मुंबई (वार्ताहर) : महाराष्ट्र राज्य कबड्डी असो. ने “४८व्या कुमार गट राष्ट्रीय कबड्डी (Kabaddi) स्पर्धेकरिता” आपला अंतिम संघ जाहीर केला. कोल्हापूरच्या दादासो पुजारी यांच्या गळ्यात संघाच्या नेतृत्वाची धुरा सोपविण्यात आली.
उत्तराखंड राज्य कबड्डी असो. च्या विद्यमाने दि. १७ ते २० नोव्हेंबर या कालावधीत पंतदिप क्रीडांगण, ऋषिकेश, हरिद्वार, उत्तराखंड येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. गेली आठ दिवस प्रशिक्षक केतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर येथील सरावानंतर हा संघ स्पर्धेसाठी तयार झाला आहे. गतवर्षी महाराष्ट्राच्या संघाला पहिल्या चार संघात स्थान मिळविता आले नव्हते. यंदा ती कसर भरून काढण्याचा प्रशिक्षक गायकवाड व व्यवस्थापक लक्ष्मण बेल्लाळे यांचा मानस असेल.
हा निवडण्यात आलेला संघ मंगळवारी सकाळी १०.४० वाजता परभणी येथून सचखंड एक्सप्रेसने स्पर्धेकरिता रवाना झाला. त्या प्रसंगी त्यांना शुभेच्छा देण्याकरिता राज्य कबड्डी असो.चे कोषाध्यक्ष मंगल पांडे व परभणी जिल्हा कबड्डी असो.चे कार्यकर्ते रेल्वे स्थानकावर हजर होते. महाराष्ट्र राज्य कबड्डी असो.चे सचिव आस्वाद पाटील यांनी निवडण्यात आलेला संघ जाहीर केला.
कुमार गट संघ :- १) दादासो पुजारी – कर्णधार (कोल्हापूर), २) शिवम पठारे – उपसंघानायक (अहमदनगर), ३) धीरज बैलमारे (रायगड), ४) संदेश देशमुख(बीड), ५) प्रतीक जाधव (पालघर), ६) अजित चौहान (पुणे), ७) रजतकुमार सिंग (मुंबई उपनगर), ८) वैभव वाघमोडे (सांगली), ९) वैभव कांबळे (परभणी), १०) वेद पाटील (रत्नागिरी), ११) तेजस काळभोर (नंदुरबार), १२) याकूब पठाण (नांदेड). संघ प्रशिक्षक :- केतन गायकवाड, व्यवस्थापक :- लक्ष्मण बेल्लाळे.