Saturday, July 20, 2024
Homeमहत्वाची बातमीLove Jihad : ‘लव्ह जिहाद’ने केली श्रद्धाची कत्तल

Love Jihad : ‘लव्ह जिहाद’ने केली श्रद्धाची कत्तल

सोशल मीडियावरून मकरंद मुळे यांची कविता गाजते आहे, त्या कवितेत लव्ह जिहादच्या (Love Jihad) जाळ्यात हिंदू मुली कशा सहज फसतात, मोहात सापडतात, अगतिक होतात आणि शेवटी कशा उद्ध्वस्त होतात, हे मांडले आहे.

हो, मला आवडतं,
जिहाद समजून न घेता पळून जायला…
हो मला आवडतं,
त्याच्यासोबत पळून जायला,
मारहाण करून घ्यायला,
त्याच्याकडून तुकडे करून घ्यायला,
जाळून घ्यायला,
गुपचूप निकाह उरकायला,
हिजाब घालायला,
आणि त्याची दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी
बेगम व्हायला…

मुंबईतील मालाड येथील कॉल सेंटरमध्ये नोकरी करणाऱ्या, वसईला राहणाऱ्या आणि विरारच्या कॉलेजमध्ये शिकणाऱ्या श्रद्धा विकास वालकर या मुलीला आफताब अमिन पूनावाला या तरुणाने नादी लावले, मोहात ओढले, लिव्ह इन रिलेशनमध्ये राहण्यास उद्युक्त केले आणि त्याची गरज संपली तेव्हा दिल्लीला नेऊन तिचा गळा दाबून हत्या केली आणि तिच्या शरीराचे पस्तीस तुकडे करून जंगलात फेकून दिले. लव्ह जिहादचा शेवट कसा क्रूर व भयानक असतो त्याचे हे ज्वलंत उदाहरण आहे. आफताबच्या प्रेमात श्रद्धा पागल झाली होती, त्याने तिच्यावर जादू केली होती, मी निर्णय घ्यायला स्वतंत्र आहे, मी त्याच्याबरोबर जाणार, असे वडिलांना सांगण्यापर्यंत तिची मजल गेली होती. आफताब हा दिल्ली पोलिसांपुढे खोटे बोलून त्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहे. पोलिसांना तो चुकीची माहिती देत असल्याने श्रद्धाच्या हत्येचे पुरावे जमा करणे, हे पोलिसांपुढे फार मोठे आव्हान आहे.

वसईचे पोलीसही चक्रावून गेलेत, त्यांनी जेव्हा आफताबला चौकशीसाठी बोलावले तेव्हा किंचितही संशय येऊ नये, अशी त्याने दक्षता घेतली. श्रद्धाचा खुनी असूनही आपण निष्पाप आहोत, ती अगोदरच आपल्याला सोडून निघून गेली होती, असा तो आव आणत आहे. श्रद्धाच्या हत्याकांडाचे पुरावे मुंबईपासून दिल्लीपर्यंत जमा करणे व त्याची सुसंगत मांडणी करणे यासाठी पोलिसांना फार मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे. आफताबने छत्तरपूरमधील ज्या फ्लॅटवर श्रद्धाची गळा दाबून हत्या केली, त्या घरात सहा महिन्यांनतर रक्ताचा ठिपका सापडणार कसा? खून केल्यानंतर कोणताही पुरावा शिल्लक राहू नये, याची दक्षता आफताबने घेतली. आफताबने रसायनांचा वापर करून त्या फ्लॅटची स्वच्छता केली. आफताबने पोलिसांसमोर कबुली दिली की, श्रद्धाच्या शरीराचे पस्तीस तुकडे करायला त्याला दहा तास लागले. सर्व तुकडे पाण्याखाली त्याने तासभर धुतले. तुकडे करताना त्याने बाथरूममधील शॉवर चालू ठेवला होता. नंतर पॉलिथिनच्या १८ बॅगांमध्ये भरून ते फ्रीजमध्ये ठेवले. त्यानंतर ऑनलाइन जेवण मागवले, बिअर घेतली, जेवला, वेबसीरिज पाहिली व तेथेच राहिला. श्रद्धाची हत्या झाल्यावर त्याने त्याच्या काही मैत्रिणींनाही याच फ्लॅटवर आणले होते. तेथे त्याने कोणाकोणाला रोमान्स करण्यासाठी आणले? त्याचा शोध पोलीस घेत आहेत.

श्रद्धाच्या हत्येनंतर त्याने आपला जुना मोबाइल ‘ओएलएक्स’वर विकून टाकला. श्रद्धाचा मोबाइल कुठे आहे, तो नेमके सांगत नाही, आपण मुंबईजवळ फेकून दिला, असे म्हणतो.

आफताबने ज्या दुकानातून फ्रीज खरेदी केला, श्रद्धाच्या शरीराचे तुकडे करण्यासाठी हत्यारांची जेथून खरेदी केली, तिथपर्यंत पोलीस पोहोचले आहेत. त्याने ऑनलाइन जेवण मागवले, त्या कंपनीचा शोध घेतला. श्रद्धाच्या शरीराचे तुकडे करताना त्याच्या हाताला जखम झाली होती, त्या जखमेवर उपचार केले, त्या डॉ. अनिल सिंगची जबानी पोलिसांनी घेतली आहे. पोलिसांना जंगलात जे शरीराचे तुकडे सापडले आहेत, ते फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवले आहेत. श्रद्धाच्या वडिलांचे डीएनएचे नमुने घेण्यात आले आहेत.

श्रद्धाची हत्या १८ मे रोजी रात्री दहाच्या सुमारास झाली. पण तिचा मोबाइल फोन २६ मेपर्यंत चालू होता. दरम्यानच्या काळात आफताबने तिच्या बँक अकाऊंटवरून ५४ हजार रुपये ट्रान्सफर केले. श्रद्धाचा मोबाइल बंद झाला, तेव्हा त्याचे शेवटचे ठिकाण हे दिल्ली होते. तिथूनच श्रद्धाच्या हत्येचे धागे-दोरे उलगडायला सुरुवात झाली. श्रद्धाची हत्या करून तिच्या शरीराचे तुकडे करून आफताब फ्रीजमध्ये ठेवतो आणि एका तरुणीला फ्लॅटवर मौज-मजा करण्यासाठी आणतो, एवढी क्रूर मानसिकता त्याची कशी तयार झाली? अन्य मुलींशी संबंध हे श्रद्धाच्या हत्येचे कारण असू शकते का? पोलिसांना जंगलात शरीराचे अवयव सापडलेत ते श्रद्धाचेच आहेत का? श्रद्धा व आफताब हे ८ मे रोजी दिल्लीला गेले व अवघ्या दहा दिवसांत म्हणजे १८ मे रोजी तिची हत्या झाली, हे सर्व नियोजनबद्ध वाटते. छत्तरपूरला जंगलाजवळ भाड्याचे घर घेणे हासुद्धा हत्येच्या कटाचा भाग असू शकतो. ‘येस, आय किल्ड हर’, अशी कबुली आफताबने पोलिसांपुढे दिली आहे.

आफताब व श्रद्धा हे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये २०१९ पासून होते. लिव्ह इन रिलेशन असा कायदा झालेला नाही, पण सर्वोच्च न्यायालयाने वयाने सज्ञान असलेल्या अविवाहित स्त्री-पुरुषांना असे राहण्याची परवानगी दिलेली आहे. श्रद्धाने आफताबकडे लग्नाचा तगादा लावला म्हणून त्या दोघांमध्ये वारंवार भांडणे होत असत. तो तिला मारहाण करीत असे. सिगारेटचे चटके देत असे. तसे तिने आईलाही सांगितले होते. पण ती आफताबला सोडून आई-वडिलांकडे परतली नाही किंवा तशी तिला संधीही मिळाली नसावी. तिची हत्या झाली तेव्हा कोणी साक्षीदार नव्हता. हत्येनंतर तिचा मृतदेह मिळालेला नाही. जंगलात मिळालेले शरीराचे तुकडे हे तिचेच आहेत, हे पोलिसांना सिद्ध करावे लागतील. आफताबच्या सांगण्यावर विश्वास न ठेवता पोलिसांना सखोल तपास करावा लागेल. केमिकल्सच्या सहाय्याने रक्ताचे नमुने किंवा तिच्या केसाचे तुकडे पुरावे म्हणून सापडू शकतात का? हे पोलिसांना मोठे आव्हान आहे.

आफताब हा सीरिअल किलर आहे का? श्रद्धा ही जर हिंदू नसती, तर अशी निर्घृण हत्या झाली असती का? दुसरी कोणी असती, तर तिच्या शरीराचे पस्तीस तुकडे झाले असते काय? कसायासारखे शरीराचे तुकडे पाडणारा आफताब पूनावाला हा दहशतवादी आहे का? मध्यरात्रीनंतर तो तिच्या शरीराचे तुकडे जंगलात फेकण्यासाठी बाहेर पडत होता, तेव्हा कोणालाच कधी संशय आला नाही का? श्रद्धाला मुंबईतून दिल्लीला आणून तिची हत्या करण्याचा कट रचला गेला काय? या कटात आणखी कोण कोण होते? आफताबचे आई-वडील खानदान कुठे आहे, काय करते? त्याचे उत्पन्नाचे साधन काय? दरमहा त्याची मिळकत किती? श्रद्धाची व तिच्या परिवाराची सर्व माहिती मीडियातून सविस्तर तत्काळ प्रसिद्ध झाली, मग आफताब पूनावालाची कुंडली सविस्तर का येऊ नये? बिल्किस बानो हत्या व गँग रेप प्रकरणी जन्मठेप झालेल्या सर्व सहा जणांची मुक्तता झाली, तेव्हा रस्त्यावर येऊन निषेध करणारे श्रद्धाच्या हत्येनंतर शांत का बसले आहेत? एका मराठी मुलीची दिल्लीत नेऊन क्रूर हत्या होते, तिच्या शरीराचे तुकडे-तुकडे केले जातात, सहा महिने होईपर्यंत त्याचा थांगपत्ता कसा कुणाला लागत नाही? लव्ह जिहादमध्ये तिची क्रूर पद्धतीने हत्या करणाऱ्या आफताबला मृत्युदंडाची शिक्षा लवकर झाली पाहिजे.

आफताबने श्रद्धाची हत्या अत्यंत थंड डोक्याने केली आहे. यापुढे दुसरी श्रद्धा अशा जाळ्यात फसू नये म्हणून तरुण मुलींनी सावध राहणे गरजेचे आहे. आफताब व श्रद्धा प्रकरणात तो शिकारी राहिला व त्याने श्रद्धाला सावज म्हणून टिपले. शिकारी तिकडचा व सावज इकडचे अशीच उदाहरणे कायम दिसत असतात, याचे कारण काय? ऑनलाइन डेटिंगमधून लिव्ह इन रिलेशनपर्यंत वाहत गेल्यावर शेवट काय होतो, हे श्रद्धाच्या क्रूर हत्येने दाखवून दिले आहे.

-डॉ. सुकृत खांडेकर

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -