Thursday, June 12, 2025

Bruce Lee : ४९ वर्षांनंतर उलगडले ब्रूस लीच्या मृत्यूचे कोडे!

Bruce Lee : ४९ वर्षांनंतर उलगडले ब्रूस लीच्या मृत्यूचे कोडे!

न्यूयॉर्क (वृत्तसंस्था) : मार्शल आर्टला जगभरात पोहोचवणारा अमेरिकन अभिनेता ब्रूस लीच्या (Bruce Lee) मृत्यूचे कोडे ४९ वर्षांनंतर उलगडले आहे. १९७३ मध्ये वयाच्या अवघ्या ३२ व्या वर्षी ब्रूस लीचे निधन झाले होते.


वेदनाशामकांच्या ओव्हरडोजमुळे मेंदूला सूज (एडेमा) आल्याने त्याचा मृत्यू झाला, असे डॉक्टरांनी सांगितले होते. पण शास्त्रज्ञांच्या एका टीमने आता त्याच्या मृत्यूचे खरे कारण शोधून काढले आहे. ब्रूस लीचा मृत्यू कोणत्याही औषधामुळे नव्हे, तर पाण्याचे अतिरिक्त सेवनाने झाल्याचे शास्त्रज्ञांनी सांगितले आहे.


क्लिनिकल किडनी जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका लेखामध्ये लिहिण्यात आले की, 'उपलब्ध असलेल्या माहितीच्या विश्लेषणाच्या आधारे असे म्हटले जाऊ शकते की, ब्रूस लीच्या मृत्यूचे कारण हायपोनेट्रेमियामुळे सेरेब्रल एडेमा होते.' यामध्ये रक्तातील सोडियमचे प्रमाण अत्यंत कमी होते. शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढल्यानंतर सोडियम त्यात विरघळते. त्यामुळे मेंदूच्या सेल्सवर सूज येते. या सूजेला सेरेब्रल एडेमा म्हणतात. ब्रूस लीची किडनी शरीरातील अतिरिक्त पाणी बाहेर काढू शकली नाही आणि त्यातच त्याचे निधन झाले.


ब्रूस ली हा लिक्विड डाएट करत होता. त्याच्या आहारात तो प्रोटीनयुक्त पेये घेत होता, ज्यामुळे तहान वाढते. शास्त्रज्ञांनी सांगितल्यानुसार, ब्रूस लीला हायपोनेट्रेमियाचा धोका होता. तो अति लिक्विड डाएट घेत असे. त्याच्या शारीरिक हालचालीही अशा होत्या की, त्याला जास्त तहान लागत असे.


शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, मृत्यूच्या वेळी ब्रूस लीच्या किडनी खराब झाल्या होत्या. किडनी कार्यरत नसल्याने अतिरिक्त पाणी शरीराबाहेर पडत नव्हते. त्यामुळे त्याच्या शरीरात पाणी भरले होते. लघवी आणि शरीरातील पाण्याची पातळी राखता न आल्याने त्याच्या मेंदूला सूज आली. यामुळे काही तासांनंतर ब्रूस लीचा मृत्यू झाला.

Comments
Add Comment