Tuesday, July 1, 2025

Leopard attack : कर्जत, शहापूरमध्ये बिबट्यांचा धुमाकूळ

कर्जत (वार्ताहर) : कर्जत आणि शहापूर तालुक्यांत बिबट्यांनी (Leopard attack) धुमाकूळ घातला आहे. दोन ठिकाणी झालेल्या विविध हल्ल्यांत तिघा जनावरांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी वन विभागाने दखल घेत संभाव्य धोका टाळण्यासाठी नागरिकांना योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


ठाणे जिल्ह्यातील डोळखांब परिसरातील साकडबाव पठारावर बिबट्याचा वावर असून रानात चरायला गेलेल्या शेतकऱ्याची वासरू व शेळी बिबट्याने फस्त केली. शहापूर वन विभागाच्या वनपरिक्षेत्रातील साकडबाव पठारावर चार दिवसांपासून बिबट्याचा वावर सुरू असून अनेक शेतकऱ्यांना त्याचे दर्शन झाले आहे. कोठारे येथील विठ्ठल झुगरे यांचा वासरू व भास्कर दरोडा यांची शेळी रानात चरायला गेली असता बिबट्याने फस्त केली.


रायगड जिल्ह्यात कर्जत नगर परिषद हद्द संपताच साकडबाव परिसरात शिरसे गाव आहे. हा डोंगराळ भाग असून येथे छोट्या-मोठ्या टेकड्याही आहेत. याच परिसरातील शेतकरी निखिल दत्तात्रय देशमुख यांनी आपली गाय चरायला सोडली होती; मात्र रात्री गाय घरी परतली नाही. अन्य शेतकरी त्यांची गुरे चरायला घेऊन गेले असता त्यांना माळरानावर शरीराचे लचके तोडलेली मृत गाय दिसून आली. ग्रामस्थांनी याबाबत शेतकऱ्याला, तसेच वन विभागाला कळवले. वनरक्षकांनी गाईचा पंचनामा करून बिबट्याच्या हल्ल्यात गाय मेल्याचे नागरिकांना सांगितले.


नागरिकांनी सध्या गाई, म्हशींना चरायला सोडू नये, तथा काळजी घ्यावी. रात्री-अपरात्री घराच्या बाहेर एकटे पडू नये. - युवराज साबळे, वनरक्षक, वन विभाग कर्जत.

Comments
Add Comment