लहानपणी आम्ही मैदानावर ‘साखळी’ नावाचा एक खेळ खेळत असू (Bakulphule). अलीकडे हा खेळ खेळताना कुणीच दिसत नाही. असतील ती आठ-दहा मुले पळताना एकाने डाव घेऊन इतर मुलांना शिवायला जायचे.
एकाला शिवले की, दोघांनी हात धरून पळून तिसऱ्याला शिवायचे. अशी ६-७ मुलांची साखळी करून ८व्या, ९व्या मुलांना पकडताना मजा यायची. म्हणजे खेळातही माणसाला माणूस जोडून घेणे हे नकळत शिकवले जायचे. अर्थात त्यासाठी हा खेळ नव्हता. कडीला कडी जोडून घेऊन त्यांना सोबत घेऊन पळायचे.
आताच्या आणि खासकरून विलगीकरण हा शब्द कोरोनामुळे छोट्या-छोट्या मुलांनाही माहीत झालाय. नाही तर दिवसेंदिवस जग जितके जवळ येतंय, तितका माणसापासून माणूस अलग म्हणा, विलग म्हणा होतोय. मोबाइल असेल लॅपटॉप असेल, इंटरनेट बँकिंग सेवा असेल नाही तर ऑनलाइन खरेदी असेल. माणसाला माणूस उंबराच्या फुलासारखा भेटतोय.
पण अशा वेळी पोस्टमनसारख्या माणसाशी सुद्धा किती जवळचा संबंध येत होता, त्याची आठवण येते आणि त्याच्या गोष्टी सांगताना उमलून यायला होतं. मला आठवतंय डोंबिवली सुटल्यानंतर २-४ वर्षांनी मला एमआयडीसी पोस्ट ऑफिसमध्ये काही कामासाठी जावे लागले. लाइनमधून मी खिडकीशी आले. पोस्टमन क्लार्कने मान वर करून पाहिले आणि दोघांच्याही तोंडून एकदम वाक्ये बाहेर पडली. तो म्हणाला, “ताई, किती वर्षांनी? आणि इकडं कुठं?”
मी म्हटलं, “अहिरे, तुम्ही या जागेवर? आनंद वाटला आणि तुम्ही मला कसं ओळखलं?”अहिरे म्हणाले, “एक तर माझं प्रमोशन झालं आणि तुम्हाला ओळखणं अवघड नव्हतं. कारणं तुमचं एकच घर असं होतं, त्या बिल्डिंगमध्ये की, तुमची दोन्ही मुलं मला “काका” म्हणून बोलवायची आणि वाटायचं की, इथं आपलं घर आहे. तुम्ही घरी नसतानाही तुमच्या लेकीनं मला उन्हातून चढून वर आलो म्हणून सरबत करून दिलं होतं.”
त्याच्याही काळसर चेहऱ्यावर मला भेटून आतून आनंद झालेला दिसत होता.आता पोस्टमनबद्दल बोलताना आणखी एक असाच अनुभव सांगते. या लोकांचं काम केवळ कोरड्या मनानं पत्र देणं नाही, तर पत्राबरोबर तिकिटाशेजारी माया नावाचं दुसरं तिकीट अवश्य लावणं हे पण आहे. ते पण हे लोक करतात.
‘श्वास’ चित्रपटाच्या यशानंतर मला दिल्लीवरून एपीजे कलामांचं पत्र राष्ट्रपती भवनातून आलं. त्या दिवशी त्या माळकरी पोस्टमनला स्वत:लाच पारितोषिक मिळाल्याचा आनंद झाला. त्याने ते सुंदर वेष्टनातले पत्र पोस्टमास्तरना दाखवले. मास्तर म्हणाले, “आज मी हे पत्र देतो त्यांच्याकडे नेऊन” तर पोस्टमन काकाने सांगितले, “आज यायचे असेल, तर सर तुम्ही बरोबर या. पण गेली साडेचार वर्षे सुख-दु:खाची सारी पत्रे मी या हातांनी दिली आहेत, (तेव्हा पोस्टमन पायऱ्या चढून वरपर्यंत येत होते. नंतर खाली बॉक्सेस झाले.) तर आजही ताईच्या चेहऱ्यावरचा आनंद मला पाहायचाय.” वा रे! भले शाब्बास! एक तर बॉसला स्पष्ट सांगणं आणि दुसऱ्याचा आनंद आकाशासारखा भासतो मला. नाही तर समुद्र दिसला की डबक्यात पाहणारेच जास्त!
कधी या लोकांकडे उदारतेने पाहिले जात नाही. फुल सूट टाय, कार घेऊन येणारीच आपले लक्ष वेधतात ही माणसं. ही माणसं गुलाबासारखी नाही, तर बकुळीच्या फुलासारखी वाटतात. कोणी खुडून घेत नाही. आपोआप मनानं धरतीवर येतात आणि मुकली तरी सुगंध सोडत नाहीत.
परवा सहजच प्रसिद्ध लेखक, कवी प्रवीण दवणेसरांशी बोलताना त्यांच्या मातोश्रींचा विषय निघाला. त्यांची आई मायेचा कुंभ होती. त्यातला मधुथेंबही मीही चाखलाय, तसा पोस्टमनही चाखत होता. कारण ते ठाण्यात आल्यावर डोंबिवलीला आलेली पत्रे रिडिरेक्ट करताना त्यावर पोस्टमनने आजींना लिहिलं होतं. “नमस्कार! तुम्ही येथून गेल्यावर आजदे गावातल्या या चाळीच्या घराला कुलूप पाहून खूप वाईट वाटतं. कारण, “या गूळपाणी घेऊन जा” म्हणणारी एक आजी इथं राहत होती.”
ही आपुलकी आता कुठे मिळणार? आपुलकीच सगळीकडे आपुलकीलाच शोधतेय आणि म्हणतेय, “मला कुठंतरी यायचंय हो! या साध्या, सामान्य माणसात मी वास करतेय, अशी ठिकाणं आणखी मला दाखवाल का? दाखवाल का?”
-माधवी घारपुरे