Thursday, July 18, 2024
Homeकोकणरायगडtourists : मांडवा समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांची वाढती गर्दी!

tourists : मांडवा समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांची वाढती गर्दी!

रो-रो बोटीचा झाला फायदा, येथील समुद्रकिनाऱ्याची पडते भुरळ

अलिबाग (प्रतिनिधी) : मुंबईपासून अत्याधुनिक अशा रो-रो बोटीच्या सेवेमुळे आता मांडवा समुद्र किनाऱ्याकडे पर्यटकांची (tourists) नजर वळली आहे. नैसर्गिक सौंदर्याने नटलेला, येणाऱ्या पर्यटकांना आपल्या सौंदर्याची भुरळ घालणारा मांडव्याचा समुद्रकिनारा आता कात टाकत आहे. अत्याधुनिक सोयी-सुविधांमुळे गेल्या चार वर्षांत पर्यटकांची संख्या वाढली असून रोजगारही उपलब्ध होत असल्याचे व्यावसायिक सांगतात.

अलिबाग तालुक्याला विस्तीर्ण असा समुद्रकिनारा लाभला असल्यामुळे स्थानिकांना मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या नवनवीन संधीही निर्माण झाल्या आहेत. मांडवा हा सागरी परिसर मुंबई महानगराशी जोडला गेल्याने विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. काही वर्षांपूर्वी रेवस ते भाऊचा धक्का असा होडीने प्रवास व्हायचा; मात्र काही काळानंतर याचे रूपांतर रो-रो, वॉटर टॅक्सी आणि जलद बोटसेवेसारख्या अद्ययावत जलवाहतुकीत झाले आहे.

२००१ पासून मांडवा येथील जलवाहतुकीत नावीन्यपूर्ण बदल झाल्याने येथील व्यावसायिकांसह नोकरदारांचा जलप्रवास सोपा झाला आहे. मुंबईसारख्या महानगराला मांडवा गाव जोडले गेल्याने येथील रस्ते, वसाहती, नागरिकांच्या राहणीमानात बदल होत गेले. मांडवा बंदर होण्यापूर्वी रेवस बंदर ते भाऊचा धक्का असा प्रवास बोटीतून व्हायचा; तर काही लोक डिंगीच्या साहायाने ये-जा करायचे. त्यानंतर बंदर विकास खात्याने मांडवा जेटीस परवानगी दिल्याने परिसरात झपाट्याने बदल होत गेले.

मांडवा विभागातील आंबा, नारळी-पोफळी, सुपारीच्या बागांनी पर्यटकांना भुरळ घातल्याने सासवणे परिसरातील पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. येथील करमरकरवाडा पाहण्यासाठी देशविदेशातील पर्यटक आवर्जून येत असल्याने सुट्टीच्या हंगामात कायम गर्दी असते. मांडवा ते आवास गावापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा एलईडी विजेचे खांब उभारण्यात आले आहेत. पर्यटकांसह सेलिब्रिटींनाही मांडव्याची भुरळ पडल्याने या ठिकाणी अनेकांनी फार्म हाऊस घेतले आहेत.

वर्षभर १० लाखांच्या घरात प्रवासी वाहतूक

गेटवे ऑफ इंडिया (मुंबई) ते मांडवा (अलिबाग) या सागरी मार्गावर प्रतिदिन जवळपास दोन हजार व्यक्ती प्रवास करतात; तर वार्षिक प्रवासी संख्या १० लाखांच्या घरात आहे. मुंबई-अलिबागदरम्यानचा अत्यंत सोईचा आणि कमी वेळ लागणारा प्रवासी मार्ग म्हणून अलिबाग परिसरातून सुमारे ७०० ते ८०० नागरिक याच मार्गाने दररोज नोकरी व अन्य व्यावसायिक कारणास्तव मुंबईत ये-जा करतात. सुरक्षित प्रवासासाठी विकास प्रकल्प

पावसाळ्यातील दोन-तीन महिन्यांच्या कालावधीतही मुंबई गेटवे ते मांडवा (अलिबाग) या दरम्यानची सागरी प्रवासी वाहतूक सुरक्षितरीत्या सुरू ठेवण्याकरिता मांडवा बंदरात अनेक विकास प्रकल्प होऊ घातले आहेत. ते पूर्णत्वास आल्यावर सागरी प्रवास आणखी जलद होणार असून पर्यटनाला चालना मिळेल, अशी अपेक्षा स्थानिक व्यावसायिकांना आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -