Sunday, August 10, 2025

Air pollution : वायू प्रदूषणामुळे मानसिक विकारात वाढ

Air pollution : वायू प्रदूषणामुळे मानसिक विकारात वाढ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गेल्या अनेक दिवसांपासून वातावरणातल्या वायू प्रदूषणाची (Air pollution) पातळी वाढत आहे. त्यामुळे अनेक लोकांना श्वसनाचे आजार होत आहेत.


वायू प्रदूषणामुळे अनेक प्रकारचे मानसिक आजारही होत आहेत. देशाची राजधानी दिल्ली आणि एनसीआरमध्ये वायू प्रदूषणामुळे गेल्या महिनाभरात नैराश्य, चिंता आणि मानसिक तणाव यासारख्या मानसिक आजारांचे प्रमाण वाढल्याचे अभ्यासातून समोर आले आहे.


अनेक अभ्यासांमधून दिसून आले आहे की, पीएम २.५ च्या दीर्घकाळापर्यंत संपर्कात आल्यामुळे ‘ब्लड ब्रेन बॅरिअर’चे नुकसान होत आहे. ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ व मनस्थलीच्या संस्थापक डॉ. ज्योती कपूर यांनी सांगितले की, गेल्या महिन्यापासून त्यांना चिंता आणि नैराश्याची अनेक प्रकरणे पहायला मिळाली आहेत. कामासाठी बाहेर पडणाऱ्या लोकांना हा त्रास झाल्याचे अधिक दिसून येत आहे. एखाद्या गोष्टीमुळे शारीरिक आजार असेल तर त्याचा मानसिक आरोग्यावरही परिणाम होऊ शकेल. तसेच वायू प्रदूषणाचेही आहे. मेंदूमध्ये न्यूरोट्रान्समीटर रिलीज होतात. प्रदूषणाचा मानसिक आरोग्यावर मोठा परिणाम होतो, असे अनेक अभ्यासांमध्ये आढळून आले आहे. हा परिणाम प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष अशा दोन्ही प्रकारचा असू शकतो.


श्वसनाच्या समस्या, झोप न लागणे आणि हवेतल्या धुक्यामुळे नीट न दिसणे यामुळे मेंदूत न्यूरोट्रान्समीटर सोडले जातात. प्रदूषणात असलेले काही कण आपल्या शरीरात जातात आणि नंतर श्वासावाटे रक्तात जातात. रक्ताभिसरण संपूर्ण शरीरात होते. त्यामुळे मज्जासंस्थेवरही परिणाम होतो. ‘एक्यूआय’ खराब असल्यामुळे चिंता, डिप्रेशन आणि काही प्रकरणांमध्ये पर्सनॅलिटी डिसऑर्डरचा त्रास होऊ शकतो.


ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ डॉ. विकास कुमार सांगतात की, प्रदूषणामुळे मेंदूच्या कार्यावरही परिणाम होतो. त्यामुळे लहान मुलांचे सर्वाधिक नुकसान होते. प्रदूषणाच्या संपर्कात आल्यानंतर, मुलांमध्ये न्यूरो-डेव्हलपमेंटसह कॉग्निटिव्ह फंक्शनची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे मेंदूच्या कार्यावर परिणाम होतो. गेल्या दोन आठवड्यांपासून काही अशा केसेस समोर आल्या आहेत, ज्यामध्ये लोकांना चिंता वाटणे तसेच झोप न येण्याच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. त्यापैकी सुमारे ९५ टक्के लोक हे ऑफिसला जाणारे आहेत.

Comments
Add Comment