पेण (वार्ताहर) : सहकार मंत्री यांच्या उपस्थितीत लवकरच पेण अर्बन बँक ठेवीदारांच्या बाबत संबंधितांची बैठक होऊन योग्य तो निर्णय घेतला जाईल. पेण अर्बन बँकेचे तत्कालीन संचालकांनी बँकेची जी लूट केली आहे, त्याबाबत कोर्टात खटला सुरू होण्याची मागणी ही करणार आहोत. एक लाख ६५ हजार ठेवीदारांना न्याय मिळावा यासाठी ही बैठक झाली. महिन्यापूर्वी ही सहकारमंत्री यांच्यासोबत मंत्रालयात बैठक झाली होती. आनंदाची बाब म्हणजे ईडी यांनी या प्रॉपर्टीची विक्री करण्यासाठी तयारी दाखविली आहे.
पेण अर्बन बँकेच्या पेण शहरात असणाऱ्या मुख्य कार्यालयात भाजप खासदार किरीट सोमय्या (Kirit Somayya) यांनी भेट देऊन बँकेबाबत संबंधितांबरोबर चर्चा केली. त्यांच्या भेटीकडे ठेवीदारांचे लक्ष लागून राहिले होते. ७५ वर्षाची परंपरा असलेल्या अर्बन बँक घोटाळ्याला एक तप पूर्ण होऊन गेला आहे. पेण अर्बन बँक २०१० ला बुडीत निघाली आणि रायगडसह मुंबईत हाहाकार माजला. सहकार क्षेत्राला मोठा हादरा बसला होता. ठेवीदार व खातेदार आपले पैसे कधी मिळतील या आशेवर आहेत. त्यामुळे बँकेबाबत कोणीही पुढाकार घेतला की ठेवेदार व खातेदारांना आशेचा किरण दिसून येतो.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पेणचे भाजपचे आमदार रवींद्र पाटील यांच्या प्रचारासाठी आले होते. त्यावेळी बँक ठेवीदारांचे पैसे त्यांना परत मिळतील, असे आश्वासन दिले होते. त्यानंतर फडवणीस मुख्यमंत्री झाले, आता ते उपमुख्यमंत्री झाले. मागील सरकारमध्ये विरोधी पक्षनेते होते, मात्र अजूनही बँकेचा प्रश्न सुटला नाही. यापुढे होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती व पेण नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या पेणमध्ये आले होते.
तेव्हा त्यांनी पेण अर्बन बँक संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. या भेटीमुळे पुन्हा एकदा अर्बन बँक देवीदारांना फक्त आश्वासनच मिळणार की त्यांच्या हक्काचे पैसे मिळणार? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. यावेळी किरीट सोमय्या यांच्यासह पेण विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवींद्र पाटील, पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर, पेण संघर्ष समितीचे नरेन जाधव, राजेश मपारा, नगराध्यक्ष प्रीतम पाटील, मिलिंद पाटील, ललित पाटील, वैशाली कडू, शांता भावे यांच्यासह खातेदार-ठेवीदार मोठया संख्येने उपस्थित होते.