
भाईंदर (वार्ताहर) : मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयामार्फत शहरातील नवविवाहितेला (newlyweds) लग्नानंतर सासरच्या लोकांकडून आर्थिक, मानसिक, शारीरिक, शाब्दिक अशा प्रकारचा त्रास देणाऱ्या व्यक्तींच्या विरुद्ध ४९८ (अ) मार्फत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
आयुक्तलायाच्या हद्दीमधील १६ पोलीस ठाण्यांमध्ये एकूण २५५ गुन्हे दाखल करण्यात आले असून गुन्हेगारांना शिक्षा देखील झाल्याची माहिती आतुक्तालयामार्फत देण्यात आली आहे. मीरा-भाईंदर शहराची वाढती लोकसंख्या व महिला हिंसाचार / कौटुंबिक हिंसाचाराच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर महिलांच्या तक्रारींना प्राधान्य देणे, त्यांना समुपदेशन करून मानसिक आधार देणे व त्यांच्या तक्रारीचे निवारण करणे याकरता पोलीस आयुक्त सदानंद दाते यांच्या हस्ते भरोसा सेलचे उद्घाटन करण्यात आले होते.
आयुक्तालयामार्फत सुरू करण्यात आलेल्या भरोसा सेलच्या मदतीने जवळपास ६३ टक्के संसार तुटण्यापासून वाचवत पुन्हा नव्याने मार्गी लावले आहेत. नवविवाहितेचा छळ, अत्याचार, मारहाण,अभद्र भाषा वापरणे, अश्लील वक्तव्य करणे अशा प्रकारचे अनेक गुन्हे आयुक्तालयाच्या विविध पोलीस ठाण्यांत दाखल आहेत. पोलीस आयुक्त सदानंद दाते यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पोलिसांनी दाखल असलेल्या गुन्ह्यांची दखल घेत महिलांना न्याय मिळवून दिला आहे.