Sunday, May 18, 2025

तात्पर्य

सध्या ऑप्शन ट्रेडिंग करा काळजीपूर्वक

सध्या ऑप्शन ट्रेडिंग करा काळजीपूर्वक

शेअर बाजारातील ऑप्शन प्रकारात जर मंदी किंवा घसरण अपेक्षित असेल, तर आपण “पूट ऑप्शन” खरेदी करीत असतो. याउलट जर तेजी होण्याची शक्यता असेल, तर आपण “कॉल ऑप्शन” घेत असतो. यामध्ये गुंतवणूक करीत असताना निर्देशांकात मोठी हालचाल होणे गरजेचे असते. जर मोठी अपेक्षित हालचाल झाली तर यात होणारा नफा हा नेहमीच अमर्यादित असतो.


गेल्या काही आठवड्यांपासून निर्देशांकामधील हालचाल अत्यंत मर्यादित पातळीत होत आहे. टेक्निकल भाषेत बोलायचे झाल्यास निर्देशांक हे “रेंज बाऊंड” स्थितीत अडकलेले आहेत. ज्यावेळी रेंज बाऊंड अर्थात “कन्सोलीडेशन” अवस्था असते त्यावेळी ऑप्शन प्रकारात ऑप्शन खरेदी करत असलेल्यांना बहुतेकदा नुकसानच सहन करावे लागते. आपण ज्यावेळी ऑप्शन खरेदी कराव त्यावेळी आपण खरेदी केलेल्या ऑप्शनमध्ये वाढ होण्यासाठी कॉल ऑप्शन असेल तर तेजी आणि पूट ऑप्शन असेल तर मंदी होणे अपेक्षित असते. ऑप्शन प्रकाराला एक्सपायरी असल्याने आपण खरेदी केलेल्या ऑप्शन प्रकारात वेळेनुसार त्याच्या किमतीत घसरण होत असते. एक्सपायरी जशी जवळ येईल तशा ऑप्शनच्या किमती मोठ्या प्रमाणात कमी होतात. ज्याला आपण “ऑप्शन टाईम डिके” म्हणतो.


पुढील काही काळ निर्देशांक आणखी रेंज बाऊंड राहू शकतात. त्यामुळे ऑप्शन बायर्सनी अत्यंत विचारपूर्वक व्यवहार करणे आवश्यक आहे. रेंज बाऊंड अवस्थेचा फायदा खऱ्या अर्थाने ऑप्शन सेलर्सना जास्त होतो. त्यामुळे ऑप्शन सेलर्ससाठी यासारखी सुवर्ण संधीच नाही. ऑप्शन शोर्ट करून मिळालेल्या प्रीमियम इतका फायदा ते मिळवू शकतात. मात्र ऑप्शन शोर्ट करीत असताना जर निर्देशांकात घेतलेल्या पोझिशनच्या विरुद्ध मोठी हालचाल झाली, तर मात्र त्यांना मोठा फटका देखील बसू शकतो. त्यामुळे या सर्व गोष्टी लक्षात घेऊन ऑप्शनमध्ये व्यवहार करता येतील.


अल्पमुदतीसाठी निर्देशांकाची दिशा आणि गती तेजीची आहे. पुढील आठवड्यासाठी निर्देशांक सेन्सेक्सची ६२२०० आणि निफ्टीची १८५५० ही अत्यंत महत्त्वाची विक्रीची पातळी आहे. निर्देशांक जोपर्यंत या पातळीच्या खाली आहेत तोपर्यंत निर्देशांकात मोठी तेजी येणार नाही. मध्यम मुदतीसाठी सेन्सेक्स ६०५०० आणि निफ्टीची १८००० ही महत्त्वाची खरेदीची पातळी असून यापुढील काळात जर या पातळ्या तुटल्या तरच शेअर बाजारात आणखी मोठी घसरण होऊ शकेल.


सध्या निर्देशांक “नो ट्रेड झोन”मध्ये आलेले आहेत. आता जोपर्यंत निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीची दिशा स्पष्ट होत नाही, तोपर्यंत “होल्ड कॅश इन हँड” हेच धोरण अवलंबणे योग्य ठरेल. पूर्वी खरेदी केलेल्या शेअर्समध्ये स्टॉपलॉस पद्धतीचा वापर करावा. कच्चे तेल अजूनही तेजीत असून जोपर्यंत कच्चे तेल ७२०० या पातळीच्या खाली आहे, तोपर्यंत कच्च्या तेलात आणखी घसरण होऊ शकते.


मागील लेखात सांगितल्याप्रमाणे सोन्याने मध्यम मुदतीच्या चार्टनुसार तेजी सांगणारी रचना तयार केलेली असून आता जोपर्यंत सोने ५०००० या पातळीच्या वर आहे तोपर्यंत सोन्यामध्ये मध्यम मुदतीत आणखी वाढ होणे अपेक्षित आहे. शेअर बाजार हा आज जरी टेक्निकल बाबतीत नक्कीच तेजीत आहे. मात्र फंडामेंटल बाबतीत पी. ई. गुणोत्तरासह अनेक मूलभूत गुणोत्तरे ही अत्यंत धोकादायक पातळी जवळ आलेली आहेत. त्यामुळे शेअर बाजाराचे फंडामेंटलनुसार मूल्यांकन जोपर्यंत स्वस्त होत नाही, तोपर्यंत गुंतवणूक करीत असताना योग्य नियोजन करणे अत्यंत आवश्यक आहे. गुंतवणूक करीत असताना सर्वच्या सर्व गुंतवणूक एकाच शेअर्समध्ये करू नये. पैशाचे योग्य विभाजन आणि व्यवस्थापन करून त्यानुसार टप्प्याटप्प्याने शेअर खरेदी करावी. गुंतवणूक करीत असताना गुंतवणुकीचा कालावधी ठरवणे अत्यंत आवश्यक आहे.


दीर्घमुदतीची गुंतवणूक ही नेहमीच फायदेशीर असते, मात्र सध्या असलेले निर्देशांकांचे असलेले पी. ई. गुणोत्तर पाहता अल्पमुदतीच्या गुंतवणुकीचाच विचार करणे योग्य ठरेल. शेअर्स खरेदी विक्री करीत असताना स्टॉपलॉसचा वापर करणे आवश्यक आहे. शुक्रवारी निफ्टी १८३०७ अंकांना, तर सेन्सेक्स ६१६६३ अंकांना बंद झाली.


-डॉ. सर्वेश सोमण

Comments
Add Comment