सिडनी (वृत्तसंस्था) : टी-२० विश्वचषक स्पर्धेदरम्यान ऑस्ट्रेलियात बलात्काराच्या आरोप प्रकरणात अटक झालेला श्रीलंकेचा सलामीवीर दानुष्का गुणथिलाका याला ऑस्ट्रेलियन कोर्टाने सशर्त जामीन (conditional bail) दिला आहे. जवळपास ११ दिवसांनंतर त्याला दिलासा मिळाला आहे.
गुणथिलाकाला श्रीलंका क्रिकेट बोर्डाच्या मदतीने हा जामीन मिळाला असून, त्यांनी जामिनासाठी मोठी रक्कम देखील भरली आहे. गुनाथिलका याचा जामीन अर्ज ७ नोव्हेंबर रोजी फेटाळण्यात आला होता. यानंतर त्याला ११ रात्री लॉकअपमध्ये काढाव्या लागल्या आणि अखेर आता त्याला जामीन मंजूर झाला आहे.
गुणथिलाकाला जामीन मिळवून देण्यासाठी श्रीलंका बोर्डाने न्यायालयात एक कोटी रुपये जमा केले आहेत. असे असतानाही त्यांना अनेक अटींवर जामीन मंजूर करण्यात आला आहे. गुणथिलकाला पोलिसात जाऊन हजेरी लावावी लागणार आहे. याशिवाय रात्री नऊ ते सकाळी सहा वाजेपर्यंत त्याला कर्फ्यूमध्ये राहावे लागणार आहे. तो कोणत्याही परिस्थितीत पीडित महिलेला भेटू शकत नाही. याशिवाय तो टिंडर किंवा इतर कोणतेही डेटिंग अॅप वापरू शकत नाही.