Tuesday, April 29, 2025

रायगड

Naval officer : उरणहून बेपत्ता झालेला नौदल अधिकारी झांसीमध्ये सापडला

Naval officer : उरणहून बेपत्ता झालेला नौदल अधिकारी झांसीमध्ये सापडला

उरण (वार्ताहर) : नौदल अधिकारी (Naval officer) विशाल महेश कुमार (२२) हा तरुण उरणहून बेपत्ता झाला होता. तब्बल १२ दिवसानंतर तो झांसी येथे सापडला आहे. यामुळे कुटूंबियांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

विशालला गेल्या १२ दिवसातील घडलेल्या घटनांची काहीही आठवत नाल्याने नौदलाच्या अधिकाऱ्यांनी त्याला उपचारासाठी मेरठ येथील दवाखान्यात दाखल केले असल्याची माहिती तपास अधिकारी अनिरुद्ध गिजे यांनी दिली. उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यातील धपरौली गावातील विशाल महेश कुमार (२२) हा जवान १९ महिन्यांपूर्वी उरण- करंजा येथील नौदलाच्या सेवेत दाखल झाला होता.

नौदल शस्त्रागारातील आयएनए-अभिमन्युमध्ये सेफ (स्वयंपाकी) म्हणून काम करणारा जवान अधिकारी गेल्या ३ नोव्हेंबरपासून अचानक बेपत्ता झाला होता. यानंतर नौदल अधिकाऱ्यांनी विशालच्या आईवडीलांना तत्काळ बोलावून घेऊन माहिती दिली होती. त्यानंतर विशालचे वडिल महेश कुमार यांनी ६ नोव्हेंबर रोजी मिसिंगची तक्रार उरण पोलीस ठाण्यात दाखल केली होती.

उरणच्या विमला तलावात ३ नोव्हेंबर रोजी सकाळी स्विमिंगसाठी आलेल्या विशालचे शेवटचे मोबाईल लोकेशन पनवेल रेल्वे स्टेशन दाखविण्यात आले होते. या प्रकरणी उरण पोलिसांनी तपासाला सुरुवात केली होती. मात्र विशालचा मोबाईल फोन बंद असल्याने बेपत्ता विशालचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले नाही. तब्बल १२ दिवसांनंतर म्हणजे १४ नोव्हेंबर रोजी विशालला आपण झासीमध्ये असल्याची जाणीव झाली.

फाटके मळके आणि अशक्त अवस्थेत असलेल्या विशालला उरणपासुन झासीपर्यंत कसे पोहचलो हे आठवेना. अंगावरील छिन्नविछिन्न झालेल्या कपड्यातील कप्प्यात नौदलाचे ओळखपत्र सापडले. या ओळखपत्राच्या आधारावर आणि नागरिकांच्या मदतीने १४ नोव्हेंबर रोजी म्हणजे बेपत्ता झाल्यानंतर तब्बल १२ दिवसांनी दरमजल करून धपरौली गावातील घर गाठले. घरच्यांनी तत्काळ उरण पोलीस, नौदल अधिकाऱ्यांना याची माहिती दिली.

सापडल्यानंतर त्वरित नौदल अधिकाऱ्यांनी विशाल याला उपचारासाठी मेरठ येथील नौदलाच्या इस्पीतळात दाखल केले आहे. त्याला १२ दिवसात काय घडले याची काहीच माहिती नसल्याने त्याच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती चुलत भाऊ अमन भटनागर यांनी दिली. तर या घटनेला तपास अधिकारी अनिरुध्द गिजे यांनीही दुजोरा दिला आहे. उपचारानंतर या प्रकरणी स्वतंत्रपणे चौकशी करण्यात येईल अशी माहितीही गिजे यांनी दिली.

Comments
Add Comment