
नवी दिल्ली : धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव गोठवण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे (Thackeray) यांनी दाखल केलेली याचिका दिल्ली हायकोर्टाने फेटाळली आहे. हायकोर्टाने निवडणूक आयोगाला या प्रकरणी तातडीने अंतिम आदेश घेण्याचा आदेश दिला आहे.
न्या. संजीव नरुला यांच्या खंडपीठासमोर या याचिकेची सुनावणी घेण्यात आली. यावेळी उच्च न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगाला या वादाचा शक्य तितक्या लवकर निवाडा करण्याचे निर्देश दिले आहेत.
८ ऑक्टोबरला केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवले होते. ठाकरे गटाला मशाल आणि शिंदे गटाला ढाल तलवार चिन्ह देण्यात आले होते. अंधेरी पोटनिवडणूक पार पडल्यानंतर शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह आम्हाला मिळावे, अशी मागणी उद्धव ठाकरे गटाकडून करण्यात आली होती. मात्र, दिल्ली हायकोर्टाने ठाकरे गटाची ही याचिका फेटाळून लावली. पक्षाचे नाव आणि पक्षाचे चिन्ह गोठवण्याचा अधिकार हा निवडणूक आयोगाचा असल्याचे म्हणत दिल्ली हायकोर्टाने या प्रकरणी अंतिम निर्णय घेण्याचे आदेश निवडणूक आयोगाला दिले आहेत.