Friday, May 9, 2025

महाराष्ट्रदेशताज्या घडामोडी

Sextortion : पुणे सेक्स्टॉर्शन प्रकरणी गुरुगोठडी गावातून एकाला अटक

Sextortion : पुणे सेक्स्टॉर्शन प्रकरणी गुरुगोठडी गावातून एकाला अटक

पुणे : सेक्स्टॉर्शनमुळे (Sextortion) कंटाळून पुण्यातील दोन तरुणांनी आत्महत्या केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी केलेल्या तपासात एक अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. राजस्थानमधील गुरुगोठडी हे गाव सेक्स्टॉर्शन रॅकेट चालवत असल्याचे उघडकीस आले आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील दोन तरुणांच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी राजस्थानमधून एका आरोपीला अटक केली होती. (One arrested from Gurugothdi village in Pune sextortion case) त्याने चौकशीदरम्यान ही माहिती दिली. ज्या मोबाईल नंबरवरुन या मुलांकडे खंडणी मागितली जात होती, त्या नंबर्सचे लोकेशन पुणे पोलिसांनी शोधले. ते लोकेशन राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील लक्ष्मणगड तालुक्यातील गुरुगोठडी गावातील निघाले.


पुणे पोलिसांच्या एका पथकाने थेट ते गाव गाठले आणि तेथून अन्वर खान नावाच्या व्यक्तीला अटक करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तेव्हा गावातील लोकांनी पुणे पोलिसांच्या पथकावर हल्ला केला. आरोपीला सोडवण्याचा प्रयत्न केला. तरी पुणे पोलिसांनी या आरोपीला ताब्यात घेण्यात यश मिळवले.


पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली तेव्हा त्याने चौकशीदरम्यान अनेक धक्कादायक गोष्टी उघड केल्या. गुरुगोठडी या गावातील स्त्री-पुरुष मिळून जवळपास २५०० लोक सेक्स्टॉर्शन रॅकेटमध्ये सहभागी आहेत, असे त्याने सांगितले.


सोशल मीडियावर बनावट अकाऊंट तयार केली जातात. त्यानंतर मुलगी बोलतेय असे सांगून तरुणांना जाळ्यात ओढले जाते. त्यानंतर व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून त्यांचे काही फोटो, व्हिडिओ शेअर करायला सांगितले जातात. त्यानंतर हे फोटोज मॉर्फ करुन, अर्थनग्न करुन त्यांना पाठवले जातात. त्यानंतर त्यांना ब्लॅकमेल केले जाते. त्यांच्याकडून पैशांची मागणी केली जाते. त्यांची फसवणूक केली जाते. सध्या हे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.


अशाच एका प्रकरणात वारंवार पैशांची मागणी करण्यात आल्याने पुण्यातील शंतनु वाडकर आणि अमोल गायकवाड या तरुणांनी आत्महत्या केली होती. या घटनेनंतर पुणे पोलिसांनी हा सर्व प्रकार उघडकीस आणला आहे.

Comments
Add Comment