हिंदुत्वाचे कट्टर पुरस्कर्ते, मराठी माणसात स्वाभिमानाचा अंगार फुलविणारे दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या १० व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या स्मृतींना आदरांजली वाहण्यासाठी आणि बाळासाहेब यांच्यावर एकप्रकारे हक्क गाजवू पाहणाऱ्यांमध्ये सध्या जोरदार अहमहमिका आणि खडाजंगी सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यातूनच बाळासाहेब ठाकरे यांचे खरे वारसदार कोण? यावरून राज्यात ठाकरे विरुद्ध शिंदे गट असा जोरदार संघर्ष सुरू आहे. बाळासाहेबांचे वक्तृत्व, परखडपणा, त्यांची तळपती लेखणी आणि सत्ताधाऱ्यांना फोडून काढणारी त्यांची व्यंगचित्रे याचे गारूड मराठी माणसांवर अजूनही कायम आहे. सत्ताधाऱ्यांवर आडपडदा न ठेवता थेट हल्ला चढविणारी आणि सर्वसामान्यांच्या वेदनांना हात घोलून त्यांना वाचा फोडणारी त्यांची भाषणे म्हणजे जणू अंगारच होता. त्यातूनच जन्माला आलेली आणि राज्यभरात तळागाळापर्यंत पोहोचलेली शिवसेना म्हणजे मराठी माणसाचा हुंकारच. आता बाळासाहेबांनंतर ही ‘शिवसेना’ आणि दिवंगत बाळासाहेब ठाकरे ही जणू आपलीच मालमत्ता असल्यासारखी वर्तणूक त्यांचे पूत्र उद्धव ठाकरे यांची असल्याने व्हायचे तेच झाले आणि न भूतो न भविष्यती अशी मोठी फूट शिवसेनेत पडली. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या विचारांशी फारकत घेऊन राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत हातमिळवणी करून महाविकास आघाडी स्थापन करीत स्वत: मुख्यमंत्रीपद स्वाकारले तेव्हाच खराखुरा, निष्ठावान शिवसैनिक कमालीचा दुखावला गेला.
भाजपसोबत असलेली २५ वर्षांची मैत्री तोडून भिन्न विचारांच्या पक्षांशी केवळ सत्तेपोटी सूत जुळविल्याने सच्चे शिवसैनिक नाराज झाले होते. त्यातूनच शिवसेनेचे ४० आमदार, १३ खासदार आणि राज्यभरातील कित्येक पदाधिकारी यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मोठा उठाव केला. या मोठ्या घडामोडीनंतर आता बाळासाहेब ठाकरे यांचे सच्चे अनुयायी म्हणा किंवा निष्ठावान कोण? याची स्पर्धाच जणू राज्यात लागली आहे. बाळासाहेबांचे राष्ट्रीय स्मारक व्हावे अशी शिवसेनेसह सर्वच पक्षांची इच्छा होती व त्यातूनच भाजप – शिवसेनेची सत्ता असताना व देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना या स्मारकासाठी शिवाजी पार्क येथील महापौर निवासाची जागा देण्याचा आणि त्यासाठी लागणारा निधी उपलब्ध करून देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय झाला होता. या स्मारकाचे काम सुरू असून या स्मारकाच्या कामाची पाहणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेबांच्या पुण्यतिथीच्या पूर्वसंध्येला केली. बाळासाहेबांच्या या ऐतिहासिक स्मारकाचे पहिल्या टप्प्यातील ५० टक्के काम पूर्ण झाले आहे आणि येत्या मार्च २०२३च्या आधी स्मारकाचे काम पूर्ण होईल. त्यातील दुसरा टप्पा महत्त्वाचा असून त्यामध्ये ऑडिओ-व्हीडिओ, बाळासाहेबांची भाषणे, व्यंगचित्रे यांचा संग्रह असणार आहे. बाळासाहेबांच्या राजकीय प्रवासाबाबतची सविस्तर माहिती देण्याचे काम या दुसऱ्या टप्प्यात केले जाणार आहे. याबाबतची विशेष बाब म्हणजे या स्मारकाचे काम फडणवीस यांच्या कारकिर्दीत सुरू झाले आणि आता एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना व भाजपची भक्कम साथ असताना या स्मारकाचे काम पूर्ण होणार आहे.
