
अहमदनगरचे नाना जोशी (रेखी) हे त्यावेळचे सुप्रिसद्ध पिंगला ज्योतिषी होते. त्यांनी श्री स्वामी समर्थांची कुंडली बनविली होती. त्या कुंडलीस श्री स्वामींनी संमतीही दिली होती. नाना जोशी काही कामानिमित्त मुंबईस आले होते. या अगोदर त्यांची व श्री स्वामीसुतांची अजिबात ओळखही नव्हती; परंतु नानांनी श्री स्वामीसुमतांचे दर्शन घेताच त्यांनी नाना जोशी नगरकर ते तुम्हीच काय? असे विचारून स्वतःच्या अंतर्ज्ञानाची चुणूक नानांस दाखविली.
नानांसही श्री स्वामीसुतांच्या दिव्यत्वाची प्रचिती आली. त्यामुळे नानांनी सद्गदित अंतःकरणाने स्वामीसुतांच्या पायावर डोके ठेवले. याच नानांनी पुढे स्वामीसुतांचा अनुग्रह घेतला. त्यांच्या सूचनेवरूनच नानांनी स्वामी समर्थांची कुंडली बनविली होती. पुढे शके १७१३ (इ.स. १८७१) चैत्रमासात स्वामीसुत अक्कलकोटला आले. त्यांनी संपूर्ण अक्कलकोट गावात स्वामी समर्थ प्रकटीकरणाचा उत्सव मोठ्या उत्साहाने केला.
या चैत्र शुद्ध द्वितीयेच्या दिवशी त्यांनी डोक्यावर भगर, खजुराची टोपली घेऊन तो फराळ प्रसाद म्हणून घरोघरी वाटला. त्यांच्या या कृतीची काही रिकामटेकडे, भोजनभाऊ सेवेकरी टिंगल-टवाळी-थट्टा करू लागले. स्वामीसुतांस वेडा समजून हसत होते. पण, त्या अज्ञजनांस काय माहिती की स्वामीसुतांस श्री स्वामी समर्थ भक्तीचे वेड लागले आहे म्हणून. पण स्वामींस, स्वामीसुतांची ती कृती पूर्ण ज्ञात होती. स्वामीसुत काय करीत आहेत? असे जेव्हा शिवूबाई, भुजंगा यांनी स्वामींस विचारले त्यावर हा आमच्या लग्नाचा उत्सव साजरा करीत आहे. असे उत्तर त्यांनी त्यांना दिले. लग्नाचा उत्सव हा आनंददायी असतो, यातून महाराजांनी स्वामीसुत जे काम करीत होते त्यास अनुकूलताच दाखवून एक प्रकारे पसंतीच दिली. शिवाय त्याप्रसंगी स्वामीसुत जे-जे अभंग म्हणत त्यानुसार गोट्या खेळणे व अन्य लीला ते करीत होते. त्यामुळे चैत्र शुद्ध द्वितीया हा श्री स्वामी समर्थांचा प्रकट दिन म्हणून आजही साजरा केला जातो तो स्वामीसुतांच्या या आगळ्या- वेगळ्या कृतीने.
-विलास खानोलकर