Thursday, July 25, 2024
HomeदेशDevelopment : माझी औकात दाखवण्यापेक्षा विकासकामांवर बोला - पंतप्रधान

Development : माझी औकात दाखवण्यापेक्षा विकासकामांवर बोला – पंतप्रधान

अहमदाबाद : ‘मी तर जनतेचा सेवक आहे. माझी औकात काय?’ औकातीचा खेळ सोडा. आता माझी औकात दाखवण्यापेक्षा विकासकामांवर (Development) बोला, असे प्रत्युत्तर देत आज सुरेंद्रनगर येथील प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या हटके अंदाजात गुजरात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुसूदन मिस्त्री यांच्यावर टीकेचा भडीमार केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरात दौऱ्याचा आज तिसरा दिवस आहे.

पीएम मोदी म्हणाले, ‘काँग्रेसचे नेते मोदींना औकात दाखवण्याची भाषा करतात. हा त्यांचा अहंकार आहे. तुम्ही राजघराण्यातील आहात. मी एका सर्वसामान्य कुटुंबातील आहे. माझी काहीच औकात नाही. तुम्ही माझी औकात दाखवा. मी सेवादार आहे. सेवादाराची औकात नसते. तुम्ही मला नीच म्हणा. खालच्या जातीचा म्हणा. माझा मृत्यूचा व्यापारी म्हणून उल्लेख करा. माझी कोणतीच औकात नाही. पण कृपा करा विकासाच्या मुद्यावर बोला. विकसित गुजरात बनवण्यासाठी मैदानात या. मी अशा अपमानाकडे दुर्लक्ष करतो, कारण मला भारताला एक विकसित देश बनवायचे आहे. मला १३५ कोटी लोकांसाठी काम करायचे आहे, म्हणून मी अपमानाकडे दुर्लक्ष करतो.’

यावेळी त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी व त्यांच्या भारत जोडो यात्रेवरही निशाणा साधला. सत्तेतून बेदखल झालेल्या लोकांना यात्रेच्या माध्यमातून पुनरागमन करायचे आहे, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी भारत जोडो यात्रेत सहभागी झालेल्या सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांच्यावरून राहुलवर निशाणा साधला. काँग्रेस नेते नर्मदा प्रकल्पाला ३ दशकांपर्यंत बंद ठेवणाऱ्या महिलेच्या खांद्यावर हात ठेवून पदयात्रा काढत आहेत, असे ते म्हणाले.

मोदी पुढे म्हणतात की, ‘गुजरातमध्ये सत्ताविरोधी लाटेसारखे काहीही नाही. ज्यांनी गुजरातला पाणी दिले नाही ते पदासाठी यात्रा करत आहेत. गुजरातमध्ये २४ तास वीज मिळून १० वर्षे झाली. नर्मदेच्या विरोधकांना शिक्षा देण्यासाठी ही निवडणूक व्हायला हवी. पद मिळावे म्हणून पदयात्रेला विरोध नाही, पण गुजरातच्या नर्मदाविरोधकांना आपल्याकडे का ठेवायचे? या गुजरातचा एकही नागरिक असा नसेल ज्याने गुजरातचे मीठ खाल्ले नाही. पण काही लोक इथले मीठ खाऊन गुजरातला शिव्या देतात,’ अशी टीकाही त्यांनी केली.

ते पुढे म्हणाले की, सरकार व जनतेच्या संयुक्त प्रयत्नांमुळे गुजरातच्या नावाचा संपूर्ण जगात डंका वाजत आहे. हे उद्ध्वस्त होता कामा नये. गुजरातमध्ये पूर्वी सायकलही तयार होत नव्हती. आता येथे विमान तयार होत आहेत. काही नेते देशात यात्रा करत आहेत. त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना जनतेने राजकोटमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष्य का आहे हे विचारावे. काँग्रेसच्या राजवटीत हातपंप लावून हात वर केले जात होते, असे ते म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -