
कविवर्य मंगेश पाडगावकर यांचे साहित्यातले योगदान अद्वितीयच म्हणावे लागेल. (rain) त्या काळी कविता वाचनाचे फारसे कार्यक्रम होत नसत. महाराष्ट्रभर कविता वाचनाचे जाहीर कार्यक्रम करीत फिरणे, ही कल्पना त्याकाळी कुणीही स्वीकारली नसती.
अशा काळात कविवर्य वसंत बापट आणि विंदा करंदीकर यांच्याबरोबर पाडगावकरांनी असे जाहीर कार्यक्रम सर्वत्र घडवून आणले. त्यांच्या या अभिनव उपक्रमातून महाराष्ट्रभर एक वेगळीच साहित्यिक जाणीव निर्माण झाली. तरुणांना कवितेसारखा गंभीर साहित्य प्रकारात रूची निर्माण झाली, हे श्रेय या तीन कवींना द्यावे लागेल.
पाडगावकरांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे उर्दूत ज्या दर्जाच्या रोमँटिक कविता लिहिल्या जात, तितक्याच उत्कट, तरल आणि भावगर्भ कविता त्यांनी लिहिल्या. त्यामुळे साठीच्या आणि सत्तरीच्या दशकांत लोक त्यांच्या कविता वाचनाच्या कार्यक्रमांना आवर्जून हजेरी लावू लागले. कवितेला लोकप्रिय करताना त्यांनी कोणतीही तडजोड मात्र केली नाही. मराठीचे समृद्ध शब्दसौंदर्य काळजीपूर्वक जपत तिला ग्रंथालयातून बाहेर काढून लोकाभिमुख करण्याचे श्रेय पाडगावकर, बापट आणि विंदा यांना नक्कीच दिले पाहिजे.
‘श्रावणात घन निळा बरसला’ ही त्यांची कविता म्हणजे पाडगावकरांच्या नितांत सुंदर अशा चित्रमय शैलीचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. त्यांच्याच शब्दांत सांगायचे, तर ही कविता पाचूचे रत्नच आहे. त्यात त्यांनी ज्या अलौकिक उपमा वापरल्या आहेत. त्या केवळ तेच वापरू शकतात. पाचूंच्या ‘हिरव्या माहेरी’ ‘ऊन हळदीचे’ आले! माझ्या भाळावर ‘थेंबांचे फुलपाखरू’ झाले! कसला हा टोकाच्या तरल, चित्रमय प्रतीकांचा वर्षाव! पानोपानी ‘शुभ शकुनांच्या कोमल ओल्या रेषा’, मातीच्या गंधाने भरला ‘गगनाचा गाभारा’ कसल्या या उपमा. एका ओळीत, एका क्षणात, पाडगावकर अवघ्या आसमंताला एक मंदिर करून टाकतात. वर पुन्हा त्यांचा तो आकाशाएवढा गाभारा, सगळेच अकल्पित!
इतक्या तरल आणि चित्रमय शैलीत लिहिणारा हा कवी तितकाच विद्रोही आणि उपरोधिक बनू शकतो, हे त्यांच्या “सलाम” या कवितेने सिद्ध केले होते. ‘सलाम’इतकी लोकप्रियता दुसऱ्या कोणत्याही कवीच्या कवितेला मिळाली नाही. एखादा उर्दू शायर मैफलीत आपली शायरी सादर करायला उभा राहावा आणि त्याला अमुकच एक नज्म वाचा म्हणून आग्रह व्हावा, तसा त्यांना ‘सलाम’साठी आग्रह व्हायचा! अशीच त्यांची एक कविता संगीतकार यशवंत देवांनी स्वरबद्ध करून अमर केली आहे. कवितेतील मुग्ध, आत्ममग्न सूर लक्षात घेऊनच त्यांनी निरागस, पारदर्शी आणि भावूक आवाजाच्या अरुण दातेंची निवड केली असावी. त्या अतिशय रोमँटिक कवितेचे शब्द होते -
भेट तुझी माझी स्मरते अजून
त्या दिसाची,
धुंद वादळाची होती
रात्र पावसाची...
