्या आणून वाळवण्यापासून दळण्यापर्यंत सर्व कामांसाठी महिलांना रोजगार उपलब्ध होतोय आणि महिलांना चांगल्या दर्जाचे तिखट, हळद, शिकेकई मिळावी असे दोन्ही हेतू उद्योगधंद्यामुळे साध्य होत आहेत. त्यासाठी सुद्धा गंमत म्हणजे वीस सेविकांनी शंभर, शंभर रुपये सुरुवातीला गुंतवले आणि त्यातून कच्चा माल आणला गेला होता. उद्योग मंदिराला पहिल्यापासूनच चांगला प्रतिसाद मिळाला असून दरवर्षी अंदाजे ५० ते १०० किलोमीटर तिखट, हळद आणि शिकेकईची विक्री होते. रामनवमीत संपूर्ण नवरात्र रामकथा सांगितली जाते. संस्थेच्या उपाध्यक्ष कृपावती देशमुख गेली अनेक वर्षं रामकथेचं निरूपण करतात. त्यानंतर लळीत बाईंनी २-३ सेविकांना तयारही केलं आहे. या सेविका आता विविध ठिकाणी जाऊन रामायण निरूपण करू लागल्या आहेत. समितीचे वार्षिक पाचही उत्सव उत्साहात साजरे केले जातात. गुढीपाडवा, गुरुपौर्णिमा, रक्षाबंधन आणि मकर संक्रांत हे पाच उत्सव सोलापूर शहरातील सर्व सेविका एकत्र येऊन अन्य नागरिकांना बोलावून येथे साजरे करतात. यावेळी मनोरंजनाचा कार्यक्रम, प्रात्यक्षिक किंवा व्याख्यान आयोजित केले जाते.
राष्ट्रसेविका समितीचा असा एक अलिखित नियम आहे की, वयाची ७५ झाली की सेविकांनी आपला कार्यभार तरुण पिढीकडे सोपवायचा असतो. त्यानिमित्ताने तरुण पिढी सुद्धा आपल्या विचारांशी जोडली जाते. त्यामुळे २०२२ मध्ये सर्व ज्येष्ठ सेविकांनी स्वतःहून राजीनामा देऊन आता नवी कार्यकारिणी कार्यरत झाली आहे आणि ज्येष्ठ सेविका मार्गदर्शनाचे बहुमोल काम करत आहेत. नवीन समिती आता जोमाने कार्य करायला लागली असून यंदा त्यांनी हळद आणि तिखट विक्रीचा सुद्धा मोठा पल्ला गाठला आहे. सेविकांनी स्वतःच्या बळावर २० वर्षं कष्टाने हिरमोड होऊ न देता, निराश न होता संस्थेची इमारत उभी करून संस्थेचे पेरलेले बीज वेलू होऊन गगनावरी पोहोचवले आहे. ज्या महिलांना समाजासाठी काहीतरी काम करण्याची मनापासून इच्छा असते, त्या महिला कोणतेही असाध्य काम पूर्णत्वाला नेऊ शकतात हेच या संस्थेच्या उभारणीतून सिद्ध होतं. समाजातील महिला, बालकांची सेवा करत असताना या सेविकाही समृद्ध झाल्या आहेत आणि आपणही मनात आणलं तर काहीही करू शकतो हा आत्मविश्वास त्यांच्यात दुणावला आहे. राष्ट्रसेविका समितीमुळे समाजातील दुर्बल महिलांचं सक्षमीकरण होण्याबरोबरच सेविकांचा आत्मविश्वास, त्यांच्यातील सामर्थ्य प्रकट करण्याची संधी त्यांना कशी मिळते याचे उत्तम उदाहरण म्हणून राणी कित्तूर चन्नम्मा स्मारक भवनकडे
पाहता येईल.
-शिबानी जोशी
माझे कोकण: संतोष वायंगणकर गरिबी आहे, घरची परिस्थिती नाही यामुळे पुढे शिक्षण घेता येत नाही…
वैशाली शिरोडकर: पहलगाम निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेला काश्मीरचा भाग दहशतीच्या सावटाखालीही फुलतो आहे. गेल्या चार-पाच…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण वरुथिनि एकादशी, शके १९४७. शततारका नक्षत्र. योग ब्रम्हा. चंद्र राशी…
भारताचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी दहशवाद्यांनी निष्पाप पर्यटकांवर हल्ला करून २८ जणांची…
हैदराबाद: इंडियन प्रीमियर लीग २०२५मधील ४१व्या सामन्यात आज २३ एप्रिलला मुंबई इंडियन्स संघाने सनरायजर्स हैदराबादला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली…