Wednesday, April 30, 2025

महामुंबईताज्या घडामोडी

Savarkar : गांधी ५५० रुपये भत्ता घ्यायचे त्याचे काय?

Savarkar : गांधी ५५० रुपये भत्ता घ्यायचे त्याचे काय?

मुंबई : सावरकर (Savarkar) ब्रिटिशांकडून पेन्शन घेत होते, असा आरोप काँग्रेसच्या राहुल गांधी यांनी १६ नोव्हेंबर रोजी वाशीम येथील जाहीर सभेत केला. तो सप्रमाण खोटा ठरवतानाच, महात्मा गांधी ब्रिटिशांकडून ५५० रुपये भत्ता घ्यायचे, त्याचे उत्तर राहुल गांधी यांनी द्यावे, असे प्रतिआव्हान स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू रणजित सावरकर यांनी दिले आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी केलेल्या आरोपांची रणजित सावरकर यांनी पोलखोल केली आहे. ते म्हणाले, ब्रिटिशांनी सावरकरांना रत्नागिरीत १३ वर्षे राजबंदी म्हणून ठेवले. त्यातील शेवटच्या सहा-सात वर्षांत त्यांना ६० रुपये भत्ता मिळत होता. सरकार तुम्हाला बंदिस्त करून ठेवते, त्यावेळीस कोणतेही अर्थार्जन करता येत नाही. सावरकर बॅरिस्टर होते. त्यांना न्यायालयात वकिली करण्यास बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे कायद्यानुसार त्यांना ६० रुपये भत्ता मंजूर करण्यात आला. त्यावेळेस महात्मा गांधींनाही ५५० रुपये भत्ता मिळत होता. असा भत्ता देशातील अनेक राजबंद्यांना कायद्यानुसार देण्यात येत होता. त्यात सुभाषचंद्र बोस यांच्या कुटुंबीयांचाही समावेश आहे, अशी माहिती रणजित सावरकर यांनी दिली.

राहुल गांधी यांनी शिवसेनेला त्यांची महाविकास आघाडीमधील लायकी दाखवून दिली

राहुल गांधी यांनी वीर सावरकरांविषयी अवमानकारक वक्तव्य केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी आमचे त्याला समर्थन नाही, असे म्हटले. पण त्यांचा विरोध कुठेही दिसून आला नाही. महापुरुषांचा अपमान होतो आणि त्याला तुम्ही विरोध करीत नाही, याचा अर्थ स्पष्ट आहे की, तुम्हाला तो अपमान मान्य आहे. राहुल गांधी हे वारंवार करीत आहेत. सावरकर हे बाळासाहेबांच्या आदरणीय स्थानी होते. त्यामुळे त्यांनी बाळासाहेबांच्या पुण्यतिथिदिवशी मुद्दाम सावरकरांवर टीका केली. याचा अर्थ त्यांनी शिवसेनेला त्यांची महाविकास आघाडीमधील लायकी दाखवून दिली आहे, अशी टीकाही रणजित सावरकर यांनी केली.

भाजपा, बाळासाहेबांची शिवसेना आणि मनसेचे आभार

भाजपा, बाळासाहेबांची शिवसेना आणि मनसेचे आभार, त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलने केली. पण, मविआमधील घटकपक्ष राष्ट्रवादी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेसमधील अनेक कार्यकर्त्यांनी मला फोन करून सांगितले, की पक्ष काय करतोय हे आम्हाला पटत नाही. महाराष्ट्राला राजकारणाचा समृद्ध वारसा आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयंतराव टिळक हे स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे अध्यक्ष होते. त्यामुळे मी काँग्रेसच्या विरोधात नाही. ही जी प्रवृत्ती आहे, त्याच्या मी विरोधात आहे, असेही रणजित सावरकर यांनी सांगितले.

Comments
Add Comment