
राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत!
मुंबई : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानानंतर आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे 'शिवाजी (Shivaji) जुन्या काळातले आदर्श' हे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात नेतेमंडळींनी केलेल्या वक्तव्यांवरून मोठा वाद चालू असल्याचे पाहायला मिळत आहे. आधी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर ब्रिटिशांकडून पेन्शन घ्यायचे, त्यांनी ब्रिटिशांची माफी मागितली होती, असे विधान केले. त्यावरून वाद चालू असताना प्रत्युत्तरादाखल सावरकरांचे नातू रणजीत सावरकर यांनी “एका महिलेसाठी नेहरूंनी देशाची फाळणी केली”, असे म्हणताच त्या विधानावरूनही राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटू लागल्या. यानंतर आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मराठवाडा विद्यापीठाच्या कार्यक्रमात बोलताना थेट छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या एका वक्तव्यावरून जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आज मराठवाडा विद्यापीठाकडून मानद डि. लिट पदवी देण्यात आली. या कार्यक्रमाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे कुलपती म्हणून उपस्थित होते. यावेळी बोलताना भगतसिंह कोश्यारी यांनी नितीन गडकरी आणि शरद पवारांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी केली. इतकेच नव्हे, तर शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श असल्याचे विधान राज्यपालांनी केले. त्यांच्या या विधानावरून आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आपल्या भाषणात राज्यपालांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कुणाचा आदर्श ठेवावा यासंदर्भात वक्तव्य केले. “आम्ही जेव्हा शाळेत शिकत होतो, तेव्हा आमचे शिक्षक आम्हाला विचारायचे की तुमचे आवडते नेते कोण आहेत? मग काहींना सुभाषचंद्र बोस चांगले वाटायचे, काहींना नेहरू चांगले वाटायचे, काहींना गांधीजी चांगले वाटायचे, त्यांना जे आवडत होते ते त्या त्या व्यक्तींचे नाव घ्यायचे. मला असे वाटते की जर कुणी तुम्हाला विचारले की तुमचे आवडते हिरो किंवा आदर्श कोण आहेत? तर बाहेर कुठे जायची गरज नाही. इथेच महाराष्ट्रात तुम्हाला ते मिळतील. शिवाजी तर जुन्या काळातले आदर्श आहेत. मी नव्या युगाविषयी बोलतोय. डॉक्टर आंबेडकरांपासून डॉ. नितीन गडकरींपर्यंत सगळे तुम्हाला इथेच मिळतील”, असे भगतसिंह कोश्यारी म्हणाले.
राज्यपालांच्या या विधानाचा संभाजी ब्रिगेडकडून निषेध करण्यात आला आहे. “राज्यपाल भगतसिंह कोश्यारींच्या विधानाचा आम्ही जाहीर निषेध करतो. ते सातत्याने अशी विधाने करत असतात. शिवाजी महाराज हे जागतिक स्तरावरचे आदर्श नेते आहेत. शिवाजी महाराजांची तुलना कुणाशीही आणि कशाशीही होऊ शकत नाही”, अशी प्रतिक्रिया संभाजी ब्रिगेडचे शिवानंद भानुसे यांनी दिली आहे.