गाण्याच्या पहिल्याच ओळीत कवी एका मनस्वी, बेधुंद मूडची निर्मिती करून टाकतो. श्रोत्याला चटकन त्याच्या स्मृतिवनात, गूढ भावविश्वात, नेणारी ही कविता तारुण्यातल्या, आता हूरहूर लावणाऱ्या आठवणीत बदललेल्या, रम्य अनुभवाचे वर्णन आहे.
यौवनात प्रेमाच्या अनावर जाणिवेत बाकी सगळे भान निघूनच जाते. सगळीकडे त्या जीवलग व्यक्तीशिवाय काही दिसतच नाही. तिचे किंवा त्याचे रूप अवघी जाणीव व्यापून टाकते, तिने सगळे भावविश्व दिवस-रात्र घेरून टाकलेले असते. नव्हाळीतल्या प्रेमाला भयाच्या भावनेचा स्पर्शही होत नसतो. त्यालाच कवी “तुला मुळी नव्हती बाधा भीतीच्या विषाची” असे म्हणतो. हे सगळे किती चित्रमय पद्धतीने पाडगावकर सांगतात पाहा -
कुठे दिवा नव्हता, गगनी एकही न तारा,
आंधळ्या तमातून वाहे
आंधळाच वारा...
तुला मुळी नव्हती बाधा
भीतीच्या विषाची,
धुंद वादळाची होती रात्र पावसाची...
प्रेम अनावर झाले की, लौकिकाचे भय निघूनच जाते. यौवनातली प्रीतीभावना इतकी प्रखर असते की, माणूस घरदार, आई-बाप, नाव-गाव सगळे विसरून जातो. प्रेमाच्या त्या स्वर्गीय नशेत अगदी लाजऱ्या-बुजऱ्या प्रियेच्या अंगीही धैर्य येते, ती कोणतेही साहस करू शकते.
क्षुद्र लौकिकाची खोटी झुगारून नीती,
नावगाव टाकून आली
अशी तुझी प्रीती...
तुला मुळी जाणीव नव्हती
तुझ्या साहसाची,
धुंद वादळाची होती रात्र पावसाची...
या कवीने अनेक कल्पना प्रथमच रंगवल्या. शृंगाराचे किती तरल, सप्तरंगी चित्र तो उभे करतो पाहा. त्या वादळी रात्री प्रिया चिंब भिजून प्रियकराला भेटायला आली आहे. तिच्या घनदाट केसातून पाण्याचे चमचमणारे पारदर्शी थेंब एकेक करून तिच्या गालावर ओघळत आहेत. कवी हे किती संयतपणे, नुसते सूचित करून सांगतो पाहा. त्याचे शब्द त्या अनुभवाला अजूनच रोमांचक करून टाकतात -
केस चिंब ओले होते, थेंब तुझ्या गाली,
ओठांवर माझ्या त्यांची किती
फुले झाली...
श्वासांनी लिहिली गाथा
प्रीतीच्या रसाची,
धुंद वादळाची होती रात्र पावसाची...
प्रीती हे वेडच असते. त्या टोकाच्या धुंदीत मग जन्मोजन्मी साथ देण्याच्या आणाभाका दिल्या-घेतल्या जातात. सगळे इतके बेधुंद, उन्मादी घडत जाते की, ते वास्तवात घडत आहे, असे वाटतच नाही! तो प्रेमार्त शृंगाराचा अनुभव इतका रम्य आणि नशिला असतो की, वाटते आपण स्वप्नातच आहोत!
सुगंधीच हळव्या शपथा,
सुगंधीच श्वास,
स्वप्नातच स्वप्न दिसावे
तसे सर्व भास...
सुखालाही भोवळ आली मधुर सुवासाची,
धुंद वादळाची होती रात्र पावसाची...
मदिरेच्या एका थेंबााशिवायही नुसती अमर्याद धुंदी अनुभवायची असेल, तर अशा कवींना आणि अशा भावगीतांना पर्याय नाही!
-श्रीनिवास बेलसरे