राजापूर (प्रतिनिधी) : आमदार राजन साळवी यांनी महाविकास आघाडी शासनाच्या कालावधीत राजापूरकरांना वारंवार आश्वासित केलेले सुपर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल (hospital) हे केवळ दिवास्वप्नच असल्याचे स्पष्ट झाले आहे.
तत्कालीन शासनाने विभागात केवळ एकच सुपर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल असा राग आळवल्याने व कोकण विभागासाठीचे हे हॉस्पिटल ठाणे जिल्ह्यात मंजूर करण्यात आलेले असल्याने राजापूरकरांच्या तोंडाला आरोग्यविषयक आघाडीवरही पानेच पुसण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
पायाभूत सुविधांपासून शैक्षणिक, आरोग्यविषयक आधुनिक वैद्यकीय सुविधा, रोजगार, इतर नोकरीच्या संधी यापासून स्वातंत्र्यानंतर गेली ७५ वर्षे राजापूर तालुका पिछाडीवरच आहे. आरोग्य सुविधांच्या बाबतीत बोलायचे तर सर्पदंशामुळेही रुग्ण दगावल्याच्या अनेक घटना राजापूर तालुक्यात आजही घडत आहेत. त्यामुळे जिल्ह्याच्या उपयोगाला येईल, असे सुपर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल तालुक्यातील वाटूळ येथील शासकीय जागेत आकाराला येईल, अशी आशा राजापूरकर जनता बाळगून होती. मात्र त्यावरही पाणी फेरले गेले आहे.
कोकण विभागात मोडणाऱ्या ठाणे जिल्ह्यात जवळपास अनेक सुसज्ज वैद्यकीय सुविधा उपलब्ध असताना व ठाणे-मुंबई आदी ठिकाणे येथून नजीकच असताना चारशे कि.मी. अंतरावर असलेल्या राजापूर तालुक्यातील प्रस्तावित सुपर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल राज्य शासनाने हिरावून घेतल्याची भावना राजापूरकरांची झाली आहे.
राजापूर तालुक्यासाठी नवे उपजिल्हा रुग्णालय उभारण्याची घोषणा करून पाने पुसण्याऐवजी आहे त्या शासकीय रुग्णालये तसेच आरोग्य केंद्रे व उपकेंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्यांसह, सेवासुविधा पुरवून दाखवाव्यात, अशी मागणी झाली आहे. राजापूर ग्रामीण रुग्णालयातील अपुऱ्या सुविधा व कमतरतेबद्दल संतप्त झालेल्या राजकीय पक्षांच्या स्थानिक पुढाऱ्यांनी धडक मोर्चा काढून येथील प्रशासनाला जाब विचारण्याचा प्रयत्न केला होता. मात्र ज्यांच्या हाती निर्णय प्रक्रिया आहे, अशा सत्ताधारी अथवा विरोधी पक्षांच्या नेत्यांपर्यंत हा विषय पोहोचला की नाही, हे कळून आलेले नाही. या मोर्चानंतर त्याविषयी कोणत्याच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी ‘ब्र’ देखील काढलेला नाही. त्यामुळे ‘मुकी बिचारी कुणीही हाका’, अशी आज ही राजापूरकरांची अवस्था असल्याचे दिसून आले आहे.