Saturday, May 10, 2025

महामुंबईताज्या घडामोडीराजकीय

Split in MVA : राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे मविआ फुटण्याच्या उंबरठ्यावर

Split in MVA : राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे मविआ फुटण्याच्या उंबरठ्यावर

मुंबई : राहुल गांधींच्या वादग्रस्त विधानामुळे महाविकास आघाडीत फूट (Split in MVA) पडू शकते, अशी शक्यता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे.


गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या राजकारणात काँग्रेस नेते व खासदार राहुल गांधी यांच्या विधानांची जोरदार चर्चा (Split in MVA) चालू आहे. हिंगोलीतील भारत जोडो यात्रेच्या सभेत बोलताना राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी केलेल्या विधानावरून भाजपाने काँग्रेस आणि त्यांच्यासह शिवसेनेवरही परखडपणे टीका केली आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेससोबत असणाऱ्या शिवसेनेची नेमकी भूमिका काय, असा प्रश्न भाजपाकडून उपस्थित केला जात होता. यावर उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींच्या वक्तव्याशी आम्ही सहमत नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर आता संजय राऊतांनी याबाबत मोठं विधान केले आहे. त्यामुळे महाविकास आघाडी फुटण्याच्या उंबरठ्यावर आली आहे की काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.


“राहुल गांधींनी मध्येच वीर सावरकरांचा मुद्दा आणण्याची गरज नव्हती. त्यामुळे महाविकास आघाडीतही फूट पडू शकते. मी तुम्हाला सांगून ठेवतोय. कारण वीर सावरकर हे नेहमीच आमचे श्रद्धास्थान राहिले आहेत आणि नेहमी राहतील”, असे संजय राऊत म्हणाले.”काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी स्पष्टपणे आणि परखडपणे सांगितले आहे की, वीर सावरकरांची कोणत्याही प्रकारे बदनामी, चुकीचे वक्तव्य शिवसेनेला मान्य नाही. शिवसेना ते सहन करणार नाही. हे सांगितल्यावर आमचा विषय संपतो”, असेही ते म्हणाले.


“राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला देशभरात चांगला प्रतिसाद मिळतोय. महाराष्ट्रात सर्वात जास्त प्रतिसाद मिळाला. या देशातलं वातावरण हुकुमशाहीकडे नेणारं, देशाला गुलामगिरीच्या बेड्या ठोकणारं झालं आहे. महागाई, बेरोजगारी अशा विषयावर त्यांची भारत जोडो यात्रा सुरू आहे. असं असताना वीर सावरकरांचा विषय काढण्याचं काही कारण नव्हतं. हा विषय काढल्यामुळे फक्त शिवसेनेलाच धक्का बसला नसून महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनाही धक्का बसला आहे. महाराष्ट्रात आणि देशात मोठ्या वर्गाला वीर सावरकरांबद्दल आदर आहे. इतिहास काळात काय घडलं आणि काय नाही घडलं हे चिडवत बसण्यापेक्षा नवा इतिहास निर्माण करावा या मताचे आम्ही आहोत. राहुल गांधींनी त्याकडे लक्ष द्यावं”, अशा शब्दांत संजय राऊतांनी राहुल गांधींना सल्ला दिला आहे.


राहुल गांधींची भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रात असून दोन दिवसांपूर्वी हिंगोलीमध्ये यात्रेतील सभेत बोलताना राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी आपली भूमिका मांडली. सावरकर हे ब्रिटिशांकडून पेन्शन घेत होते आणि त्यांनी तुरुंगातून बाहेर पडण्यासाठी ब्रिटिशांची माफीही मागितली होती, असा दावा राहुल गांधींनी केला आहे. याच्या समर्थनार्थ राहुल गांधींनी गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सावरकरांचे एक पत्रही दाखवले. त्यामुळे या मुद्द्यावरून आता महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.



हे सुद्धा वाचा...


राहुल गांधींच्या वक्तव्यापासून उद्धव ठाकरेंची फारकत


सावरकरांबद्दलच्या वक्तव्याविरोधात मनसे आक्रमक


राहुल गांधींविरोधात राज्यात जोडे मारा आंदोलन

Comments
Add Comment