Sunday, July 21, 2024

cowherd : गुराखी

घरधनीचा उजवा हात म्हणजे गुराखी (cowherd). मालकाच्या परवानगीने गुरांना जीवापलीकडे सांभाळण्याचे महत्त्वाचे काम गुराखी करीत असतात. सध्या तर गुरांच्या वाढत्या किमती लक्षात घेता गुरे पाळणेही कठीण झाले आहे. मग गुराख्याचे काय. असेच जर चालले तर गुराखी हा शब्द इतिहास जमा होणार. तेव्हा आज आपण गुरे सांभाळणाऱ्या गुराखीविषयी समजून घेऊया.

ग्रामीण भागात पाळीव गुरे चारणारा व राखणाऱ्या व्यक्तीला ‘गुराखी’ असे म्हणतात. गुराख्याला कोकणात आदराने सर्रास ‘राखनो’ असेही म्हणतात. स्वत:च्या तसेच राखणीतल्या पाळीव जनावरांना रानात चरायला नेणे, वेळेवर पाणी देणे, दुसऱ्याच्या शेतात न जाऊ देणे व त्यांची मन लावून राखण करणे हे गुराख्याचे मुख्य काम असते. सकाळी सात ते बारा आणि दुपारी तीन ते साडेसहा या वेळात गुरांना चरायला रानात घेऊन जाणे व पुन्हा घरी घेऊन येणे, असा गुराख्याचा दिनक्रम असतो. शेतीचा विचार करता आजही पावसाळ्यात शेती केली जाते. तसेच पाण्याची सोय आहे अशा काही ठिकाणी हिवाळ्यात सुद्धा शेती केली जाते. तेव्हा भटक्या जनावरांमुळे शेतीचे नुकसान होऊ नये म्हणून गुरे राखली जातात.

शेतीची कापणी झाल्यानंतर गुरे मोकाट सोडली जातात. तरी पण हिवाळ्यात शेती केल्यास शेतीच्या चारी बाजूंनी काटेरी कुंपण घातले जाते. तसेच रानटी प्राण्यांमुळे शेतीचे नुकसान होऊ नये म्हणून शेतीसाठी सुद्धा गडी माणूस ठेवला जातो. हल्ली बऱ्याच ठिकाणी शेतीच्या बाजूंनी कायमस्वरूपी चिरेबंदी भिंत बांधलेली आढळते. त्यामुळे सहसा मोकाट जनावर आत जाऊ शकत नाहीत. काही ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात कुंपण घातले जाते. तरी पण काही गुरे उड्या मारून आत जातात. नंतर बरेच नुकसान करतात. असे एखाद्या शेतकऱ्याचे नुकसान होऊ नये म्हणून गुराखी ठेवला जातो. गुराखी आपले काम उत्तम प्रकारे करीत असतात. मात्र त्यांना योग्य मोबदला मिळत नाही. वर्षातून काही ठरावीक महिने काम मिळते.

हल्ली गुरांचे प्रमाण जरी कमी होत असले तरी सर्रास जास्त प्रमाणात गुरांचा घरधनीच त्यांची राखण करतो. काही वेळा शेती जास्त, घरधनी नोकरीला किंवा स्वत:चा उद्योग असेल तर आपल्याला बिनधास्तपणे काम करता यावे. यासाठी आपल्या विश्वासातील माणूस आपल्या ठिकाणी गुरांच्या राखणीसाठी गुराखी म्हणून ठेवतात. त्यामुळे आपले काम व पाळीव जनावरांची अगदी चांगल्या प्रकारे राखणी होते.

दररोजचा त्याचा पोशाख म्हणजे सर्सास खाकी हाफ पॅन्ट, सफेद बनियन, कंबरेला आकडी, त्यात धार धार कोयता, खांद्यावर कांबळे, पाऊस नसेल तर पांढरी टोपी, हातात चिव्याचा आपल्या उंची एवढा दांडा, असा कोकणात गुराख्याचा साज लयभारी असतो. आपल्या रुबाबाप्रमाणे मुक्या बैलांना सुद्धा शिस्त शिकवत असतात. कुकारा मारणे व बैलांना हाक मारण्याची कला काही त्याची न्यारीच असते. बैल जवळपास असल्यावर तसा त्याला प्रतिसाद देतात. येताना आपल्या मालकाला सुखी लाकडे हाणायला विसरत नाही. त्याच्या जोडीला घरी लहान वासरू असेल तर हिरवा चारा सुद्धा आणायला विसरत नाही, असा प्रामाणिक गुराखी असतो.

त्या व्यतिरिक्त मालकाच्या घराचा परिसरसुद्धा स्वच्छ करतो. तसेच झाडांना पाणी घालण्यासाठी झाडा भोवती चारी बाजूंनी छोटा बंधारा बांधला जातो. त्यामध्ये पाणी साठवून ठेवले जाते. अशी बारीक सारीक कामे सुद्धा गुराखी करीत असतात. ते सुद्धा कोणत्याही फळाची अपेक्षा न करता. अशा प्रकारे शेती हंगामात अनेक लोकांना वर्षातून किमान चार ते पाच महिने गुराखी म्हणून काम मिळायचे. आता मात्र परिस्थिती वेगळी आहे. लोकच गाव सोडून रोजी-रोटीसाठी शहराकडे जाऊ लागले आहेत. तेव्हा सध्या गुराख्याचे भवितव्य धोक्यात आले आहे.

महागाई त्यामुळे गुराखी जेरीस आला आहे. आज जरी रोख स्वरूपात रक्कम दिली जात असली तरी पूर्वी धान्याच्या स्वरूपात मोबदला दिला जात असे. यांना कधी सुट्टी दिली जात नाही. अडीअडचणीच्या वेळी मालकाचे चार शब्द ऐकून घरी जायला मिळत असे. म्हणजे केवढा मोठा अन्याय सहन करावा लागत होता, याची कल्पना येते. काही वेळा मालकाचे रोजचे बोलणे एकूण न सांगताच काम सोडतात. अशी सुद्धा परिस्थिती पाहायला मिळते. तेव्हा गुराख्याने गुरे जरी टाकली तरी घरधनी टाकत नाही. तो काही ना काही तरी पर्याय शोधून काढत असतो. तेव्हा अशा गुराख्याची शासन दरबारी नोंद होऊन त्यांची तसेच त्यांच्या कुटुंबीयांची काळजी राज्य शासनानी उचलायला हवी.

-रवींद्र तांबे

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -