Monday, July 15, 2024
HomeकोकणरायगडKabaddi : गावोगावी रंगू लागल्या क्रिकेटसह कबड्डीच्या प्रीमियर लीग

Kabaddi : गावोगावी रंगू लागल्या क्रिकेटसह कबड्डीच्या प्रीमियर लीग

अनेक छोट्या-मोठ्या उद्योजकांकडून लाखोंच्या बक्षिसांची लयलूट

सुधागड-पाली (वार्ताहर) : रायगड जिल्हा कबड्डीचा (Kabaddi) माहेरघर म्हणून ओळखला जातो. या मातीत असंख्य मातब्बर कबड्डीपटू (Kabaddi) उदयाला आले आहेत. याबरोबर येथील लहानग्यांसह मोठ्यांना देखील क्रिकेटचे प्रचंड प्रेम आहे.

मात्र कोरोनामुळे मागील दोन वर्षांपासून कबड्डी व क्रिकेटच्या स्पर्धा बंद असल्याने खेळाडू व क्रीडा रसिकांचा प्रचंड हिरमोड झाला होता. मात्र आता हिवाळ्याच्या हंगामात सध्या जिल्ह्यातील गावागावात अगदी गल्लीबोळात क्रिकेट आणि कबड्डीच्या प्रीमियर लीग रंगू लागल्या आहेत.

येथे हजारो व लाखो रुपयांची बक्षिसे दिली जात आहेत. शिवाय मोठ्या चषकांना देखील अधिक मागणी आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमी व रसिकांच्या आनंदाला उधाण आले आहे. शिवाय यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना व गती देखील मिळत आहे.

या प्रीमियर लीग पक्षाच्या किंवा त्या गावाच्या किंवा शहराच्या नावाने अगदी एखाद्या आळीच्या किंवा मंडळाच्या नावाने, तसेच एखाद्या व्यक्तीच्या समरणार्थ भरविल्या जात आहेत. गावातील सरपंच ते मोठा नेता व पुढारी यासाठी बक्षिसांची रक्कम किंवा पूर्ण स्पर्धेचे आयोजन करतात. काही ठिकाणी एखाद्या व्यक्तीच्या स्मरणार्थ देखील प्रीमियर लीग भरविण्यात येते. एकूणच या स्पर्धांमुळे गावखेड्यातील प्रतिभावंत व होतकरू खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ व जोडीला थोडेफार आर्थिक पाठबळ देखील मिळत आहेत.

गावागावातील मैदाने किंवा शेतात या स्पर्धा भरविल्या जातात. त्यासाठी मंडप बांधले जातात. सोबत डीजे देखील लावला जातो. चांगले निवेदक बोलविले जातात. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे पंच यासाठी नेमले जातात. एकूणच सर्व कार्यक्रम भारदस्त केले जात आहेत. या लोकांनादेखील रोजगाराची संधी मिळत आहे.

तसेच यावेळी मंडप व डेकोरेशन वाले, वडापाव वाले, सरबत, पाणीवाले आदी व्यावसायीक व विक्रेत्यांना देखील चांगला धंदा मिळतो. आयोजकांच्या नावाचे व लोगो असलेले विविध टी-शर्ट छपाई केली जाते. चषक विक्रेत्यांचा देखील चांगला व्यवसाय होत आहे. एकूणच या प्रीमियर लीगमुळे जणूकाही गाव खेड्यातील अर्थव्यवस्थेला उभारी आणि चालनासुद्धा मिळत आहे, असे पालीतील आयोजक व व्यावसायिक सिद्धेश दंत यांनी सांगितले. तसेच पुढारी व नेते यांच्यामध्ये राजकारण व चढाओढदेखील रंगलेले पाहायला मिळते.

गावखेड्यातील होतकरू व प्रतिभावंत खेळाडूंना या प्रीमियर लीगद्वारे हक्काचे व्यासपीठ मिळत आहेत. यातून काही खेळाडूंना राज्य, देश व राष्ट्रीय पातळीवर जाण्याची संधी देखील मिळू शकेल. या स्पर्धांद्वारे युवक व तरुणांमध्ये सांघिक भावना, नेतृत्वगुण, विविध कौशल्य व क्षमता विकसित होतात. होतकरू व प्रतिभावंत खेळाडूंना सातत्याने प्रेरणा व व्यासपीठ उपलब्ध करून देतो. – ललित ठोंबरे, प्रीमियर लीग आयोजक, सुधागड

मोठ्या चषकांना मागणी

जिल्ह्यात सध्या मोठ्या चषकांना मागणी वाढली आहे. प्रीमियर लीगच्या कार्यक्रम पत्रिकेत देखील भव्य चषकाचा आवर्जून उल्लेख केलेला आढळतो. अगदी कमी रकमेच्या स्पर्धेत सुद्धा भव्य चषक पाहायला मिळतो. परिणामी चषक विक्रेते देखील सुखावले आहेत, असे चषक विक्रेते मुकुंद कोसुंबकर यांनी सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -