नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : परिस्थिती साजेशी नसतानादेखील एकदा मनाशी पक्क केले, तर आपण काहीही करू शकतो. हीच गोष्ट आपल्याला बापूसाहेब मांगुरे यांनी दाखवून दिली आहे. (hatching machine) दिव्यांग असून सुद्धा ३८ वर्षीय बापूसाहेब मांगुरे यांनी खराब फ्रीजचा वापर करून हॅचिंग मशीनची निर्मिती केली आहे. शेतीपूरक उद्योग करणाऱ्यांसाठी मांगरे यांचा हा प्रयोग निश्चितच उपयोगी पडणारा आहे.
कोल्हापूरच्या करवीर तालुक्यातील केकतवाडी हे बापूसाहेब मांगरे यांचे गाव आहे. एका अपघातात त्यांना मनगटापासून पुढचा एक हात गमवावा लागला. शिक्षण दहावी नापास कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी एमआयडीसीत ते नोकरी करतात; मात्र शेतीपूरक व्यवसाय म्हणून ते कोंबड्या व शेळीपालन करतात. याबरोबरच घरातच शंभर ते सव्वाशे पक्ष्यांची हॅचिंग मशीन तयार करण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता आणि यासाठी त्यांनी हॅचिंग मशीनचा अभ्यास केला. शेतीपूरक व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना परवडेल अशा हॅचिंग मशीनची निर्मिती करण्यासाठी मांगुरे यांनी प्रयत्न केले. खराब फ्रीजपासून त्यांनी जवळपास ८-१० दिवसांत हे हॅचिंग मशीन विकसित केले.
जिल्हा पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी हॅचिंग मशिनची पाहणी केल्याचे मांगुरे यांनी सांगितले. हे मशीन अत्यंत चांगले आहे आणि पशुसंवर्धन विभागाकडून काही मदत देण्यासाठी प्रयत्न करू, असे यावेळी त्यांनी सांगितले आहे, असे देखील मांगुरे म्हणाले. ज्या ठिकाणी विजेचा जास्त प्रॉब्लेम आहे, त्या ठिकाणीदेखील या मशीनद्वारे जास्त नुकसान होत नाही. या हॅचिंग मशीनच्या माध्यमातून कोंबड्यांच्या पिलांचे उत्पादन घेता येते. इतर हॅचिंग मशीनमध्ये ७५ ते ८० टक्के उत्पादन होत असते; मात्र घरी तयार केलेल्या हॅचिंग मशीनमधून ९० टक्के उत्पादन होत असल्याचे मांगरे सांगतात. सध्या बाजारात शंभर-दीडशे पक्षांच्या हॅचिंग मशीनची किंमत किमान ६० हजार रुपयांपासून आहे; पण घरीच कमी खर्चात मांगुरे यांनी बनवलेल्या या हॅचिंग मशीनची किंमत १४ हजार रुपये आहे.