बाळासाहेबांचे स्मारक हे जनतेसाठीचे स्मारक आहे आणि जनतेला त्यातून प्रेरणा मिळावी हा यामागचा उद्देश आहे. हे स्मारक म्हणजे आपली खासगी वा वैयक्तिक मालमत्ता आहे, या हिशेबात त्याचा वापर खासगी बैठकांसाठी होऊ नये. तसेच स्मारकाचे कामकाज चालताना सर्व नियमांचे, अटींचे पालन व्हायला हवे ही सर्वसाधारण अपेक्षा आहे. हा मुद्दा येथे यासाठी उपस्थित होत आहे कारण उर्वरित उद्धव ठाकरे गटाकडून या स्मारकाचा खासगी बैठकांसाठी वापर केला गेल्याची माहिती उपलब्ध होत आहे. ही बाब ध्यानी घेऊन भाजप नेते प्रसाद लाड यांनी हे स्मारक राज्य सरकारने ताब्यात घ्यावे, अशी मागणी केली आहे. त्याचवेळी बाळासाहेब ठाकरे स्मृतिस्थळाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिल्यानंतर रात्री उशिरा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे काही कार्यकर्ते या स्मृतिस्थळापाशी जमले व त्यांनी तेथे गोमूत्र शिंपडले व हे शुद्धीकरण असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटले आहे. खरं म्हणजे गोमूत्र शिंपडून एखाद्या गोष्टीचे शुद्धीकरण होते ही बाबच मुळी बाळासाहेबांच्या विचारांशी न जुळणारी आहे. बाळासाहेब जरी कट्टर हिंदुत्ववादी असले तरी अशा बुरसटलेल्या विचारांना त्यांनी कधीही स्थान दिलेले नव्हते. त्यामुळे बाळासाहेबांच्या विचारांने आपण सच्चे वारसदार आहोत हे पटवून देण्याचा आटापिटा करणाऱ्यांचा आपसूकच पराभव झाला आहे. खरं म्हणाल तर बाळासाहेबांच्या विचार न मानणाऱ्या काँग्रेस पक्षाची सध्या ‘भारत जोडो’ यात्रा सुरू असून त्यात सहभाग घेऊन आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांची गळाभेट घेऊन आदित्य यांनीच आपल्या पिताश्री उद्धव यांच्या पावलांवर पाऊल ठेवत बाळासाहेबांच्या विचारांशी घोर प्रतारणा केली, असे म्हणावे लागेल.
अशा प्रकारे बाळासाहेबांचे स्मारक हे राजकीय शक्तिस्थान होणार असल्याने व मुंबई महापालिकेच्या निवडणुका जवळ येत असल्याने या मुद्द्यावरून आता वाद वाढत जाणार, अशी स्पष्ट चिन्हे दिसत आहेत. या पूर्वीही केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळी अभिवादन केल्यानंतर ठाकरे गटातील काही कार्यकर्त्यांकडून गोमूत्र शिंपडून परिसराचे शुद्धीकरण करण्यात आले होते. पण त्यानंतर लवकरच उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार गडगडले. आता पुन्हा गोमूत्र शिंपडण्याचे कृत्य करण्यात आल्याने आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत उरल्या-सुरल्या उद्धव गटाच्या सेनेचा पार सुपडा साफ होणार हे निश्चत. बाळासाहेबांचे हे स्मारक कुठल्या वैयक्तिक कुटुंबाचे किंवा घराण्याचे नाही. ते सर्वांचे आहे. त्याप्रमाणे बाळासाहेबही कुणाची खासगी मालमत्ता नसून ते तुमचे, आमचे आणि सर्वांचेच आहे, ही बाब सर्वांनीच ध्यानी ठेवायला हवी.