Saturday, March 15, 2025
Homeमहत्वाची बातमीMH-KA border : सीमा भागात पूर्वीप्रमाणे मुख्यमंत्री सहायता निधी मिळणार

MH-KA border : सीमा भागात पूर्वीप्रमाणे मुख्यमंत्री सहायता निधी मिळणार

सीमाप्रश्न सोडवण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारचा पुढाकार

मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी (MH-KA border) राज्य शासनाकडून उच्च तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाईंवर विशेष जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

सोमवारी सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नासंदर्भात उच्चाधिकारी समितीची बैठक झाली. या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे सीमा प्रश्नी त्याभागातील बांधवांच्या नेहमी पाठीशी राहिले आहेत.

सीमा प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासन गांभीर्याने लक्ष घालत आहे. त्यासाठी ज्येष्ठ विधीज्ञ वैद्यनाथन यांची नेमणूक करण्यात आली आहे. गरज भासल्यास अधिक विधिज्ञांची संख्या वाढविण्यात येईल. राज्य शासनाने संपूर्ण लक्ष याप्रश्नावर केंद्रित केले आहे. त्याचबरोबर आपण व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आम्ही या प्रश्नासंदर्भात पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री यांची लवकरच भेट घेऊ, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

न्यायालयात सीमा भागातील प्रश्नांसंदर्भात कशाप्रकारे बाजू मांडायची या संदर्भात प्रामुख्याने या बैठकीत चर्चा झाली. या दोन्ही मंत्र्यांनी सीमावर्ती भाग म्हणजेच खासकरून बेळगाव आणि कर्नाटक सीमेशी लगत असलेल्या महाराष्ट्राच्या भागातील प्रश्न सोडवणे, तेथील लोकांच्या मागण्या समजून घेणे अपेक्षित आहे.

महाराष्ट्र शासनाच्या योजनांचा लाभ सीमा भागातील बांधवांना प्रभावीपणे होण्यासाठी सीमा प्रश्न हाताळणाऱ्या विशेष कक्षाचे बळकटीकरण करावे. मुख्यमंत्री सहायता निधीचा लाभ पूर्वीप्रमाणे सीमा भागात देण्याचा तसेच महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ देखील सीमा भागातील बांधवांना देण्यासाठी राज्य शासन सकारात्मक असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना एक सर्वपक्षीय शिष्टमंडळ आगामी काळात भेटावे यासाठी मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे. याशिवाय महाराष्ट्रातील सर्व खासदारांनीही पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना भेटून सीमावर्ती भागात जिथे मराठी भाषिक राहतात, तो भाग महाराष्ट्रात आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

दरम्यान सीमा प्रश्न अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. याप्रश्नी महाराष्ट्रातील सर्व राजकिय पक्ष एकत्र आहेत. सनदशीर, लोकशाही मार्गाने हा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आम्ही सर्व जण सीमावासीयांबरोबर आहोत, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली.

या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, समितीचे सदस्य मंत्री चंद्रकांत पाटील, डॉ. तानाजी सावंत, दीपक केसरकर, शंभूराज देसाई, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार पृथ्वीराज चव्हाण, राजेश क्षीरसागर, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, ज्येष्ठ संपादक किरण ठाकूर आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचे सदस्य उपस्थित होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -