ज्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचा ब्रिटिशांनी धसका घेतला होता, मोस्ट डेंजरस म्हणून त्यांच्यावर कडेकोट पहारा ठेवला, हालहाल करून त्यांचे नेतृत्व खिळखिळे करण्याचा प्रयत्न केला होता, त्यांना ब्रिटिशांचे गुलाम ठरविण्यासाठी राहुल गांधींना महाराष्ट्राचीच भूमी सापडावी, हा काँग्रेसमधील काही नेत्यांचा कुटिल कट असावा. अन्यथा अशी बेताल वक्तव्ये आणि बालिश वर्तणूक करणाऱ्या नेत्यांना महाराष्ट्राची जनता कोणती जागा दाखविते, हे या नेत्यांना माहीत असल्याखेरीज राहुल गांधींना सावरकरांविरोधी वक्तव्ये करण्याकरिता पढविले गेले नसते.
अखेर राहुल गांधी यांचा खरा चेहरा उघडा पडला. गेल्या आठ वर्षांत सातत्याने पराभव पत्करणाऱ्या काँग्रेसची अगोदरच वाताहत होत असताना राहुल गांधी यांना पक्षाचा नेता म्हणून पुढे करणाऱ्या काँग्रेसजनांची आता पुरती निराशा झाली असेल. राजकारण हा येरागबाळ्याचा खेळ नसतो, असे म्हणतात. त्यामुळे राहुल गांधींना गांभीर्याने राजकारण करणे जमणारच नाही, अशी काँग्रेसमधील अनेकांची भावना होती. त्यांच्या अपरिपक्व नेतृत्वाला कंटाळूनच पक्षातील अनेकांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली, तरी गांधीनिष्ठ मात्र पक्षातील आपली मनमानी सुरू ठेवण्यासाठी राहुल गांधींना पुढे करून स्वतःचे महत्त्व पद्धतशीरपणे वाढवत होते. राहुल गांधी जेवढा अपरिपक्वपणा दाखवतील, तेवढी आपल्या प्रतिमा निर्मितीस मदतच होईल, हा त्यांचा होरा खरा ठरला. त्यातूनच, पक्षातील दुसऱ्या फळीचे व राष्ट्रीय राजकारणात जरा देखील जनाधार नसलेले अनेकजण नेते म्हणून मिरवू लागले. काँग्रेसच्या या शोकांतिकेस राहुल गांधी हेच जबाबदार आहेत, काँग्रेसची पडझड ते थांबवू शकत नाहीत आणि मरणप्राय काँग्रेसला ते पुनरुज्जीवितदेखील करू शकत नाहीत. हे लक्षात आल्यावर त्यांना पक्षातील अंतर्गत दैनंदिन कारभारापासून दूर राखण्याचे पद्धतशीर नियोजन करण्यात आले आणि त्याला ‘भारत जोडो’ असे गोंडस नाव देऊन राहुल गांधींना कन्याकुमारीस धाडण्यात आले. या यात्रेच्या निमित्ताने राहुल गांधी पक्षाच्या कारभारापासून दूर राहतील आणि झालाच तर कदाचित गांधी-नेहरू घराण्याचा करिष्मा म्हणून त्यांना पाठिंबा मिळून काँग्रेसची ढासळलेली प्रतिमा थोडीफार सावरता येईल, असा पक्षाच्या या धुरिणांचा कावा होता. प्रत्यक्षात मात्र, उलटेच होताना दिसत आहे. राहुल गांधी यांच्या अपरिपक्व राजनीतीमुळे भारत जोडोसारखा उद्देश सफल होणे दूरच, उलट काँग्रेसचीच शकले होण्याची, तुटण्याची, विखुरण्याची, मित्र दूर जाण्याची, मित्रांना दूर करण्याची, मैत्रीत मनभेद होण्याची शक्यता बळावली आहे. मुळात या यात्रेचा आधार घेऊन मोदी सरकारविरोधातील आणि भाजपविरोधातील राजकीय पक्षांची मोट बांधण्याचा राहुल गांधींच्या मुखवट्याआडून काँग्रेसचा प्रयत्न होता. गेल्या आठ वर्षांत जंगजंग पछाडूनही सर्व भाजपविरोधी पक्षास आणि त्या पक्षांच्या बड्या नेत्यांना जे जमले नाही, ते राहुल गांधींसारखा अपरिपक्व नेता यात्रेतून साध्य करेल, अशी अटकळ बांधणे हाच बालिशपणा होता. गेल्या आठ वर्षांत मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून काँग्रेस, तर भुईसपाट होतच आहे, पण काँग्रेससोबत हातमिळवणी करू पाहणाऱ्या पक्षांचेही हात पोळलेले पाहावयास मिळत आहेत. त्यामुळेच विरोधकांच्या ऐक्यात काँग्रेस हाच अडसर असल्याचे वारंवार सिद्ध झाले आहे. काँग्रेस राहुल गांधींना नेता म्हणवून पुढे करू पाहत असली, तरी अन्य भाजपविरोधी पक्षांसाठी तीच मोठी अडचण असल्यामुळे आजवरचे विरोधी ऐक्याचे सारे प्रयत्न पुरते फसले आहेत आणि विरोधी ऐक्य झालेच, तर राहुल गांधी हे अशा आघाडीचे नेते असू शकणार नाहीत यावरही विरोधकांमध्ये दुमत राहिलेले नाही. खुद्द काँग्रेसमधील अनेकांचीही हीच भावना असली, तरी बुडत्या काँग्रेसजनांना गांधी घराण्याचा काडीचा आधार मिळावा म्हणून सुरू असलेल्या धडपडीचा शेवट आता जवळ आला आहे.
राजकारणातील अपरिपक्वता आणि बालिशपणास महाराष्ट्र कधीच थारा देत नाही. राज्याच्या राजकारणात ज्यांनी ज्यांनी मनमानी करण्याचा प्रयत्न केला, त्यांना कायमचे घरी बसावे लागले किंवा राजकारणातून बाहेर व्हावे लागले. अगदी अलीकडे महाविकास आघाडीच्या मुखवट्याखाली उद्धव ठाकरे यांनी असाच मनमानी नेतृत्वाचा प्रयोग करून पाहिला होता. कोविडचे निमित्त करून घरबसल्या मुख्यमंत्रीपदाची मौज लुटण्याचा त्यांचा प्रयत्न महाविकास आघाडीच्या आणि शिवसेनेच्या फुटीस कारणीभूत ठरला आणि पोरकट राजकारणास महाराष्ट्राने कायमची घरची वाट दाखविली. हा धडा ताजा असताना महाराष्ट्राच्याच भूमीत येऊन पोरकटपणा करण्याची हिंमत राहुल गांधींनी दाखविली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर ही महाराष्ट्राची अस्मिता आहे. हिंदुत्वाच्या प्रखर प्रसारासाठी जीवन वेचणारे सावरकर हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. राहुल गांधींना महाराष्ट्राच्या या भावना माहीत तरी नसाव्यात किंवा त्यांचा पाय अधिक खोलात जावा या हेतूने महाराष्ट्रातील त्यांच्या मार्गदर्शकांनी जाणीवपूर्वक भारत जोडो यात्रेचा हेतू भरकटविण्यासाठी राहुल गांधींच्या मुखी सावरकरांच्या आपमानाचा घास भरविला असावा. दुसऱ्याच्या हाताने तोंडात घास घेणाऱ्यास आपण काय खातो याची जाणीव ते अन्न तोंडात गेल्याखेरीज होत नसते. राहुल गांधींचेही तसेच झाले. काँग्रेसमधील काहींनीच राहुल गांधींचा बळीचा बकरा केला आणि त्यांच्याकडून पुन्हा स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बदनामीचा पाढा वाचून घेतला. सावरकरांच्या एका पत्रातील समारोपाच्या वाक्यांचा उल्लेख करून सावरकर हे इंग्रजांचे गुलाम, सेवक, आज्ञाधारक नोकर असल्याचा पोरकट विचार मांडून राहुल गांधी यांनी आता ज्या वादास तोंड फोडले आहे, तो वाद कोणकोणत्या महनीय नेत्यांच्या पत्रांपर्यंत जाऊन पोहोचेल, याचा आता अंदाज बांधने कठीण आहे. इतिहासात डोकावल्यास राष्ट्रपिता महात्मा गांधींनी तत्कालीन ब्रिटिश राज्यकर्त्यांना उद्देशून लिहिलेल्या अनेक पत्रांचा समारोपही याच भाषेत केला आहे. आपल्या सन्मानासह, आपला आज्ञाधारक नोकर अशा शब्दांत पत्रांचा शेवट असलेली महात्मा गांधींची ब्रिटिश अधिकाऱ्यांना लिहिलेली अनेक पत्रे अधिकृतपणे उजेडात येतील, तेव्हा महात्माजीदेखील ब्रिटिशांचे गुलाम व आज्ञाधारक नोकर होते काय याचा खुलासा करण्याची वेळ काँग्रेसवर येणार आहे. महात्मा गांधी यांनी
१ ऑक्टोबर १९०९ रोजी लिओ टॉलस्टॉय यांना लिहिलेल्या पत्राचा समारोप करताना, विथ रिस्पेक्ट, आय रिमेन, युवर ओबिडियन्ट सर्वन्ट एम. के. गांधी असेच लिहिले आहे. त्याच महिन्यात ११ तारखेच्या त्यांच्या दुसऱ्या पत्राच्या समारोपातही त्यांनी तेच शब्द वापरलेले दिसतात. १ फेब्रुवारी १९२२ रोजी महात्मा गांधींना बारडोली येथून लॉर्ड रीडिंग या व्हाईसरॉयना लिहिलेल्या पत्राचा समारोपही, युअर एक्सलैन्सीज फेथफुल सर्वन्ट अँड फ्रेड अशा शब्दांत केला आहे. गांधीजींच्या या शब्दांची तुलना सावरकरांच्या शब्दाशी करून राहुल गांधी महात्माजींना देखील अप्रत्यक्षपणे ब्रिटिशांचे गुलाम ठरवू पाहत आहेत का? याचे उत्तर काँग्रेसला द्यावे लागेल, तेव्हा राहुल गांधी काही नवा अगोचर विचार मांडत यात्रेतून पुढे सरकताना दिसतील, अशी भीती काँग्रेसजनांना वाटत असेल, तर त्यात आश्चर्य नाही.
ज्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचा ब्रिटिशांनी धसका घेतला होता, मोस्ट डेंजरस म्हणून त्यांच्यावर कडेकोट पहारा ठेवला, हालहाल करून त्यांचे नेतृत्व खिळखिळे करण्याचा प्रयत्न केला होता, त्यांना ब्रिटिशांचे गुलाम ठरविण्यासाठी राहुल गांधींना महाराष्ट्राचीच भूमी सापडावी, हा काँग्रेसमधील काही नेत्यांचा कुटिल कट असावा. अन्यथा अशी बेताल वक्तव्ये आणि बालिश वर्तणूक करणाऱ्या नेत्यांना महाराष्ट्राची जनता कोणती जागा दाखविते, हे या नेत्यांना माहीत असल्याखेरीज राहुल गांधींना सावरकरांविरोधी वक्तव्ये करण्याकरिता पढविले गेले नसते.
राहुल गांधींच्या यात्रेचा उद्देश ‘भारत जोडो’ असा आहे, असे काँग्रेस म्हणत असली, तरी प्रत्यक्षात मात्र विद्वेष पसरविणारे राजकीय विचार त्यामधून मांडले जात आहेत. सावरकरविरोधी विधानांतून त्यांनी महाराष्ट्रातील जनतेची मने दुखावली आहेतच, पण काँग्रेसचेही नुकसान केले आहे. या यात्रेमुळे भाजपविरोधकांचे ऐक्य साधता येईल, हा त्यांचा अंदाजही आता चुकला आहे. सावरकरांच्या विरोधातील त्यांच्या वक्तव्यानंतर काँग्रेससोबत असलेल्या पक्षांमध्येही संभ्रमाचे वातावरण आहे. काँग्रेसचा लाळघोटेपणा करणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला तर पळ काढण्याची वेळ आली आहे. राहुल गांधींच्या वक्तव्याशी सहमत नाही, अशी सारवासारव करत ठाकरे सेना आता त्यांच्यापासून दूर होऊ पाहत आहे. ठाकरेंच्या शिवसेनेची अवस्था मात्र, जवळही जाता येत नाही आणि पळही काढता येत नाही, अशी झाली आहे. महाराष्ट्राच्या
जनतेपासून काँग्रेस दूर गेलीच, पण ठाकरेंच्या शिवसेनेलाही जनतेच्या उरल्यासुरल्या नात्यापासून तोडण्याचे काम राहुल गांधींनी केले आहे. त्यांच्या बालिश नेतृत्वाची फळे काँग्रेसला भोगावी लागतच आहेत. आता काँग्रेस पूर्ण संपवूनच राहुल गांधींच्या यात्रेचे विसर्जन होईल, अशीच शक्यता अधिक वाटते.
-चंद्रशेखर बावनकुळे