नवी दिल्ली : अवघ्या जगासाठी एक आनंदाची बातमी (World population) आहे. जगात ८०० कोटीव्या बाळाचा जन्म झाला आहे. लोकसंख्येवर नजर ठेवणाऱ्या https://www.worldometers.info/ या संकेतस्थळाने मंगळवारी दुपारी दीड वाजता या बाळाचा जन्म झाल्याची पुष्टी केली आहे.
संयुक्त राष्ट्राच्या लोकसंख्येवरील अहवालातही यंदा १५ नोव्हेंबर रोजी जगाची लोकसंख्या (World population) ८०० कोटींवर पोहोचणार असल्याचा दावा करण्यात आला होता.
लोकसंख्या वाढीच्या या आकडेवारीतील विशेष गोष्ट म्हणजे मागील अवघ्या २४ वर्षांतच जगाची लोकसंख्या तब्बल २०० कोटींनी वाढली आहे. १९९८ मध्ये जगाची लोकसंख्या ६०० कोटी होती. ती २०१० मध्ये वाढून ७०० कोटी झाली. पुढील १२ वर्षांत म्हणजे २०२२ मध्ये लोकसंख्येत आणखी १०० कोटींची भर पडली. त्यानंतर आज मंगळवारी १५ नोव्हेंबर २०२२ रोजी जगात ८ अब्जाव्या म्हणजे ८०० कोटीव्या बाळाचा जन्म झाला.
हे सुद्धा वाचा – लोकसंख्या वाढीत भारत अग्रेसर!
ख्रिस्त जन्मापासून जगातील लोकसंख्येचा डेटा उपलब्ध आहे. म्हणजे आपल्याला मागील २ हजार वर्षांपासूनची लोकसंख्येची आकडेवारी पाहता येते. या आकडेवारीवरून स्पष्ट होते की, ख्रिस्तांच्या जन्मावेळी जगाची लोकसंख्या जवळपास २० कोटी होती. त्यानंतर १०० कोटींपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला जवळपास १८०० वर्ष लागले. त्यानंतर १०० कोटींहून २०० कोटींपर्यंत पोहोचण्यासाठी जगाला १३० वर्षे लागली.
औद्योगिक क्रांतीसोबत आरोग्य सेवांतही अमुलाग्र सुधाणा झाली. त्यामुळे जन्माला येणाऱ्या मुलांच्या व डिलिव्हरीवेळी मृत्यू होणाऱ्या महिलांच्या संख्येत घट झाली. यामुळे लोकसंख्येत वेगवान वाढ झाली. पुढील ३० वर्षांत जगाची लोकसंख्या २०० कोटींहून ३०० कोटींवर पोहोचली. त्यानंतर अवघ्या १४ वर्षांतच लोकसंख्या ३०० कोटींहून ४०० कोटींवर पोहोचली.