Monday, May 12, 2025

रायगड

AIDS : रायगड जिल्ह्याला एड्सचा विळखा

AIDS : रायगड जिल्ह्याला एड्सचा विळखा

नवीन पनवेल (प्रतिनिधी) : रायगड जिल्ह्यात गेल्या नऊ वर्षांत ३ हजार २७३ जणांना एचआयव्हीची (AIDS) लागण झाली आहे. २०१४ ते २०२२ पर्यंत जिल्ह्यातील ३ हजार २७३ जण एचआयव्ही संक्रमित झाले असल्याची माहिती जिल्ह्याच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. यातील १ हजार ६४१ जणांचा मृत्यू झाला आहे.


युवक-युवतींमध्ये एचआयव्ही संसर्ग होण्याचा जास्त धोका आहे. याचे मुख्य कारण म्हणजे युवकांची ऊर्जा, उत्साह आणि धोका पत्करण्याची बिनधास्त वर्तणूक असल्यामुळे त्यांच्यामध्ये एचआयव्ही संसर्ग होण्याची शक्यता इतरांपेक्षा जास्त असल्याचे सांगण्यात येत आहे. याकरिता विविध गटांमध्ये एचआयव्ही संवेदीकरण करून रुग्णांना मुख्य प्रवाहामध्ये आणणे, कलंक व भेदभाव मिटविण्याकरिता प्रयत्न करणे आदी काम सामाजिक संस्थेतर्फे करण्यात येत आहे. याकरिता रायगड जिल्ह्यातील २३ महाविद्यालयांमध्ये रेड रिबन क्लबची स्थापना करून त्यांच्यामार्फत एचआयव्ही, एड्सविषयी जनजागृती केली जात आहे.


तसेच एचआयव्हीची तपासणीकरिता प्रोत्साहन दिले जात आहे. रायगड जिल्ह्याकरिता जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग, जिल्हा सामान्य रुग्णालय, रायगड - अलिबाग यांच्यामार्फत एचआयव्ही प्रतिबंध करण्यासाठी समुपदेशन व तपासणी तसेच एचआयव्ही कारणे, लक्षणे, समज-गैरसमज याविषयी शास्त्रीय माहिती देऊन जनजागृती करून एचआयव्ही/एड्सला प्रतिबंध केला जात आहे.



Kashedi tunnel : मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्याचे काम ८० टक्के पूर्ण


एचआयव्ही, एड्सविषयी जनजागृती करणे करीता जिल्ह्यामध्ये जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभागामार्फत जागतिक एड्स दिन, आंतरराष्ट्रीय युवा दिन, महिला दिन, रक्तदाता दिन यासारख्या अनेक दिनांचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वरील कार्यक्रम यशस्वीरीत्या राबविण्यासाठी तसेच एचआयव्ही एड्सला प्रतिबंध करण्यासाठी जिल्हा शलयचिकित्सक डॉ. सुहास माने तसेच जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक संजय माने व टीम जिल्हा सामान्य रुग्णालय रायगड-अलिबाग यांच्याकडून कार्यक्रमाचे नियोजन तसेच अंमलबजावणी करण्यात आली आहे.

एचआयव्ही/एड्सची कारणे


१) असुरक्षित लैंगिक संबंध
२) एचआयव्ही संसर्गित सुई किंवा सीरिंजेस
३) एचआयव्ही संसर्गित रक्त किंवा रक्तघटक
४) एचआयव्ही संसर्गित गरोदर मातेकडून तिच्या मुलास


प्रतिबंधात्मक उपाय


१) सुरक्षित लैंगिक संबंध ठेवणे
२) निर्जंतुक केलेल्या सुई व सीरिंजेसचा वापर करणे.
३) प्रमाणित रक्तपेढीतून रक्त व रक्तघटक घेणे
४) एचआयव्ही संसर्गित गरोदर मातेकडून तिच्या मुलाला एचआयव्ही संसर्ग होऊ नये यासाठी तिला एआरटीची उपचार पद्धती सुरू करून तिच्या बाळाला जन्मानंतर ७२ तासांच्या आत व ६ आठवडे नेव्हिरापिन औषध दिल्यास एचआयव्ही संसर्गित गरोदर मातेकडून तिच्या बाळाला होणारा एचआयव्ही संसर्ग टाळता येतो.

Comments
Add Comment