Thursday, July 25, 2024
Homeक्रीडाT-20 : भारत-न्यूझीलंड टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात

T-20 : भारत-न्यूझीलंड टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात

नव्या चोकर्समध्ये लढत!

ज्योत्स्ना कोट-बाबडे

मुंबई : टी-२० (T-20) विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरीत लाजिरवाण्या पराभवासह गाशा गुंडाळलेल्या भारतीय संघासमोर आजपासून न्यूझीलंडविरुद्ध त्यांच्याच देशात होणाऱ्या ३ सामन्यांच्या टी-२०  मालिकेत विजयी सलामीचे आव्हान आहे.

नेतृत्वातील खांदेपालट, मुख्य प्रशिक्षक बदल आणि युवा खेळाडूंना स्थान अशा तिन्ही आघाड्यांवर स्वत:ला सिद्ध करण्याची भारताकडे संधी आहे. ही मालिका म्हणजे टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या उंबरठ्यावर येऊन घास हिरावून गेल्याने हिरमोड झालेल्या दोन बलाढ्य आणि क्रिकेटवेड्या चाहत्यांच्या देशांतील लढत आहे. विशेष म्हणजे दारुण पराभवाची मरगळ झटकून आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेचा रोडमॅप तयार करण्याच्या प्रोसेसमधील हे पहिले पाऊल असल्याचे मानले जात आहे. संघातील बदल हे त्याचेच प्रतीक असल्याचे प्रकर्षाने जाणवते.

“आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेचा रोडमॅप सुरू झाला आहे; परंतु सध्या संघाचे संपूर्ण लक्ष न्यूझीलंड दौऱ्यावर आहे.” न्यूझीलंड दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कर्णधार हार्दिक पंड्याचे हे वक्तव्य म्हणजे आगामी २०२४ची टी-२० विश्वचषक स्पर्धा डोळ्यांसमोर ठेवून टीम इंडियाची वाटचाल कशी असणार आहे? याबाबत केलेले सूचक विधान आहे. तसेच पुढील वर्षी होणारी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या दृष्टिकोनातूनही त्याआधी होणाऱ्या अशा सर्व मालिका भारतासाठी महत्त्वाच्या असणार आहेत.

प्रतिभेचा महासागर असलेला व जगातील सर्वोत्तम संघांपैकी एक मानला जाणारा भारतीय संघ गेल्या काही काळापासून चाहत्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात अपयशी ठरला आहे. टी-२० साठी अपेक्षित आक्रमकपणासाठी सध्याचा भारतीय संघ त्या तुलनेने कमजोर दिसतोय. स्टार खेळाडूंचा भरणा असूनही भारतीय संघ गेल्या काही वर्षांत मोठ्या स्पर्धांमध्ये मोक्याच्या क्षणी कच खाताना दिसून येतोय. कागदावर वाघ वाटणारा हा संघ मात्र अपेक्षांना खरा उतरत नाहीय. स्पर्धेपूर्वी प्रबळ दावेदार मानला जाणारा भारतीय संघ जवळपास एका दशकापासून आयसीसीच्या मोठ्या स्पर्धा जिंकण्यात अपयशी ठरला आहे. (भारतीय संघाने यापूर्वी २०१५, २०१६, २०१९ आणि २०२२च्या वर्ल्ड कपमध्ये सेमीफायनल गमावण्यापूर्वी २०१४च्या टी-२० वर्ल्ड कपची फायनल गमावली होती. याशिवाय टीम इंडियाने २०१७ चॅम्पियन्स ट्रॉफी आणि २०२१ मधील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल गमावली आहे.)

Measles : मुंबई, ठाण्यापाठोपाठ रायगडमध्ये गोवरचा शिरकाव

असो, आता भारतीय संघाला पुढील वर्षांत होणाऱ्या मोठ्या आयसीसी स्पर्धा डोळ्यांसमोर ठेवून आतापासूनच नव्या टीमची बांधणी करावी लागणार आहे आणि त्याची सुरुवात या न्यूझीलंड दौऱ्यापासून होईल. भवितव्याचा विचार करूनच या दौऱ्याकरिता भारतीय संघात नेतृत्वापासून संघातील खेळाडूंपर्यंत युवा खेळाडूंना संधी दिली आहे. या मालिकेकरिता विराट कोहली आणि रोहित शर्मासारख्या वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. तसेच भविष्यात भारतीय संघाचे नेतृत्व करू शकणारा नवा कर्णधार म्हणून हार्दिककडे पाहिले जात आहे. न्यूझीलंड विरुद्ध शुक्रवारपासून सुरू होत असलेल्या मालिकेत भारतीय संघात युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनाही या दौऱ्याकरिता विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे व्हीव्हीएस लक्ष्मण संघाला मार्गदर्शन करणार आहेत. ही मालिका इशान किशन, दीपक हुडा, शुभमन गिल, संजू सॅमसन आणि ऋषभ पंत तसेच वेगवान गोलंदाज उमरान मलिक यांसारख्या युवा खेळाडूंना संघात आपले स्थान पक्के करण्याची उत्तम संधी असेल.

टी-२० विश्वचषक स्पर्धेतील लाजिरवाण्या पराभवानंतर झालेले मानसिक खच्चीकरण झटकून पुन्हा खेळाडूंमध्ये उत्साह संचारण्याकरिता मालिका विजयाची आवश्यकता आहे. कदाचित हा विजय न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकांमधून मिळू शकतो. तसेच टी-२० आणि एकदिवसीय मालिका दोन्ही संघांना २०२४ च्या टी-२० तसेच २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी नवीन ‘युवा प्लेइंग इलेव्हन’ला तयार करण्यास मदत करेल.

दोन्ही संघांचा विचार केल्यास भारताने युवा खेळाडूंना संघात संधी दिली आहे, तर न्यूझीलंडने अनुभवी खेळाडूंवर विश्वास कायम ठेवत नेतृत्वाची धुराही केन विल्यमसनच्या खांद्यावर दिली आहे. त्यामुळे भारताच्या युवा खेळाडूंसमोर न्यूझीलंड आपला अनुभव पणाला लावताना दिसेल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -