Friday, March 28, 2025
Homeमहत्वाची बातमीफाशी... जन्मठेप; आता मुक्तता

फाशी… जन्मठेप; आता मुक्तता

देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्याकांडातील सर्व सहा जणांची सर्वोच्च न्यायालयाने सुटका केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने नलिनी आणि आरपी रविचंद्रनसह सर्व दोषींची तुरुंगातून सुटका करण्याचे आदेश दिले. या आदेशाने जन्मठेपेची सजा भोगत असलेल्यांची सुटका झाली. सर्वोच्च न्यायालयाने यंदा १८ मे रोजी राजीव गांधी हत्याकांडातील दोषी ठरलेल्या पेरारिवलनची सुटका करण्याचा आदेश दिला होता. त्याच निकषावर आपली सुटका व्हावी, अशी इतर दोषींची मागणी होती. नलिनी आणि रविचंद्रन या दोघांना राजीव गांधींच्या हत्येच्या कटात सहभागी असल्याबद्दल दोषी ठरविण्यात आले होते. त्या दोघांनीही तीस वर्षांहून अधिक काळ जेलमध्ये शिक्षा भोगली आहे. जेव्हा नलिनीला राजीव गांधींची हत्याकांड प्रकरणी अटक झाली, तेव्हा ती दोन महिन्यांची गर्भवती होती. तेव्हाच सोनिया गांधी यांनी तिला माफ करावे, असे म्हटले होते. नलिनीच्या चुकीमुळे जो जीव या जगात आलेलाच नाही, त्याला शिक्षा कशासाठी?, असे उद्गार सोनिया गांधींनी काढले होते.

राजीव गांधी हत्याकांडात सामील झालेल्या सर्व २६ जणांना दोषी ठरवून टाडा कोर्टाने जानेवारी १९९८ मध्ये मृत्युदंडाची शिक्षा ठोठावली होती. मे १९९९ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने १९ जणांची मुक्तता केली. इतर सातपैकी चार आरोपींना (नलिनी, मुरूगन ऊर्फ श्रीहरन, संथन व पेरारिवलन) फाशीची शिक्षा सुनावली व रविचंद्रन, रॉबर्ट पायस आणि जयकुमार यांना जन्मठेप दिली.

ज्या चार जणांना मृत्युदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली होती, त्यांनी केलेल्या दयेच्या अर्जावर तामिळनाडूच्या राज्यपालांनी नलिनीला फाशीऐवजी जन्मठेपेची शिक्षा द्यावी, अशी शिफारस केली, तर सन २०११ मध्ये अन्य तिघांचा दयेचा अर्ज त्यांनी फेटाळून लावला. राजीव गांधी निवडणूक प्रचारासाठी तामिळनाडूतील श्रीपेरूबंदर येथे आले असताना दि. २१ मे १९९१ रोजी लिट्टे या दहशतवादी संघटनेच्या आत्मघाती पथकातील धनू नावाच्या महिलेने त्यांची हत्या केली. दहशतवादी धनूने सभेच्या ठिकाणी आलेल्या राजीव गांधींना अगोदर पुष्पहार घातला, नंतर वाकून त्यांच्या पाया पडण्याचे निमित्त करून तिने कमरेला बांधलेल्या पट्ट्यातील स्फोटकांचा स्फोट घडवला. तो स्फोट एवढा जबरदस्त होता की, आजूबाजूला असलेल्या अनेकांच्या शरीराच्या चिंधड्या उडाल्या. राजीव गांधी व हल्लेखोर धनूसह सोळा जणांचा जागेवरच मृत्यू झाला. या स्फोटात ४५ जण गंभीर जखमी झाले.

राजीव गांधी यांनी त्यांच्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीत श्रीलंकामध्ये शांती सेना पाठवली होती, त्यामुळे लिट्टे (लिबरेशन टायगर्स ऑफ तमीळ ईलम) ही दहशतवादी संघटना राजीव गांधींवर नाराज होती. १९९१ च्या लोकसभा निवडणूक काळात पक्षाच्या प्रचारसभेसाठी राजीव गांधी हे चेन्नईजवळील श्रीपेरूबंदरला गेले असताना लिट्टेने त्यांच्यावर आत्मघाती हल्ला केला.

१९८४ मध्ये इंदिरा गांधींची हत्या झाली आणि राजीव गांधी पंतप्रधान झाले. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला तीन चतुर्थांशपेक्षा जास्त जागा मिळाल्या. त्यावेळी लोकसभेत काँग्रेसचे ४१४ खासदार निवडून आले होते. राजीव गांधी पंतप्रधान झाले तेव्हा ते चाळीस वर्षांचे तरुण होते. देशाचे सर्वात युवा पंतप्रधान म्हणून त्यांची नोंद झाली. त्यांनीच देशातील शाळा-शाळांमधून कॉॅम्प्युटर उपलब्ध करून देण्याची मोहीम राबवली. त्यांच्याच कारकिर्दीत ग्रामीण भागात जवाहर नवोदय विद्यालयाचे जा‌ळे निर्माण झाले. पीसीओच्या माध्यमातून गावोगावी टेलिफोन पोहोचले. राजीव गांधींच्या सरकारवर तेव्हा भ्रष्टाचाराचे मोठे आरोप झाले होते. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर दिल्लीत शीख विरोधी झालेल्या हिंसाचारात हजारो मारले गेले. भोपाळ विषारी वायू कांड, शाहबानो केस, बोफोर्स तोफा खरेदी भ्रष्टाचार, श्रीलंकाविषयी भारताचे धोरण अशा अनेक मुद्द्यांवर राजीव गांधी यांना विरोधी पक्षाने कोंडीत पकडले होते. त्याचा परिणाम पुढील निवडणुकीत काँग्रेसला सत्ता गमवावी लागली व केंद्रात विश्वनाथ प्रतापसिंह यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले.

१९९० मध्ये व्ही. पी. सिंह यांचे सरकार कोसळले व काँग्रेसचे समर्थन घेऊन चंद्रशेखर पंतप्रधान झाले. १९९१ मध्ये त्यांचेही सरकार कोसळले व लोकसभेच्या निवडणुकांना सामोरे जाण्याची पाळी देशावर आली. याच निवडणुकीत प्रचारासाठी राजीव गांधी तामिळनाडूत गेले होते, तेव्हा लिट्टेने त्यांची आत्मघाती पथकाकडून हत्या घडवली. दि. १२ मे १९९१ रोजी धनू महिलेने तामिळनाडूतील एका सभेत माजी पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांच्या जवळ जाऊन त्यांच्या पायाला स्पर्श केला होता, त्याच धनूने ९ दिवसांनंतर २१ मे १९९१ रोजी श्रीपेरूबंदर येथे राजीव गांधी यांच्या पाया पडताना मोठा स्फोट घडवला. धनू ही मानवी बॉम्ब होती. राजीव गांधी यांची हत्या घडविण्यासाठी लिट्टेने तिची निवड केली होती. सर्वोच्च न्यायालयाने राजीव गांधी हत्याकांडातील सर्व मारेकऱ्यांच्या मुक्ततेचे आदेश दिल्यानंतर निकालाला विरोध म्हणून काँग्रेसने थयथयाट सुरू केला. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आम्हाला मान्य नाही, असे काँग्रेसचे नेते जयराम रमेश व अभिषेक मनू सिंघवी यांनी म्हटले आहे. देशाच्या माजी पंतप्रधानांची हत्या करणाऱ्यांची सुटका कशी होऊ शकते, असा प्रश्न काँग्रेसने विचारला आहे. खरे तर काँग्रेस पक्षाचे सर्वोच्च नेते सोनिया गांधी, राहुल गांधी व प्रियंका वड्रा यांनी राजीव यांच्या मारेकऱ्यांना आम्ही माफ करतो, असे म्हटले होते. पण ते त्यांचे वैयक्तिक मत होते, पक्षाची भूमिका तशी नाही, असाही खुलासा काँग्रेसने केला आहे.

तामिळनाडूतील सत्ताधारी द्रमुक पक्षाने सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे स्वागत केले आहे. मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी म्हटले आहे की, राजीव गांधी हत्याकांडातील सर्व मारेकऱ्यांची मुक्तता व्हावी, ही आमची पहिल्यापासून मागणी होती. नलिनी श्रीहरनची आई पद्मा ही आता ८१ वर्षांची आहे. नलिनीला हत्याकांड प्रकरणी १९९१ मध्ये अटक झाली. फाशीची सजा ते सुटका हा सर्व ३१ वर्षांचा प्रवास तिच्या आईने पाहिला आहे. नलिनीला राजीव गांधी यांची हत्या करण्याच्या कटाची माहिती होती. चेन्नईच्या बस स्थानकापासून ती कटातील दोषी ठरलेल्यांना बरोबर घेऊन पेरूबंदर येथे गेली होती. धनूसाठी तिने बाजारातून कपडे खरेदी केले होते. धनूने कमरेला बांधलेल्या पट्ट्यात स्फोटके ठेवली आहेत हे नलिनीला ठाऊक होते. धनू राजीव गांधींच्या पायाला हात लावण्यासाठी वाकली तेव्हा नलिनी तिथे बाजूला उभी होती. नलिनी ही भावंडात मोठी आहे, तिची बहीण व भाऊ दोघेही चेन्नईमध्ये मीडियामध्ये आहेत.

१९९१ मध्ये अटक झाली तेव्हा नलिनी – मुरूगनचे लग्न झाले होते. मुरूगनची आई तेव्हा विदेशात होती. मात्र पोलिसांनी नलिनीच्या आईलाही अटक केली. नलिनीची आई पद्मा व बहीण भाग्यश्री यांनी आरोपी म्हणून आठ वर्षे जेलमध्ये काढली. नलिनी इंग्रजी विषयात पदवीधर आहे. नंतर तिने जेलमध्ये एमबीएचा अभ्यास केला. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या जेलमधून परीक्षा देऊन तिने सात पदविका प्राप्त केल्या. तिची मुलगी हरिथ्रा हिचा जन्म जेलमध्येच झाला. ती आता लंडनमध्ये आहे. तुरुंगातून सुटका झाल्याने नलिनी व तिचा पती आता लंडनला जाण्याच्या विचारात आहेत.

रविचंद्रन म्हणतो, तामिळनाडूतील विविध राजकीय पक्षांनी आमच्या सुटकेची मागणी केली म्हणून आम्हाला आशा वाटू लागली. अन्यथा या जन्मी मी जेलमधून बाहेर येईन, असे कधी वाटले नव्हते. जेलमध्ये असताना रविचंद्रन याने इतिहास विषय घेऊन एमए केले. तो म्हणतो, माझ्याकडे शिक्षण आहे, पण तुरुंगाच्या बाहेर आल्यावर समाज मला किती स्वीकारेल? हे ठाऊक नाही. सुटका झालेली नलिनी ही चेन्नईची, तर रविचंद्रन मदुराईचा आहे. ते भारतीय नागरिक आहेत. बाकीचे संथान, रॉबर्ट पायस, जयकुमार, नलिनीचा पती मुरूगन हे श्रीलंकेचे नागरिक आहेत.

[email protected]

[email protected]

-डॉ. सुकृत खांडेकर

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -