अग्रलेख : कोणाच्या रंग-रूपावर, टिप्पणी करणे चुकीचे

रंग, रूप, कोणाच्याही हातात नसते, सार्वजनिक जीवनात नेते किंवा सेलेब्रेटीही त्यांच्या रूपापेक्षा त्यांच्या कार्यावरून आणि कर्तृत्वावरून ओळखले जातात. कोणाशी पटले नाही म्हणून त्याला प्रतिवाद करताना त्यांच्या शारीरिक व्यंगावरून छेडणे किंवा त्याच्या रंग, रूपावरून त्याची टिंगल- टवाळी करणे हे भारतीय संस्कृतीत मुळीच शोभादायक नाही. गेल्या काही वर्षांत राजकीय पक्षांचे नेते एकमेकांवर जी वैयक्तिक टीकाटिप्पणी करतात, कुरघोड्या करतात, हमरी तुमरी खेळतात, तू तू मै मैपर्यंत आव्हान प्रतिआव्हान देतात, हे बघता सर्वांनीच कुठे तरी आपल्या बोलण्याला लक्ष्मण रेषा घालण्याची गरज भासू लागली आहे. जाहीर सभांतील आणि विधिमंडळातील आरोप - प्रत्यारोपांची पातळी बघितली, तर संसदीय परंपरेचा स्तर ढासळू लागला आहे, असे वाटू लागते. मोठ-मोठ्या पक्षांचे मोठे नेते जेव्हा बिनधास्त बोलतात, तेव्हा त्यांना मर्यादा सांगणार कोण? असा प्रश्न पडतो.


आज भारतीय जनता पक्ष सुसंस्कृत पक्ष म्हणून ओळखला जातो. भाजपमधील बहुतेकांवर संघ परिवाराचे संस्कार असल्याने व मोदी-शहांचा पक्षात धाक असल्याने या पक्षात लोकप्रतिनिधी आणि नेतेही अतिशय सावध व तोलून- मालून बोलत असतात. पण अन्य अनेक राजकीय पक्षात अनेकजण मुक्तद्वार असल्यासारखे बेलगाम बोलत असतात.


पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेसचे सरकार आहे. सलग दुसऱ्यांदा या पक्षाला तेथील मतदारांनी घवघवीत जनादेश दिला आहे. पण प्रचंड जनादेश आहे म्हणून घटनात्मक पदांवर बसलेल्या मोठ्या नेत्यांविषयी आणि व्यक्तिमत्त्वाविषयी काय वाट्टेल ते बोलावे, असा अधिकार कोणीच कोणाला दिलेला नाही. तृणमूल काँग्रेसचे नेते व राज्याचे कॅबिनेट दर्जाचे असलेल्या मंत्र्याने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याविषयी जी असभ्य व असंस्कृत टीकाटिप्पणी केली, त्याबद्दल सर्व देशातून नाराजी प्रकट होते आहे. देशाच्या राष्ट्रपती ही देशाची घटनात्मक पातळीवरील सर्वोच्च व्यक्ती असते. त्यांच्याविषयी काहीही मर्यादा सोडून बोलणे हे अतिशय गंभीर आहे. तृणमूल काँग्रेसच्या एका कॅबिनेट मंत्र्याने जाहीर कार्यक्रमात राष्ट्रपतींविषयी अनुद्गार काढले. आपण कोणाच्या चेहऱ्या-मोहऱ्याविषयी बोलत नाही, पण आपल्या राष्ट्रपती दिसतात कशा? असे त्या मंत्र्याने उद्गार काढले आणि देशभरातून त्यांच्यावर टीकेचा भडीमार सुरू झाला. भारतीय जनता पक्षाने तृणमूल काँग्रेसच्या मंत्र्यांच्या वक्तव्याचा तीव्र धिक्कार केला, तेव्हा या मंत्रीमहाशयांनी खुलासा करण्याचा प्रयत्न केला, आपण बोलताना कोणाचे नाव घेतले नव्हते, असे सांगून हे मंत्रीमहाशय आपली सुटका करू बघत आहेत. पण त्यांनी राष्ट्रपती असा खुलेआमपणे उल्लेख केलाच ना? या देशात राष्ट्रपती एकच आहेत, त्यामुळे त्यांची टीकाटिप्पणी कोणाला उद्देशून त्यांनी केली, हे लपवायला त्यांना आता संधीच उरलेली नाही.


पश्चिम बंगालमध्ये भाजप विरोधी पक्ष आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने तृणमूल काँग्रेसला अक्षरश: घाम फोडला होता. ज्या राज्यात एक डझन आमदार निवडून येण्याची मारामार होती, त्या पश्चिम बंगालमध्ये भाजपचे पाऊणशेपेक्षा जास्त आमदार आज विधानसभेत आहेत. विरोधी पक्षातील नेत्यांनीही टीका करताना संसदीय मर्यादांचे भान ठेवले पाहिजे. पण, भाजपच्या एका नेत्याने तृणमूल काँग्रेसच्या एका मंत्र्याचा उल्लेख जाहीरपणे कुरूप असा केला. सत्ताधारी असो किंवा विरोधक कोणीही सार्वजनिक जीवनात कोण कसा दिसतो, त्यांचे शारीरिक व्यंग काय आहे, यावर भाष्य करणे चुकीचे आहे. ही मर्यादा दोन्ही बाजूने पाळायला हवी.


देशाच्या राष्ट्रपतींना कोणत्याही वादात ओढता कामा नये किंवा त्यांच्यावर वैयक्तिक टीकाही होता कामा नये. सरकारच्या विरोधात काही तक्रारी असतील, तर विरोधी पक्ष राष्ट्रपतींकडे धाव घेत असतो. एखाद्या मागणीवर किंवा एखाद्या प्रश्नावर सरकार काहीच हालचाल करीत नसेल तरी विरोधी पक्ष राष्ट्रपती भवनाचे दरवाजे ठोठावतात. मग त्याच राष्ट्रपतींच्या रंग, रूपाविषयी कशासाठी भाष्य करावे? कोणत्याही व्यक्तीचे रंग, रूप हे त्याच्या हाती नसते. पण कार्य कर्तृत्वावून नाव मिळवणे व प्रतिमा निर्माण करणे हे प्रत्येकाच्या हाती असते. ओरिसामधील एका दूरगामी आदिवासी खेड्यातील द्रौपदी मुर्मू या देशाच्या सर्वोच्च पदावर बसल्या, याचे श्रेय भाजपला व पंतप्रधान नरेंद्र मोदींना आहे. द्रौपदी मुर्मू यांना सर्वोच्च स्थानावर नेताना मोदींनी कोणतेही राजकारण केले नाही मग विरोधी पक्षाच्या राज्यातील मंत्र्यांनी आपल्या देशाच्या महिला राष्ट्रपतींवर अशी आक्षेपार्ह टीका का करावी?


द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपतीपदावर निवड झाल्यावर सर्व देशात आनंद व्यक्त झाला, पण काँग्रेस पक्षाच्या लोकसभेतील एका प्रमुख नेत्याने त्यांचा राष्ट्रपत्नी असा उल्लेख करून देशातील सामान्य जनतेचा संपात ओढवून घेतला होता. त्या घटनेवरून केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी सोनिया गांधींनी माफी मागावी अशी मागणी केली होती, त्यावरून सोनिया संतापल्या व डोन्ट टॉक टू मी... असे त्यांनी स्मृती इराणी यांना उद्देशून म्हटले होते. संसदेत आणि विधिमंडळात नियमानुसार कामकाज चालले पाहिजे व कोणी असंसदीय भाषा वापरली, तर ते शब्द संसदेच्या नोंदीतून सभापती काढून टाकतात. मात्र जाहीर कार्यक्रमांतून कोणी दुसऱ्याविषयी आक्षेपार्ह भाषा वापरली किंवा असंसदीय शब्दांचा उपयोग केला, तर त्याला लगाम कसा घालणार? अटलबिहारी वाजपेयी विरोधी पक्षात असताना सरकारवर तोलून मापून शब्दात पण धारदार टीका करीत असत. पंतप्रधान झाल्यावरही त्यांनी विरोधकांवर टीका करताना मर्यादांचे उल्लंघन केले नाही. सार्वजनिक जीवनात टीकाटिप्पणी करताना सर्वांनीच भान राखले पाहिजे.

Comments
Add Comment

प्रश्नांचा फास

थोडसं अनुकूल वातावरण मिळालं, की जुनी दुखणी लगेच उसळी मारतात. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचंही

हजार कोटींचा निष्काळजीपणा

अकरा वर्षांपूर्वी मुंबईत मोनोरेल धावू लागली, तेव्हा सगळ्यांनी 'मोना डार्लिंग' म्हणून तिचं मोठं प्रेमभर कौतुक

मराठी साहित्याचा विश्वास

९९ व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक आणि पानिपतकार विश्वास पाटील यांची निवड यंदा

महागाईचा जनतेला हादरा

रिटेल इन्फ्लेशन म्हणजे किरकोळ महागाईचा दर गेले नऊ महिने सातत्याने घसरत होता आणि लोकांनाही हायसे वाटले होते. पण

सरन्यायाधीशांचा फटाका!

राजधानी दिल्लीतील प्रदूषणाची चर्चा नेहमीच होत असते. वाहनांच्या माध्यमातून होत असलेले प्रदूषण, पीकं

कसरतीची चौथी फेरी

उरलेसुरले वस्त्रहरण रोखण्यासाठी उबाठा गटाच्या चाललेल्या कसरतींमधला आणखी एक अंक गुरुवारी पार पडला. दोन्ही