Tuesday, May 6, 2025

कोकणरत्नागिरी

Rangava : चांदोर, नाखरे गावात गवा रेड्याचा वावर

रत्नागिरी (प्रतिनिधी) : तालुक्यातील पावस चांदोर, नाखरे या भागात सध्या गवा रेड्याचा (Rangava) मुक्तसंचार सुरू आहे. गवा रेडा दिवसा बाहेर पडण्याचे प्रमाण वाढत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागाने तातडीने त्याची दखल घेऊन गव्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे.


पावस परिसरातील भागात पूर्वी बिबट्याचा वावर असल्याचे पाहायला मिळत होते; परंतु सध्या बिबट्याने वावरण्याचे प्रमाण कमी केल्याने थोडासा दिलासा मिळाला होता. मात्र आता गवा रेडा दिवसाढवळ्या संचार करत असल्याचे स्थानिकांना दिसून येत आहे. गवा रेड्याने आपला मुक्काम या परिसरात सुरू केल्याने भीतीचे सावट पसरले आहे.


ज्या दिवशी गवा दिसून आला, त्यावेळी स्थानिकांनी गव्याला पिटाळून लावले. याबाबत वनविभाग अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष न करता गव्याचा बंदोबस्त करावा, या संदर्भात येथील शेतकरी गणेश नार्वेकर म्हणाले की, सध्या अचानकपणे गवा रेड्याने या भागात संचार सुरू केल्यामुळे भीती निर्माण झाली आहे. गवा भरदिवसा संचार करत असल्याने शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांवर हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तातडीने वन विभागाने गव्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी करत आहोत.

Comments
Add Comment